लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होतो. या दोन वर्षांत आधी ओळख, मग मैत्री, त्यानंतर प्रेम आणि मग लग्न, अशा प्रक्रिया पार पडल्या. दोन वर्षांत माणसं ओळखता येत नाहीत. पण आयु्ष्यभर सोबत राहूनही कधीकधी माणूस परकाच वाटतो, अशी अनेक उदाहरणं मी आजूबाजूला पाहिली होती. त्यामुळे लग्नाच्याबाबतीत मी फार विचार केला नाही. लग्नाचं वय झाल्यावर आई-बाबांना सांगितलं. मुलीनंच मुलगा पसंत केला आहे म्हणून त्यांनीही फार चौकशी केली नाही अन् चारचौघांसारखं जसं विधीवत लग्न होतं, तसं माझंही लग्न झालं.

लग्नाच्या सुरुवातीचे दिवस फार चांगले होते. आजही ते दिवस आठवले की हरखून जाते मी. आजच्या धकाधकीच्या आणि नैराश्यग्रस्त आयु्ष्यात तेच दिवस स्ट्रेसबुस्टर ठरतात. पण सध्या आठवण्यासाठी आणि नैराश्य दूर करण्यासाठी तेवढ्याच आठवणी राहिल्या. कारण त्या दिवसांनंतरचे अनेक वर्षे मी त्रास, अपमान अन् मानहानीच सहन केली आहे.

लग्नाच्या दोन वर्षांत मी आई झाले. आई झाल्यानंतर साहजिकच माझ्या प्रायोरिटिज बदलू लागल्या. नवऱ्याकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं. माझ्यातली पत्नी हळूहळू दूर होऊ लागली आणि माझ्यातील पत्नीची जागा आईने घेतली. म्हणतात ना बाई क्षणभराची पत्नी आणि आयुष्यभराची माता असते, तेच माझ्याही बाबतीत झालं. नवऱ्याने या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत. पण तोही हळूहळू मनाने दूर होऊ लागला. सुरुवातीला माझं या कोणत्याच बदलाकडे फारसं लक्ष गेलं नाही. पण नंतर नवऱ्याचं जास्तवेळ बाहेर राहणं खटकू लागलं. एक दिवसही घराबाहेर न राहणारा न नवरा ऑफिस मीटिंगच्या नावाखाली दोन-चार दिवस बाहेर राहू लागला. सुरुवातीला वाटलं आता जबाबदारी वाढली आहे तर ऑफिसमध्ये अधिकचं काम करून अधिकचे पैसे कमावत असतील. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातही कमालीचा फरक जाणवत होता. ऑफिसला गेल्यावर नियमित फोन करणारा माझा नवरा आता मी स्वतःहून फोन केला तरी उचलत नसे. मुलाची विचारपूस करण्याकरताही त्यांनी कधी फोन केला नाही. याबाबत विचारलं असता ऑफिसला जाऊन तुझ्याशीच बोलत बसू का असं उर्मट उत्तरही दिलं त्यांनी.

हेही वाचा >> आईने लेकीच्या सासरी रमू नये, पण घरच लेकीचं असेल तर? सूनेच्या घरावर हक्क कोणाचा?

