कलाकारांचे फॅन असणं हे जितकं उत्तम तितकंच ते वाईट.. कलाकारांच्या मागे लागलेले फॅन्स आणि त्यांच्या करामती यांचे असंख्य किस्से आपण ऐकलेत. काही फॅन्स तर कलाकारांच्या घराबाहेरच तंबू ठोकून बसलेले असतात. काही तर अशा करामती करतात की, कलाकारांच्या तोंडचं पाणीच पळतं.
आता हेच बघा ना.. सध्या इंडस्ट्रीत चॉकलेट बॉय म्हणून सिद्धार्थ मल्होत्राची इमेज बऱ्यापैकी सर्वाना आवडू लागलीय. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या त्याच्या चित्रपटानंतर त्यांच्या फॅन्सची संख्या वाढू लागली. तो जिथे जाईल तिथे त्याचे फॅन्स त्याला गराडा घालतात. काही जण सिद्धार्थला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातील संवाद म्हणायला सांगतात तर काहीजण त्याची स्वाक्षरी मागतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ दिल्लीला गेल्यावर काही मुलींनी तर त्याची स्वाक्षरी त्यांच्या टॉपवर घेतली होती. असे आक्रस्ताळे उद्योग करणारे फॅन्स कलाकारांच्याही डोक्यात जातात यात काहीच वाद नाही. पण आता तर एक कळसच झाला. सिद्धार्थच्या दोन शाळकरी दिल्लीतील फॅन्सनी त्याच्या नावाने संकेतस्थळ सुरू केले. अर्थात ते सुरु करण्याआधी सिद्धार्थला या फॅन्सनी जुजबी कल्पनाही दिली होती.
परंतु त्यानंतर या दोघा फॅन्सनी त्याच्या संकेतस्थळाच्या नावाखाली सिद्धार्थची स्वाक्षरी असलेल्या टी-शर्टची विक्री करण्यास सुरुवात केली. याकरता त्यांनी सिद्धार्थच्या स्वाक्षरी असलेले टी-शर्टस् बनवले आणि ते संकेतस्थळाच्या माध्यमातून विकण्यास सुरुवात केली. यामुळेच चॉकलेट हिरो सिद्धार्थ चांगलाच भडकला. त्याने चक्क या शाळकरी फॅन्सवर दावा ठोकायचे ठरवले. त्यांना आधी त्याने सांगून पाहिले, पण या सांगण्याचा फॅन्सना काहीच फरक पडला नाही. मग त्याने त्याच्या वकिलाकरवी त्यांच्यावर दावा ठोठावला आहे. आता मात्र या दाव्यामुळे फॅन्सच्या तोंडचे पाणीच पळालेय. अशा करामती फॅन्सना आता समोरही उभे करणार नसल्याची दक्षता यापुढे सिद्धार्थ घेणार असल्याचे समजते.