‘आरोग्यम धनसंपदा’ असे आपण म्हणतो, तेच आपण लावलेल्या वनस्पतींनाही लागू पडते. वनस्पतींच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे आरोग्य चांगले राहील याची दक्षता घ्यावी लागते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे तुकोबांनी सांगितले आहे. उत्तम बियाणे, उत्तम प्रतीचा मातृवृक्ष अथवा उत्तम प्रतीचे रोप लावणे ही प्राथमिक गरज आहे. रोपवाटिकेत रोप निवडताना सशक्त, टवटवीत, दमदार रोप निवडावे, बियांपासून लागवड करत असल्यास टपोरी बी निवडावी.

रोपांची लागवड केल्यावर त्याभोवती नीमपेंड भुरभुरावी. नीमपेंड कुजताना व त्याचे विघटन होताना त्यातून सल्फर डाय ऑक्साईड व फेनोलिक संयुगे बाहेर पडतात, यामुळे सूत्रकृमी या रोगास प्रतिबंध होतो. रोपवाटिकेतून भाज्यांची उदा., वांगी, मिरची, टोमॅटो इ. रोपे आणल्यास ती जेमतेम चार ते सहा इंच उंच असतात. ही रोपे एक फूटभर उंच होईपर्यंत त्यांना पंधरा दिवसांनी एकदा खोडाजवळ राखेचे रिंगण करावे. अथवा राख भुरभुरावी. त्यामुळे नाजूक रोपाचे खोड खाणाऱ्या अळीपासून संरक्षण होते. मावा, पांढरी माशी, मिली बग, खोड अळी, करपा असे विविध रोग, किडी झाडांवर आक्रमण करू शकतात. भरपूर ऊन असेल तर किडी कमी येतात.

How to recognize that body water is decreasing in summer and How do you care
Health Special: उन्हाळ्यात शरीरातले पाणी घटते आहे ते कसे ओळखाल? काळजी कशी घ्याल?
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार

लक्षात ठेवा, काही किडींना काही झाडे आवडतात. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कर्दळ, जास्वंद, पेरू, आवळा, टोमॅटो यावर हमखास होतो. थोडय़ाच भागावर पांढरी माशी असेल तर तो भाग कापून नष्ट करणे, मातीत नीमपेंड मिसळणे, पण जास्त प्रमाणात झाल्यास पिवळय़ा रंगाच्या प्लास्टिकच्या एक इंच पट्ट्या करून त्यास व्हॅसलीन वा पेट्रोलियम जेली लावून बागेत झाडांना या पट्ट्या स्टेपलरने अडकवाव्यात. पांढरी माशी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते व पेट्रोलियम जेलीस चिकटते. हा सोपा व स्वस्त उपाय आहे. टोमॅटोसारख्या झाडांचा जीवनक्रम संपत आल्यावर त्या झाडावर पांढरी माशी आक्रमण करते. त्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता घटली, पानांचा आकार लहान झाला, फुलांची संख्या घटली की रोपे काढून टाकावीत, ज्यामुळे बागेत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होणार नाही.

हेही वाचा… समलिंगी विवाहांना सध्यातरी कायदेशीर मान्यता नाही, पुढे काय?

पावटावर्गीय वेलांवर मावा हमखास येतो. माव्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता कमी होते. मावा आल्यास दहा-बारा मिरच्या मिक्सरमधून फिरवून पेस्ट करावी. त्यात एक लीटर पाणी घालून ते गाळून घ्यावे. त्यात एक चमचा साबण पावडर घालून हलवून ते पाणी वेलींवर फवारावे.

झाडाप्रमाणेच किडीचे वाढीचे टप्पे असतात. कीड झाडावर बस्तान बसवते. झाडाचे शोषण करून स्वत:चे पोषण करते. स्वत:ची प्रजा वाढवते. या प्रत्येक टप्प्यावर आपण झाडाचे संरक्षण करू शकतो. पाण्याचा फवारा मारून पाने स्वच्छ ठेवणे, नीमतेलाचा फवारा दोन महिन्यांतून एकदा मारणे, दारात कडुनिंब असेल तर त्याच्या पानांचा रस पाण्यातून फवारणे, तंबाखूची पाने रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घेणे, त्यात १ चमचा साबण पावडर घालून ते पाणी फवारणे.

उग्र वासाच्या पाण्याने कीड झाडापासून दूर जाते. त्याची प्रजननक्षमता कमी होते. नवीन प्रजेची वाढ होत नाही.

परसबागेत झेंडू, पुदिना, लसूण व मोहरी यांना जरूर जागा ठेवा. त्यांच्या उग्र वासाने किडी बागेपासून दूर राहतात. झेंडूमुळे जमिनीतील सूत्रकृमी या रोगाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध होतो. मोहरीवर कीड प्रथम आक्रमण करते. भुरी रोग मोहरीवर प्रथम येतो. अशा वेळी मोहरीची पाने खुडून नष्ट करावीत, जेणे करून बागेतील इतर झाडांचे रक्षण होते. बागेत झाडांची विविधता ठेवली तरी किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

झाडावर कीड पडणे अथवा बुरशीजन्य वा अन्य संसर्गामुळे झाड रोगग्रस्त होणे यात महत्त्वाचा घटक असतो झाडाची प्रतिकारशक्ती. पेंटर या शास्त्रज्ञाने झाडाच्या प्रतिकारशक्तीविषयी सखोल संशोधन करून निष्कर्ष काढला, की प्रत्येक जातीची प्रतिकारशक्ती, किडींना तोंड देण्याची क्षमता वेगळी असते. जनुकीय बदलानुसार ती बदलते. कीड व झाड यांच्यातील संघर्षांत किडीचे यश, अपयश झाडाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते, हे लक्षात घेतले तर रोगाचा प्रतिबंध करणे सोपे जाते. झाडाचे पोषण माती करते, ही माती सकस, सजीव असेल तर झाड स्वबळावर, स्वसंरक्षण करू शकेल. मग आपण करायचे फक्त प्रतिबंधात्मक उपाय!

हेही वाचा… ग्राहकराणी: थ्रीडी चष्मा मोफतच मिळायला हवा…

बागेतील पक्षी झाडांचे किडीपासून संरक्षण करतात. पावसाळ्याच्या दिवसांत अथवा जास्त ओल असलेल्या ठिकाणी गोगलगायी होतात. त्या चिमट्याने उचलून काढून टाकाव्या लागतात. माझ्याकडे गोगलगायी झाल्यास दोन-तीन भारद्वाज पक्षी येऊन त्या फस्त करून टाकतात. आमचे काम कमी करतात.

झाडे सशक्त, टवटवीत राहण्याची खूप कारणे आहेत. त्यातले एक म्हणजे झाडांशी संवाद. झाडे व्यक्त होतात, त्यांना काय हवे ते खोड, पाने, फुले, फळे सांगतात ते जाणून घ्या. संवाद हे आरोग्याचे मर्म आहे.