आज काळ कितीही बदलला असला तरी अजूनही असे अनेक विषय आहेत की, ज्यावर उघडपणे चर्चा होत नाही. आपण अशा वातावरणात राहतो; जिथे प्रजनन आणि लैंगिक आरोग्याबाबत उघडपणे चर्चा केली जात नाही. अशा काळात ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती हार्मोनल असंतुलन आणि रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळातील आपल्या प्रवासाबद्दल उघडपणे आपली मते मांडताना दिसतात.

रजोनिवृत्तीवर चर्चा करण्यात काही गैर नाही

सुधा मूर्ती यांच्या असंख्य मुलाखती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, शैली चोप्रा यांनी ‘शी द पीपल’द्वारे घेतलेल्या मुलाखतीदरम्यान सुधा मूर्ती यांच्याशी उघडपणे चर्चा न केल्या जाणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल संवाद साधला. सुधा मूर्ती आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतात? रजोनिवृत्तीच्या काळात त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याबद्दल त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली.

माझ्या वडीलांनी मला रजोनिवृत्तीबद्दल सांगितले

रजोनिवृत्तीबाबत सांगताना मूर्ती यांनी सांगितले, “अर्थात, मला या विषयाबद्दल आधीपासून माहीत होते. माझे वडील स्त्रीरोगतज्ज्ञ होते. जेव्हा मी तरुण होते, तेव्हा ते म्हणाले, ‘आता तुझे हार्मोन्स जास्त वाढले आहेत. त्यामुळे तुझी त्वचा चमकते आहे. तुम्ही आरशात अनेक वेळा पाहता. एक दिवस असा येईल की, तुमच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होईल आणि तुम्हाला रजोनिवृत्तीला सामोरं जावं लागेल; पण तुम्ही त्याला आजार समजू नका.”

सुधा मूर्ती म्हणाल्या, “माझे बाबा माझे चांगले मित्र होते. ते मासिक पाळीबद्दल बोलत असत. मासिक पाळी म्हणजे काहीही चुकीचं नाही. हा शाप किंवा अशुद्धता नाही. हा तुमच्या हार्मोनल संतुलनाचा भाग असायला हवा. त्यांनी एक मुद्दा मांडला की, तुम्ही या गोष्टी सामान्य गोष्ट म्हणून स्वीकारा.”

मूर्ती यांच्या वडिलांनी रजोनिवृत्तीसारख्या विषयांबद्दल त्यांच्याबरोबर विसाव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोकळेपणाने संवाद साधला.

बदल जसे येतील तसे स्वीकारा!

रजोनिवृत्तीबद्दल सर्व माहिती असूनही त्यांना कधी भीती वाटली का, असे विचारले असता, मूर्ती यांनी उत्तर दिले की, “नाही. मला माहीत होतं की, जेव्हा माझ्या हार्मोन्समध्ये बदल होतील, तेव्हा ते मला स्वीकारले पाहिजेत. जेव्हा माझ्या त्वचेला सुरकुत्या पडतील, माझं वजन थोडं वाढेल, कधी कधी मला अस्वस्थ वाटू शकेल, कधी कधी मला काहीच त्रास जाणवणार नाही. कधी कधी मला खूप चांगलं वाटू शकतं. तेव्हा मी नेहमी लक्षात ठेवते की, हे सर्व हार्मोन्समधील बदलांमुळे होत आहे आणि मला आठवतं की, मला काम करणं, वाचणं, व्यायाम करणं किंवा चित्रपट पाहणं आवडतं, तेच करीत राहिलं पाहिजे.”

हेही वाचा – एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

सुधा मुर्ती यांना सांगितला रजोनिवृत्तीच्या काळात अनुभवलेला प्रसंग

रजोनिवृत्तीचा भावनिक परिणाम होत असल्याचे जाणवले त्या वेळच्या एका प्रसंगाबद्दल मूर्ती यांनी सांगितले, “एक दिवस माझी दोन्ही मुलं बाहेर गेली होती आणि मला अचानक त्यांची आठवण आली आणि रडू आलं. मला आश्चर्य वाटलं, ‘ते अमेरिकेत शिकायला गेले तेव्हा मी रडले नाही; मग आता का? मी आता का रडतेय’, असा प्रश्न मला पडला. मग मी दोन मिनिटं विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘अरे, हे माझ्या हार्मोन्समुळे झालंय.’ “

सुधा मूर्ती यांच्या वडिलांनी रजोनिवृत्तीबद्दल त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे त्यांना या काळात खूप मदत झाली.

मेनोपॉज दरम्यान पती नारायण मुर्ती यांनी कशी दिली साथ?

हार्मोनल बदल हे स्त्रीच्या शारीरिक बदलांपेक्षा जास्त असू शकतात आणि ते त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतात. सुधा यांच्यामध्ये होणारे बदल पती नारायण मूर्ती यांनी कसे हाताळले याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, “मी श्री. मूर्ती यांना सांगितले की, जर मी विनाकारण एखाद्या गोष्टीमुळे नाराज झाले, तर त्याला हार्मोनल बदल समजा. तो विषय हसून सोडून द्या किंवा ते फारसं गांभीर्यानं घेऊ नका.”

हेही वाचा – घरात मशरुमची लागवड करून दिवसाला २००० रुपये कमावतेय ही महिला उद्योजक

“बाळाला दूध पाजण्यापूर्वी मी जेवत असे”

सुधा मूर्ती यांनी, महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि त्यास प्राधान्य देणं याला महत्त्व दिलं पाहिजे यावर भर दिला. त्या सांगतात, “जेव्हा मी बाळाला दूध पाजत असे, तेव्हा मी आधी जेवत असे. बाळाला दूध पाजल्यानंतर मी खाल्लं, तर मला कंटाळा येत असे.”

मूर्ती पुढे सांगतात, “स्त्रिया नेहमी त्यांच्या पतीच्या आरोग्याची, मुलांच्या आरोग्याची किंवा सासू-सासऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. घरातील सगळ्यांचे जेवण झाल्यावर जे उरलेलं जेवण असतं, त्यावर स्वत:ची भूक भागवतात; पण महिलांनी इतरांची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांनी तयार केलेलं अन्न आधी स्वतःसाठी बाजूला काढून ठेवू शकतात आणि मग इतर सर्वांना जेवायला वाढू शकतात.”

“जर एखाद्या महिलेचे आरोग्य चांगले असेल, तर संपूर्ण कुटुंब चांगले राहते,” असे मूर्ती यांचे मत आहे.

सुधा मूर्ती महिलांना ‘योग्य गोष्टी खाऊन’ स्वत:ला निरोगी सवयी लावण्यास सांगतात. महिलांनी पौष्टिक आहार घ्यावा, व्यायाम करावा आणि गोड किंवा तेलकट आहारावर नियंत्रण ठेवावं, असे त्या सांगतात.