ऑस्करविजेते पण वादग्रस्त विषय घेऊन लघुपट सादर करणारे अमेरिकी दिग्दर्शक विल्यम ऑलिव्हर स्टोन यांना २०१६ या वर्षीचा ‘गॅरी वेब माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.  दिग्दर्शक म्हणून काम करतानाच त्यांनी अनेक वृत्तपत्रीय संकल्पना लघुपटातून मांडल्या. बातमीला दोन बाजू असतात हे त्यांना माहिती होते, त्यामुळे त्यांनी काही घटनांचा लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांचे लघुपटच काय, पण चित्रपटही वेगवेगळे दृष्टिकोन व शैली यांनी परिपूर्ण आहेत. अनेकदा त्यांचे लघुपट किंवा चित्रपट फसले, पण त्यांनी वेगळी वाट सोडली नाही हे त्यांचे वैशिष्टय़.

विल्यम ऑलिव्हर स्टोन यांचा जन्म न्यूयॉर्कचा, त्यांचे वडील स्टॉकब्रोकर होते. येल विद्यापीठातून नापास होऊन बाहेर पडल्यानंतर ते व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे सैनिक म्हणून रुजू झाले. त्या वेळी साठच्या दशकात प्रतीके मानली गेलेल्या ड्रग्ज, जेफरसन एअरप्लेन व इतर गोष्टींशी त्यांची ओळख झाली. युद्धातील कामगिरीसाठी त्यांना ‘शौर्य’ पुरस्कार मिळाला होता. युद्धावरून परतल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे प्रशिक्षण घेतले व ‘लास्ट इयर इन व्हिएतनाम’ हा पहिला लघुपट तयार केला. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. ‘मिडनाइट एक्स्प्रेस’साठी त्यांना पहिले ऑस्कर मिळाले. १९८६ मध्ये ते खरे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी ‘साल्वादोर’ हा राजकीय चित्रपट दिग्दर्शित केला, पण त्याच दरम्यान ‘प्लॅटून’ हा व्हिएतनाम युद्धावरील त्यांचा चित्रपट जास्त हिट ठरला. त्यानंतर त्यांनी ‘वॉल स्ट्रीट’ हा समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट सादर केला. त्यात उद्योगजगातील सम्राट व स्टॉक ब्रोकर्स यांचे लागेबांधे दाखवले होते. ‘टॉक रेडिओ’ हा एका फटकळ निवेदकावर बेतलेला चित्रपट अनेक गंभीर विषयांवर भाष्य करणारा आहे. पारंपरिक इतिहासातील अनेक आव्हानात्मक व वादग्रस्त विषय त्यांनी मांडले. ‘अनटोल्ड हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेटस’सारख्या कलाकृती त्यांनी सादर केल्या. त्यांचे विषय व मांडणी वादग्रस्त वाटल्याने ते नेहमी टीकेचे धनी ठरले. अमेरिकी मुख्य प्रवाहातील वैचारिक गटांपासून ते वेगळे पडणे अपरिहार्य होते. व्हिएतनाम युद्धाच्या वेळचा प्रोपगंडा घातक होता व लाखो लोक या युद्धात निष्कारण बळी पडले. अमेरिकी सरकारने यात खोटारडेपणा केला, पण त्यातून स्टोन यांनी एक धडा घेतला तो म्हणजे निकोप लोकशाहीसाठी विविध मतमतांतरांना तितक्याच खेळीमेळीने स्थान मिळाले पाहिजे. अधिकारी जे सांगतात ते खरे असे मानण्याचा मूर्खपणा त्यांनी केला नाही, त्यामुळेच त्यांना माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार खरे तर पेशाने पत्रकार नसतानाही त्यांच्या लघुपटातील धाडसी विषयांच्या मांडणीमुळे मिळाला आहे. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी क्यूबाचे फिडेल व रौल कॅस्ट्रो, व्हेनेझुएलाचे ह्य़ुगो चावेझ, बोलिव्हियाचे एव्हो मोराल्स, इक्वेडोरचे राफेल कोरिया, अर्जेटनाचे क्रिशनर्स, ब्राझीलचे लुला दा सिल्वा, पॅराग्वेचे फर्नाडो ल्युगो या अमेरिकी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या नेत्यांचा अगदी जवळून अभ्यास केला होता. अलीकडेच त्यांनी युक्रेन पेचप्रसंगावर ‘युक्रेन ऑन फायर’ हा लघुपट तयार केला. त्यात  युक्रेनमधील नव्या शीतयुद्धात अमेरिकेचा छुपा सहभाग उघड केला आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घेतलेल्या मुलाखती ‘द पुतिन इंटरव्ह्य़ूज’ नावाने जूनपासून शो टाइममध्ये दाखवल्या जाणार आहेत. त्यातून अनेक बाबी उलगडतील यात शंका नाही. त्यांनी वादग्रस्त विषयांना हात घालून अमेरिकेतील हितसंबंधीयांना दणके देण्याचे धैर्य दाखवले हे त्यांचे वेगळेपण. रेगन यांच्या काळात कोकेन तस्करीची अनेक प्रकरणे अमेरिकी प्रशासनाच्या आशीर्वादाने घडली. त्याविरुद्ध लढणारे शोध पत्रकार गॅरी वेब यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार देऊन स्टोन यांचा केलेला गौरव हा उचितच म्हणावा लागेल.