काही लोक उत्साही असतात, बुद्धिमान असतात, जीवनाच्या क्षितिजावर ते येतात, चमकतात अन् अचानक विझून जातात. वन्यजीवसंवर्धक व पक्षिशास्त्रज्ञ डॉ. हरीश भट हे त्यातलेच एक ठरले. सतत निसर्गात रमणारा हा वैज्ञानिक समाजातही तितक्याच मुक्तपणे ज्ञान वाटत फिरत होता. मुलांना संशोधनाकडे वळण्यासाठी वेगवेगळ्या शिबिरांतून साद घालत होता. ठिकठिकाणी व्याख्याने देऊन नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची हे तर त्याचे जणू व्रतच. अलीकडे ते मुडबिद्री येथे एका महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेले होते. तेथेच त्यांचा मेंदूतील रक्तस्रावाने मृत्यू झाला. एका तरुण वैज्ञानिकाला आपण मुकलो. डॉ. हरीश भट यांना पक्षिनिरीक्षणाचा नुसता छंद नव्हता तर त्याचे चांगले शास्त्रीय ज्ञानही होते. विशेष म्हणजे निसर्गातील बारीकसारीक गोष्टींचे अवलोकन हेच त्यांचे श्रेयस आणि प्रेयस होते. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचा झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. विज्ञान क्षेत्रात संशोधन करताना ते कधी समाजापासून दूर राहिले नाहीत. मुलांमध्ये मिसळून त्यांना निसर्गातील अचंबित करणाऱ्या गोष्टी सांगून ते त्यांना याच क्षेत्रात येण्याचा आग्रह करीत असत. बेंगळूरुच्या परिसंस्था अभ्यास वर्तुळात ते अतिशय लोकप्रिय होते. चेहऱ्यावर गंभीरतेचा आव आणून आपण काही तरी वेगळे आहोत, असे दाखवून त्यांनी कधी इतरांना तुच्छ न लेखता सर्वाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळेच ते सर्वाना आपलेसे वाटत होते. त्यांच्या जाण्याने अनेकांना आपल्या घरातीलच प्रिय व्यक्ती गेल्यासारखे वाटले असणार यात शंका नाही.

भट हे बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेचे माजी विद्यार्थी. याच प्रतिष्ठित संस्थेत नंतर ते वीस वर्षे वैज्ञानिक म्हणून काम करीत होते. बेंगळूरुतील नष्ट होत चाललेली तळी-सरोवरे व त्यांच्या भवतालची परिसंस्था, पश्चिम घाटाच्या हिरव्या शालूचे वस्त्रहरण यावर त्यांनी ठोसपणे मते मांडली. जैवविविधता, कर्नाटकातील पक्षिजीवन यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. हिमालयातील पक्षी व दक्षिण भारतातील पक्षी यावर त्यांचा सखोल अभ्यास होता. अनेक शाळांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध तर होताच शिवाय त्यांनी या शाळांना जैवविविधता व फुलपाखरांची उद्याने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शनही केले. त्यांनी अनेक पुस्तके व शोधनिबंध लिहिले पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पर्यावरणाच्या रक्षणासाठीच्या लढाईत सक्रियपणे उतरून काम केले. कर्नाटकच्या एचपीसीएल पाइपलाइन प्रकल्पात चरमाडी घाट वाचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते नुसते प्रकल्पांना विरोध करीत नव्हते तर पर्यावरण हानी टाळून काय करता येईल याच्या सूचना करीत होते.

ते मूळ कर्नाटकातील उडुपीचे. तेथेच त्यांचे शिक्षण झाले, तेव्हापासून त्यांना निसर्गातील विविधता खुणावत होती व तोच नंतर त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. पक्षिप्रपंच हे पुस्तक त्यांनी लिहिले, त्यास कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आदिमाया चैतन्य व वाग्देवी या बेंगळूरुतील संघटनांशी ते संबंधित होते. कन्नडमधून विज्ञानविषयक व्याख्याने देण्यावर त्यांचा भर होता त्यामुळे तो विषय लोकांच्या आत्मीयतेचा बनत असे. सन २०१५ चा ‘विज्ञान संवादक पुरस्कार’ हा त्यांचा आणखी एक सन्मान. अतिशय सोपी भाषा, मोहिनी घालणारे वक्तृत्व यामुळे आपोआपच त्यांचे व्याख्यान ऐकणारे लोक पर्यावरण संवर्धनाची शपथ मनोमन घेतच घरी जात असत. कन्नडमधील म्हणी, निसर्गातील कथा, दंतकथा यांचा सुरेख वापर  करणारे ते एक उत्तम विज्ञान संवादक होते यात शंका नाही.