राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जेमतेम वर्षभर परीक्षा नियंत्रक पद उपभोगलेले विलास रामटेके यांना पायउतार व्हावे लागणार आहे. कारण, त्यांची सेवा समाप्त करण्याचे स्पष्ट आदेशच शिक्षण संचालकांनी दिले आहेत. परीक्षा नियंत्रक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा आणि अनुभवाची अट पूर्ण करू न शकणारा परीक्षा नियंत्रक पायउतार होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरेल. विलास रामटेके यांची परीक्षा नियंत्रक पदासाठीची निवड अयोग्य असून त्यासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा आणि अनुभवाची अट ते पूर्ण करीत नसल्याची तक्रार भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी थेट शिक्षण संचालकांकडे केली होती. शिक्षण संचालक कार्यालयाला बन्सोड यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने त्यांनी नागपुरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथील सहसंचालक डॉ. डी.बी. पाटील यांनी विद्यापीठाला रामटेके यांच्या नियुक्तीच्या संदर्भातील माहिती घेण्यास सुरुवात केली.
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार परीक्षा नियंत्रक या पदाकरता आवश्यक असलेली ४५ वर्षांची वयोमर्यादा, एकूण १५ वषार्ंच्या शैक्षणिक अनुभव किंवा अधिव्याख्यातासह आठ वर्षांचा प्रपाठक पदाचा अनुभव शैक्षणिक प्रशासनासह हवा होता. वयोमर्यादा आणि अनुभवाची अट विलास रामटेके पूर्ण करू शकत नव्हते. तरी तत्कालीन निवड समितीने त्यांची परीक्षा नियंत्रक पदावर नियुक्ती केली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या छाननी समितीने रामटेके यांना कुठल्या निकषाच्या आधारे रामटेके यांना पात्र ठरवले व त्यांची निवड कशी काय केली, याचा खुलासा एप्रिल महिन्यात मागितला. विद्यापीठाकडे खुलासा मागवूनही संदर्भहीन उत्तरे दिली जात होती. खुलाशामध्ये २४ मार्च २०१२च्या जाहिरातीमध्ये ‘अनलेस ऑलरेडी इन द सव्‍‌र्हिस ऑफ युनिव्हर्सिटीज् ऑर अ‍ॅफिलेटेड कॉलेजस आर नॉट लेस दॅन ४५ इअर्स ऑफ एज’ त्या अनुषंगाने विलास रामटेके यांचे वय ४२वर्षांचे ग्राह्य़ धरण्यात आले आहे, असे खुलाशात नमूद

करण्यात आले होते. त्यातून सहसंचालकांचे समाधान होत नव्हते. अशाप्रकारे तिनदा त्यांनी खुलासा मागितला.
यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये रामटेके यांच्या वेतन निश्चितीचा मुद्दाही ऐरणीवर होता. दरम्यानच्या काळातही बन्सोड यांनी संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा चालू ठेवला. विलास रामटेके यांची निवड अयोग्य असल्याने त्यांची वेतन निश्चिती स्थगित करावी, अन्यथा त्यानंतरच्या परिणामांची जबाबदारी आपली राहील, असा इशारा वजा निवेदन बन्सोड यांनी सहसंचालकांना देऊ केले होते. त्याचेही एक अप्रत्यक्ष दडपण सहसंचालकांवर होते. गेल्यावर्षी १२ सप्टेंबरला विलास रामटेके यांची परीक्षा नियंत्रक म्हणून निवड झाली. गेल्या एक वर्षांपासूनच्या संपूर्ण घटनाक्रमांचा परिणीती रामटेके यांच्या सेवा समाप्तीत झाली. परीक्षा नियंत्रक म्हणून जेमतेम एक वर्षांचा कालावधी त्यांना उपभोगता आला. त्यातही प्राध्यापकांचे आंदोलन, विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे परीक्षा विभाग जेरीस आला.