मुंबईकरांसाठी सुमारे १०० किमीवरून पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांमधून पाण्याची चोरी हे दृश्य काही नवे नाही. अलीकडेच पाणीचोरी रोखण्यासाठी या जलवाहिन्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची सवंग घोषणाही महापालिकेने केली होती. वास्तविक साध्या डोळ्यांनी जे दिसते त्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची गरज काय, अशा आशयाचा सवाल त्याच वेळी ‘लोकसत्ता’ने केला होता. कांदिवली (पूर्व) येथील दामू नगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून गेली अनेक वर्षे रोज पाणीचोरी होत आहे. ‘लोकसत्ता’चे छायाचित्रकार दिलीप कागडा यांनी गेल्या दहा वर्षांत अनेकदा ही पाणीचोरी कॅमेऱ्यात बंदिस्त केली. ‘लोकसत्ता’ने पाणीचोरीला प्रसिद्धीही दिली. मात्र पालिकेने त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सध्या पालिकेने ‘पाणीगळती किंवा पाणीचोरीबाबत माहिती कळवा,’ असे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ०२२-२५३२०१४८ हा क्रमांकही दिला आहे. छायाचित्रकार दिलीप कागडा यांनी या क्रमांकावर संपर्क साधून सदर पाणीचोरीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘तुमचे म्हणणे लेखी सांगा’, असे छापील उत्तर देऊन त्यांना मार्गी लावले.