रेश्मा भुजबळ

नेपाळमध्ये गरीब, अशिक्षित कैद्यांचं जीवन म्हणजे नरकयातनाच. अनेकांची मुलं लहान असल्याने त्यांचे पालनपोषण करायला कोणीच नसल्याने अनेक कैदी शिक्षेच्या कालावधीत मुलांना आपल्याबरोबर तुरुंगात घेऊन जात. तुरुंगातील वातावरणामुळे अशा मुलांचे बालपण करपून जाई. शिक्षणाअभावी आणि प्रेमाचा ओलावा नसल्याने अशी मुलंही नकळत गुन्हेगारीकडे वळत असत. या मुलांकडे पाहून व्यथित झाली एक तरुणी. कारागृहाच्या गजाआड जन्मलेल्या मुलांसाठी किंवा त्यांच्या आईसोबत कारागृहात असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून मानाने जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय तिने घेतला. ती तरुणी म्हणजेच इंदिरा राणा मगर. आणि त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिली ‘प्रिझनर्स असिस्टंट नेपाळ’ ही संस्था.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
posthumous organ donation of two women gave life to four people
शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

नेपाळमधील पूर्व भागातील एका गरीब शेतमजुराच्या तीन मुलांमध्ये इंदिरा सर्वात लहान. दिवस उजाडल्याबरोबर आई-वडील शेतावर काम करण्यासाठी निघून जात. घरी त्या एकट्याच असत. दोन्ही मोठे भाऊ शाळेत जात होते. मात्र घरच्या गरिबीमुळे इंदिरा यांना शाळेत घातले नव्हते. दिवसभर इंदिरा लाकडं गोळा करणे, स्वतःची तसंच गावातील अन्य लोकांची गुरं राखणे, मासे पकडणे अशी कामं करत फिरत असायच्या. त्यांना कामाचा कंटाळा नव्हता. त्यामुळे सर्वांनाच मदत करणारी मुलगी म्हणून त्यांना गावात ओळखत असत.

इंदिरा यांना अभ्यास, शाळा यांची प्रचंड आवड होती. त्यासाठी त्यांनी दोन्ही भावांना शिकवण्याची गळ घातली. त्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. मुळातच मेहनती असल्याने आणि शिकण्याची आवड असल्याने त्यांनी भावांचा अभ्यासक्रम काही दिवसांतच पूर्ण केला. दिवसभर काम करत असताना भावांनी शिकवलेल्या अभ्यासाची त्या वाळूवर काडीने लिहून उजळणी करत असत. त्यांच्या अभ्यासाची प्रगती भावांच्या शिक्षकांना कळल्यावर शिक्षकांनी इंदिरांच्या आई-वडिलांकडे त्यांनाही शाळेत घालण्यासाठी आग्रह केला. आणि इंदिरांची शाळा सुरू झाली. शाळा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी स्वकमाईने पूर्ण केलं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त इंदिरा नेपाळची राजधानी काठमांडू येथे आल्या. प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यां पारिजात यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी १९९०च्या सुमारास ‘प्रिझनर्स असिस्टंट मिशन’ या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. पारिजात यांच्या संस्थेप्रमाणेच अनेक संस्था राजकीय कैद्यांसाठी कार्य करत असताना इंदिरा यांनी मात्र गरीब आणि सामान्य कैद्यांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी कैद्यांच्या मुलांना जमिनीवर अक्षरे गिरवताना पाहिले आणि तिथेच त्यांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

