युद्ध असो किंवा सामना, तो शांत चित्तवृत्तीनेच जिंकता येऊ शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामन्यात आला. भारताने सामना जिंकत विजयी परंपरा कायम राखली. विजयानंतर जल्लोष आलाच, पण दुसरीकडे या सामन्यात कोणत्या गोष्टी चांगल्या घडल्या आणि wc11कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणेची गरज आहे, याचाही विचार व्हायला हवा.
सामन्याच्या दुसऱ्या षटकापासूनच हा सामना किती दडपणाखाली आणि ईर्षेने खेळला जातो, याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली. सोहेल खाननचा चेंडू शिखर धवनच्या बॅटवरून पॅडवर आला त्या वेळी त्याने अपील केले नाही. थोडय़ा वेळाने अपील करत त्याने थेट ‘डीआरएस’साठी हात उंचावले, त्या वेळी कर्णधार मिसबाहने चेंडू बॅटला लागल्याचे सांगत सोहेलला शांत केले. दुसरीकडे भारतीय फलंदाज संयतावस्थेत होते. सुरुवातीलाच मोठे फटके टाळून विकेट न गमावण्याची त्यांची रणनीती होती. एकेरी-दुहेरी धावा घेत टोक बदलायचे आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना हताश करायचे, असे त्यांनी ठरवले असले तरी रोहित आततायी झाला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. हे दुसऱ्या टोकाकडून धवन पाहत होता आणि कोहलीनेही ते पाहत मोठे फटके टाळले. शिताफीने या दोघांनी सावधानता बाळगत धावांचा पाया रचायला सुरुवात केली. ही परिस्थिती धवनच्या प्रकृतीला साजेशी नव्हती; पण त्याने हवाई हल्ल्यांना काही काळ मुरड घातली. या दोघांनी डेव्हिड बून, झहीर अब्बास, इंझमाम, मोहम्मद युसूफ यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. कोहलीने या सामन्यात जास्त उंचीचे फटके मारले नाही. कारण एक उंच फटका मारण्याचा नादात त्याचा झेल उडाला होता. धवन आणि कोहली हे दोन ‘अनमोल रतन’ आता शतके लगावतील, असे वाटत असतानाच एका चुकीने घोटाळा केला. कोहलीने धाव काढण्यासाठी पुकारा दिला आणि काही क्षणात धवनला माघारी धाडले ते थेट तंबूमध्येच. स्थिरस्थावर झाल्यावर एका धावेसाठी विकेट गमावणे म्हणजे आत्मघातच. धवन बाद झाल्यावर कोहली स्थिरस्थावर झालेला फलंदाज होता; पण सत्तर ते शतकापर्यंतच्या तीस धावा गाठताना तो चाचपडत खेळताना दिसला, नेहमीचा कोहली त्यामध्ये दिसत नव्हता. दुसरीकडे पॅव्हेलियनमधूनच फलंदाजीचा सराव करून आल्यासारखा रैना खेळायला लागला. प्रत्येक चेंडूमागे धावा घेणे जे रैना लीलया दाखवत होता, त्यासाठी मात्र कोहलीला विशेष मेहनत घ्यावी लागत होती. कोहलीने ९९वरून जेव्हा एकेरी धाव घेत शतकापर्यंत पोहोचला, तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त आनंद रैनाला झाला. हा सांघिक भावनेचा उत्तम नमुना होता.
एखाद्या फलंदाजाने शतक झळकवावे आणि बाद होऊन दुसऱ्या फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी मैदानात पाठवावे, अशी चर्चा कोहलीच्या बाबतीत होत होती. कारण शतक झळकावल्यावरही त्याला मोठे फटके मारता येत नव्हते; पण कोहलीच्या शतकी खेळीत ५६ एकेरी धावा होत्या, हे विसरून चालणार नाही. ३५-४० या  ‘पॉवर प्ले’मध्ये या दोघांनी फक्त २५ धावा केल्या, त्यामध्ये जोखीम न घेण्याची त्यांची रणनीती असेलही, पण २५ ऐवजी ३५-४० धावा जोखीम न घेतासुद्धा करता आल्या असत्या. या वेळी कोहलीपेक्षा रैनाची खेळी अधिक परिपक्व वाटत होती. भारताने तीनशेपेक्षा जास्त धावांचे स्वप्न हे कोहलीच्या नव्हे, तर रैनाच्या फटक्यांच्या जोरावर पाहिले होते; पण त्यामध्येही भारताला अपयश आले. कोहलीनंतर रैना आणि धोनी ही जोडी आता गोलंदाजांची कत्तल करेल, असे ठोकताळे मांडले जात होते; पण धोनीला ते जमलेच नाही. अंगावर उसळणारे चेंडू त्याला मारता येत नव्हते. गेल्या न्यूझीलंडच्या दौऱ्यातही त्याची अशीच अवस्था होती. अजिंक्य रहाणेला तिन्ही यष्टी सोडून फटका मारण्याची गरज काय होती, देवच जाणे. सोहेलचा मारा शेवटच्या पाच षटकांमध्ये अधिक घातक झाला; पण त्याची हॅट्ट्रिक मात्र हुकली. शेवटच्या पाच षटकांमध्ये भारताने चार फलंदाज गमावले आणि जमवल्या फक्त २१ धावा.
स्पर्धेपूर्वी बोथट ठरवण्यात आलेली भारतीय गोलंदाजी एकदम दुधारी तलवार वाटायला लागली. मोहम्मद शमीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण प्रत्येक वेळी तो कर्णधाराच्या विश्वासाला पात्र ठरला. मोहित शर्माची चांगली साथ त्याला मिळाली. मिसबाहचेही कौतुक करायला हवे; पण त्याची अर्धशतकी खेळी पुन्हा एकदा वांझोटी ठरली. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय म्हणजे भारतीय संघाला शंभर हत्तींचे बळ देणारा आहे; पण या जल्लोषामध्ये होश हरवू देऊ नका, कारण आपण पहिला सामना जिंकलोय, विश्वचषक नाही, याचेही भान असू द्या!