माझा सर्वाधिक वेळ मुलाच्या संगोपनात जात होतं. त्यामुळे मीही फार दुर्लक्ष करू लागले. पण एकदा ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले ते पंधरा दिवस परतलेच नाहीत. रोज फोन करत होते, पण ते कामाचं कारण सांगून हाय हेल्लो करून फोन ठेवत होते. परत कधी येणार हे विचारल्यावर त्यांनी काहीच ठोस सांगितलं नाही. मला इथं फारच संशय आला. त्यांचं वागणंही संशयाला वाव देणारं होतं. नवऱ्यावर अविश्वास दाखवू नये, संसारात संशय शिरला की संसाराचं वाटोळं होतं हे मी इतरांच्या संसारातून शिकले होते. पण तरीही धीर राहवत नव्हता. त्यांच्या ऑफिसमध्ये विचारावं असं एकदा मनात आलं. पण खरंच ते कामानिमित्त गेले असतील तर उगाच आम्हा दोघांमध्ये संशयावरून वाद निर्माण होतील आणि मीच तोंडावर पडेन असं मला वाटलं. पण मनातला संशय मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांच्या एका सहकाऱ्याचा नंबर माझ्याकडे होता. त्यांना फोन लावला. पण एकाच बेलमध्ये मी तो फोन कट केला. मला हे फार मोठं आव्हान वाटत होतं. नवरा-बायकोतील बिनसलेलं तिसऱ्यापर्यंत पोहोचलं तर उगीच संसरात मतभेद होतात. पण त्यांच्या अशा वागण्याचा त्रास कमी होत नव्हता. काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं. त्यामुळे मी विचार केला की आधी त्यांनाच थेट विचारावं. त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे आली तर पुढचं पाऊल उचलावं.

त्यामुळे मी फोन घेतला आणि त्यांचाच नंबर डायल केला. त्यांनी उचललाच नाही. मी पुन्हा त्यांना फोन लावू लागले. पण फोन उचललाच जात नव्हता. डोक्यात वाऱ्याच्या वेगाने विचार फिरत होते. आपला संसार मोडतोय की काय असं वाटायला लागलं. संपूर्ण शरारीत घाम फुटू लागला. लेकराला कुशीत घेऊन खूप रडले. शेवटी त्यांच्या मित्राला फोन करून विचारावं या निष्कर्षाप्रती मी आले.

धीर एकवटला आणि त्यांच्या मित्राला फोन केला. ऑफिसच्या कामानिमित्त तुमच्या ऑफिसमधून कोणाला बाहेर पाठवलंय का असा थेट प्रश्न मी त्यांना केला. तेही थोडावेळ आधी शांत राहिले. त्यांच्या शांततेतच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं होतं. पण तरीही मला त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. मी पुन्हा म्हटंल की मी माझं मन घट्ट केलंय. जे काही असेल तर स्पष्ट बोला. यात तुमचं नाव कुठेच येणार नाही. त्यांनी दीर्घ श्वास घेत सांगितलं, “मी तुम्हाला हे आधीच सांगणार होतो. पण नवरा बायकोमध्ये वाद नकोत म्हणून मी गप्प होतो. शेवटी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्याच. गेले काही दिवस ते एका मुलीला डेट करत आहेत. त्यांचं प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. पण मी तुम्हाला सावध करतोय. तुमच्या लग्नाआधीही त्याचे अनेक अफेअर्स होते. आम्हाला वाटलेलं लग्नानंतर तो सुधरेल. पण नाही. तो सुधारणाऱ्यातला नाही. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो विचारांती घ्या.”

हे शब्द म्हणजे माझ्या कानात कोणीतरी गरम तेल ओतल्यासारखे वाटत होते. पण निर्णय घेणं गरजेचं होतं. पदरात एक मुलगा असतान एखादा पुरुष दुसऱ्या लग्नाचा विचार कसा करू शकतो? अशा लोकांना मोकळीक दिली तर ते अनेकांचे संसार उद्ध्वस्त करतील. माझं आयुष्याची माती तर झाली पण आता मला दुसऱ्या बाईच्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे मी त्या महिलेचा शोध घेतला. तिच्याशी मैत्री केली, तिला विश्वासात घेतलं. या दरम्यानच्या काळात माझा नवराही घरी आला होता. पण मी त्याला कसलाच सुगावा लागू दिला नाही. त्या महिलेला विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण माहिती सांगितली. दुर्दैवाने या नालायक इसमाने त्याचं लग्न झालंय हेच तिला सांगितलं नव्हतं. त्याच्या लग्नाबद्दल कळल्यानंतर तिला धक्काच बसला. तिनंही त्याच्याबरोबरचे संबंध तोडले आणि मीही कायमचे त्यांच्या आयुष्यात निघून गेले.

-अनामिका