नेपाळमध्ये गरीब, अशिक्षित कैद्यांचं जीवन म्हणजे नरकयातनाच. तिथे कैद्यांच्या राहण्याची, जेवणाखाण्याची योग्य सोय तर नव्हतीच. शिवाय शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना समाज स्वीकारतही नसे. हाताला काम नाही, समाजाने वाळीत टाकलेले, त्यातच शिक्षा भोगून कसे तरी जगत असताना कुठलाही गुन्हा झाला तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला असे. त्यामुळे गुन्हेगारीतून बाहेर पडण्याऐवजी असे गुन्हेगार पुन्हा गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत असत. अनेकांची मुलं लहान असल्याने त्यांचे पालनपोषण करायला कोणीच नसल्याने अनेक कैदी शिक्षेच्या कालावधीत त्यांना आपल्याबरोबर तुरुंगात घेऊन जात. तुरुंगातील वातावरणामुळे अशा मुलांचे बालपण करपून जाई. शिक्षणाअभावी आणि प्रेमाचा ओलावा नसल्याने अशी मुलंही नकळत गुन्हेगारीकडे वळत असत. तुरुंगातील कैद्यांसाठी काम करताना इंदिरांना या अशा अनेक गोष्टी जाणवल्या. त्यातूनच मग त्यांनी तुरुंगातील कैद्यांच्या मुलांसाठी, कैद्यांसाठी, महिलांसाठी तुरुंग प्रशासनाच्या मदतीनेच कार्य करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ‘प्रिझनर्स असिस्टंट नेपाळ’ ही संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे कैद्यांच्या मुलांना शिक्षण, घरगुती वातावरण देऊन एक चांगला नागरिक बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. कैद्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य सुरू केले. महिला कैद्यांसाठीही विशेष शिक्षण सुरू केले. इतक्यावरच न थांबता इंदिरा यांनी कैद्यांच्या नातेवाइकांशी चर्चा करून कैद्यांबरोबरच त्यांचेही समुपदेशन करून शिक्षा भोगल्यानंतर गुन्हेगारांना समाजात मिसळता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

केवळ कैद्यांसाठीच नव्हे तर एकंदरच ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळण्यासाठी इंदिरा यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्या ‘एज्युकेट गर्ल चाइल्ड’प्रकल्प देखील चालवतात. त्याद्वारे त्या म्याग्दी, कास्की, झापा आणि काठमांडू येथील ३८ हून अधिक कुटुंबातील मुलींना शिक्षण देत आहेत.

सध्या इंदिरा यांच्या संस्थेतर्फे ‘चिल्ड्रन होम्स’, शाळा, तरुणांसाठी ऑरगॅनिक शेती, कला, हस्तकला शिक्षण कार्यक्रम चालवण्यात येतात. हरवलेल्या मुलांचे किंवा हरवलेल्या, तुरुंगात गेलेल्या पालकांचा शोध घेणे. त्यांना त्यांच्या मुलांची किंवा पालकांची भेट घालून देणे, महिला कैद्यांच्या लहान मुलांना त्यांच्या आईजवळ राहण्याची परवानगी मिळवून देणे, अशी अनेक कामं इंदिरा संस्थेच्या मार्फत करतात. इंदिरा यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक मुलांची तुरुंगातील जीवनापासून सुटका करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. मानाने जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांची अनेक मुले-मुली नर्स आहेत. खेळाडू, कलाकार आहेत. “मुलांना आयुष्यात चांगली कामगिरी करताना पाहून मला खूप आनंद होतो, मी फक्त एकाला जन्म दिला, पण हजारो जण मला आई म्हणतात,” असे इंदिरा अतिशय अभिमानाने सांगतात.

इंदिरा यांच्या कार्याची दखल घेऊन ‘वर्ल्ड चिल्ड्रन्स प्राइझ’ या पुरस्कारासाठी त्यांना २०१४मध्ये नामांकन देण्यात आले होते. त्याच वर्षी स्वीडनच्या राणी सिल्व्हिया यांच्याकडून ‘वर्ल्ड चिल्ड्रेन्स ऑनररी अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे. २०२२ च्या नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीकडून इंदिरा राणा मगर यांना नेपाळच्या कायदेमंडळात सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. २१ जानेवारी २०२३ रोजी इंदिरा राणा मगर यांची संसदेच्या तिसऱ्या उपसभापती म्हणून निवड झाली.

आता पन्नाशीत असलेल्या इंदिरा यांना विश्वास आहे की समाजसेवेला कालमर्यादा आणि निश्चित साध्य, लक्ष्य नसते. तुम्ही कधीही मानवजातीची सेवा सुरू करू शकता.

reshmavt@gmail.com