“रमा, उर्वशी, निमा, माधवी, वासंती, राहुल, नितीश अरे, लवकर इथे या. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांसाठी छान ट्रीट आहे.”
आदितीनं नेहमीप्रमाणे काही तरी मस्त खायला आणलंय म्हटल्यावर सगळेचजण जागेवरून उठले. सर्वांनी तिच्या टेबलाभोवती गर्दी केली. आदितीनं प्रत्येक डिशमध्ये खमंग हिरवी पिवळी कैरीची डाळ, लाल कलिंगडाच्या फोडी आणि वाटीत मसालेदार हरभऱ्याची उसळं असा मेनू सजवून ठेवला होता आणि सोबत थंडगार पन्ह्याचे ग्लास तयार ठेवले होते. सर्वांनी डिश उचलल्या आणि तिचे आभार मानत त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.

“तुझ्या चैत्र मेनूची आम्ही वाट बघतच होतो. फारच सुंदर झालंय सगळं.”
“अगं पन्ह किती अप्रतिम झालंय, परफेक्ट आंबट गोड चव.”
“आणि डाळही खमंग हं!”
“चैत्र गौरीचं हळदीकुंकू असं ऑफिसमध्ये करण्याची तुझी पद्धत मला खूप आवडते.”
“ घरातील सर्व कामं, सासू सासऱ्यांचं पथ्य, मुलांच्या शाळा, क्लासेस, ऑफिसचं महत्वाचं टेबल, हे सगळं सांभाळून हे असे वेगवेगळे पदार्थ करून तू नेहमी ऑफिसमध्ये घेऊन येतेस. कसं जमतं तुला हे सगळं? तू खरंच ग्रेट आहेस.” प्रत्येक जण आदितीची आणि तिच्या पदार्थाची स्तुती करत होते.
निमानं डिश घेतली आणि ती जरा नाराजीनं तिच्या जागेवर जाऊन बसली. “हिला सगळ्यांकडून नुसतं कौतुक करून घेण्याची सवय लागली आहे. सर्वांच्या पुढं पुढं करणं मला तर अजिबात जमणार नाही. सांगतं कोण स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करायला? मोठेपणा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते हिची. बॉसपासून शिपायांपर्यंत सर्वजण नुसतं ‘आदिती मॅडम, आदिती मॅडम’ करीत असतात. आणि ही मोठेपणा, कौतुक मिळवण्यासाठी सगळं करीत असते.”

हेही वाचा – पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक

निमाची स्वतःच्या जागेवर बसून स्वगतं चालली होती. माधवीला निमाचा स्वभाव चांगलाच माहिती होता. आदितीचा ती नेहमी मत्सर करते, आदितीचं कौतुक झालेलं तिला आजिबात आवडत नाही, हे तिला माहिती होतं. एकाच ठिकाणी काम करताना आपल्याच सहकाऱ्याबद्दल अशी असूया, मत्सर ठेवणं योग्य नाही. त्याचा मनावर आणि कामकाजावरही परिणाम होतो. टीमवर्क चांगलं होत नाही, म्हणूनच अशा गोष्टी वाढू नयेत असं माधवीला वाटतं होतं. ती मुद्दामच निमाजवळ येऊन बसली आणि तिच्याशी बोलू लागली.

“निमा पन्हं छान आहे ना? उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार पन्हं तना-मनाला शांत करतं. तू घेतलंस की नाही?”

“हो,थोडं घेतलं,पण सगळेच पदार्थ खूप हेवी होते. हे सर्व पदार्थ पचनासाठी चांगले नाहीत आणि शुगरही वाढते. चिरून ठेवलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं.” निमा माधवीकडं तक्रार करीत होती.

“अगं पण सर्वांना किती आवडलं सगळं. उन्हातून प्रवास करून आल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यानं सर्वांचा थकवा गेला. तृप्त झाले सगळे. त्यातील चांगल्या गोष्टी तू बघ.”

“फुकटचं मिळाल्यावर का नाही तृप्त होणार? या आदितीनं सगळ्यांना असं खाऊ घालण्याची वाईट सवय लावली आहे. कशाला वेळ आणि पैसा खर्च करायचा या फुकट्यांवर? त्यांच्याकडून कौतुक करून घेण्यासाठी? त्यांनी चांगलं म्हणावं यासाठी?” तिने आपला राग बोलून दाखवलाच तसं माधवीनं आदितीलाच बोलावून घेतलं आणि विचारलं,

“आदिती, तू नेहमीच काहीतरी पदार्थ ऑफिसमध्ये सर्वांसाठी घेऊन येतेस, उगाचंच एवढा आटापिटा कशासाठी करीत असतेस? आणि सर्वांनाच हे आवडतं असं नाही.”

“माधवी अगं, माझी कुणी वाहवा करावी, मला चांगलं म्हणावं, माझं कौतुक करावं, माझ्या सर्व गोष्टी आवडाव्यात ही माझी अपेक्षा अजिबातच नसते. काही प्रसंगांच्या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ करणं आणि खाऊ घालणं मला आवडतं. त्यात मला कोणतेही कष्ट वाटत नाहीत. ते करण्यातला आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यातील माझा आनंद वेगळा असतो. हे ऑफिससुद्धा माझं कुटुंबच आहे, घरापेक्षाही अधिक काळ आपण ऑफिसमध्ये वावरत असतो, म्हणूनच त्यांनाही खाऊ घालण्यात मला आनंद मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यातील ऊर्जा वाढवतो. मग त्यात कष्ट कसले?”

हेही वाचा – पत्नीची आई झाल्यानंतर नवऱ्याने जोडले विवाहबाह्य संबंध, पतीच्या दुसऱ्या लग्नाआधीच असे तोडले बाशिंग!

“आदिती, खरं आहे तुझं म्हणणं. ज्या गोष्टींची आपल्याला आवड असते जे करण्यात आपल्याला आनंद मिळतो ते आपण करावं. काही लोकांना हे आवडणारही नाही, पण आपल्या करण्यामध्ये स्वार्थ नसेल तर लोक काय म्हणतात याचा विचार करू नये. आपल्या जगण्यातील आनंद आपण शोधावा.”

माधवीनं तिरक्या नजरेनं निमाकडं पाहिलं, ‘लेकी बोले सुने लागे’ याप्रमाणे निमाला काय ते समजलं होतं. आपण उगाचंच आदितीचा मत्सर करतोय का, असा विचार तिच्या मनात उमटला आणि तसं असेल तर का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यात ती गुंतली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)