-अर्चना मुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसुंधराने नवीन बंगला विकत घेतला होता आणि त्या आनंदात तिने आपल्या परिसराची सैर सुरू केली. अचानक तिच्या लक्षात आलं, की तिच्या शेजारच्या बंगल्यात सुप्रिया वहिनी राहातात आणि त्यांच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. वसुंधराला कुत्र्यांची भीती वाटायची त्यामुळे ती प्रचंड वैतागली. सुप्रिया वहिनींकडे सिंबा आणि हनी ही कुत्र्यांची जोडी होती. आणि फारशी त्रासदायक नव्हती तरीही वसुंधरा चिडलेली होती.

एक दिवस सिंबा आजारी असल्याने खूपच रडत होती. तिच्या रडण्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता. खरं तर सुप्रिया वहिनींनी प्राण्यांच्या डॉक्टरना बोलावलं होतं. वहिनी लोकांना त्रास होऊ नये म्हणून खूप काळजी घेत होत्या. पण सिंबाचं रडणं थांबत नव्हतं. वसुंधराला सिंबाचा आवाज सहन होत नव्हता. ती सरळ सुप्रियांच्या घरी गेली. म्हणाली, “कुत्री सांभाळता येत नाहीत तर आणता कशाला? शेजाऱ्यांना का त्रास देता. तुम्हाला आवडत असतील कुत्री, पण शेजाऱ्यांना आवडत नाहीत, त्यांना कुत्र्यांची भीती वाटत असेल याचं भान तुम्हाला नको का? मुळात आम्ही सुद्धा हे घर विकत घेतलं आहे. आमच्या आनंदासाठी. आम्हाला शांतपणे जगता यावं म्हणून. तेव्हा प्लीज सुप्रिया वहिनी, या सिंबा फिंबाला सोडून या कुठेतरी. आम्ही तुमच्याबरोबर राहू शकतो. या कुत्र्यांबरोबर नाही.”

आणखी वाचा-ग्राहकराणी : तुमची ‘ओळख’ कुणी चोरत नाही ना?

“ हे बघा वसुताई. आम्ही या घराचे मालक आहोत. या घरात कुणी राहायचं आम्ही ठरवतो. एकतर यांची सिंबा आणि हनी अशी नावं आहेत. सारखं कुत्रा कुत्रा म्हणू नका. आमच्या मुलांसारखं त्यांच्यावर आम्ही प्रेम करतो. तेंव्हा तुम्ही इथून जा. सिंबाला बरं वाटलं की ती रडायची थांबेल.”

वसुंधराने सोसायटीत घर घेताना आपले शेजारी कोण अशी चौकशी केली होती. पण कुणाकडे कुत्री वा पाळीव प्राणी आहेत का? याची तिने चौकशी केली नव्हती. वसुंधराने गाडी काढली. सोसायटीच्या बिल्डरचं ऑफिस गाठलं. ती त्यांना ओरडायला लागली. “तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्ही इथे बंगला घेतलाच नसता. आम्हाला तुम्ही फसवलं आहे. हा बंगला घेऊन आम्ही भीती, असुरक्षितता, निद्रानाश अशा आजारांना निमंत्रण दिलंय. त्या कुत्र्यांना सोसायटीच्या बाहेर काढा.”

बिल्डरनी सुप्रियावहिनींना फोन केला. परिस्थिती समजून घेतली. त्यावेळी सिंबाचे डॉक्टर तिथेच होते. बिल्डर त्यांना भेटायला गेले. तेंव्हा डॉक्टर म्हणाले, “कुत्रा पाळण्याचे काही नियम असतात. ते जर सगळ्यांनी समजून घेतले तर कुत्र्यावरून शेजाऱ्यांमधे होणारी भांडणं थांबतील.” डॉक्टरांनी अत्यंत सोप्या भाषेत कुत्रा पाळताना सामाजिक जबाबदारीचं भान ठेवणं आणि त्यासाठी सरकारी नियमांचं पालन करणं किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली.

आणखी वाचा-ग्राहकराणी: जाहिरातींना भुलताय?

ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने पाळीव कुत्र्यांसाठी काही नियम केले आहेत ते असे…

१) कुत्रा वा अन्य पाळीव प्राणी पाळायचे असतील तर त्यांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये.
२) शेजाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) भारतीय संविधान आर्टिकल ए (जी) नुसार प्रत्येक नागरिकाला प्राण्यांवर प्रेम करण्याचा अधिकार आहे.
४) अधिनियम १९६० ११(३) नुसार हाऊसिंग सोसायटीतील घरमालक किंवा भाडेकरू यांना कुत्रा पाळण्याचा अधिकार आहे.
५) कुत्रा खूप जास्त भुंकत असेल तर मालकांनी त्याची काळजी घ्यावी. कुत्र्यावर योग्य उपचार करावेत.
६) कुत्र्याचा मोठा आवाज, घाणेरडा वास आदीसाठी कुत्र्याच्या मालकांना पहिल्यांदा समज द्यावी. तरीही ते काही उपाययोजना करत नसतील तर ध्वनि प्रदूषण आणि आरोग्याला धोका या कारणास्तव न्यायालयात तक्रार केली जाऊ शकते.
७) कुत्रा, मांजर, ससा, पोपट अशा पाळीव प्राण्यांसाठी अपार्टमेंटमधील लिफ्ट, सोसायटीतील गार्डन वापरण्यास परवानगी आहे. त्यासाठी सोसायटी कोणतेही वेगळे चार्जेस लावू शकत नाही.
८) नवीन पाळीव प्राण्यांच्या धोरणानुसार नियमांचे पालन न केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
९) एखाद्या पाळीव कुत्र्याने सोसायटीतील रहिवाशाचा चावा घेतला तर जखमी व्यक्ती भारतीय दंड संहिता (आय पी सी) च्या कलम २८७ आणि ३३७ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करु शकतात. तक्रार दाखल करणाऱ्याने कुत्र्याचा मालक निष्काळजी होता. विनाकारण कुत्र्याने हल्ला केला हे सिध्द केल्यास आणि मालक दोषी आढळल्यास त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते किंवा तुरुंगवास भोगावा लागतो.
१०) मालकाने पाळीव प्राण्याचे लसीकरण वेळोवेळी करणे बंधनकारक आहे.
११) कुत्र्याने घाण केल्यास मालकाने ती जागा स्वच्छ करावी.

अलिकडे एकटेपण कमी करण्यासाठी, लहान मुलांना कुत्रा आवडतो म्हणून, प्रतिष्ठेसाठी अशा कारणांनी कुत्रा पाळला जातो. त्याची काळजी मात्र सगळेच मालक घेतात असं नाही. ती घ्यावी. शिवाय असे शेजारी ज्यांच्याकडे कुत्रा नाही त्यांनी सतत कुत्र्याचा त्रास होतोय असा बाऊ करू नये. सर्व नियम पाळून जर शेजारी कुत्रा सांभाळला जात असेल तर तक्रार करु नये. नियम समजून घ्यावेत. त्यामुळे एकमेकांना त्रास होणार नाही. वसुंधरासारख्या ग्राहकराणीला शेजारच्या कुत्र्यांमुळे सोसायटीत बंगला खरेदी केल्याचा पश्चाताप होणार नाही. फसले गेलोय ही भावना मनात रुजणार नाही.

समुपदेशक, सांगली.
archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the solution if annoyed by the neighbours pets mrj