* मला अ‍ॅटोमॅटिक सेडान पेट्रोल गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. होंडा सिटी, फोक्सवॅगन व्हेंटो यांपकी कोणती घेऊ, याबाबत प्रचंड गोंधळ आहे. सिटी १.५ लि, फाइव्ह स्पीड एटी आहे तर व्हेंटो १.२ लि, सेव्हन स्पीड एटी आहे. याव्यतिरिक्त काही पर्याय असतील तर कृपया सांगा.
– श्रुती देशमुख-टोके
 * तुमच्यासाठी स्कोडा रॅपिड १.६ एमपीआय अ‍ॅम्बिशन प्लस एटी ही गाडी अतिशय योग्य ठरेल. ही गाडी उत्तम बनावटीची असून होंडा सिटीपेक्षा एक गीअर हिच्यात जास्त आहे आणि पॉवरही जास्त आहे. तसेच या गाडीच्या बनावटीत उत्तम दर्जाच्या धातूचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गाडीचे वजन १४० किलोग्रॅमनी वाढले आहे. या वैशिष्टय़ामुळे ही गाडी रस्त्यावर उत्तम स्थिरता देते. सिटीपेक्षा या गाडीचा मायलेज जरा कमी असला, तरी या पॉवर आणि कम्फर्ट या दोन बाजू चांगल्या आहेत. त्यामुळे फोक्सवॅगन आणि सिटीपेक्षा तुम्ही या गाडीलाच जास्त पसंती द्यावी, असे मला वाटते.
* सध्या मी  मारुती व्हॅन  वापरतो आहे. १९८७ चे  मॉडेल  असूनही चांगली चालते. परंतु आता खूप जुनी झाल्याने नवीन व्हॅन घेण्याचा विचार आहे. माझ्यासमोर मारुती इको, डॅटसन गो प्लस आणि टाटा व्हेंचर हे तीन पर्याय आहेत. मला एसी गाडी हवी आहे. तसेच सीटिंग कपॅसिटी पाच माणसांपेक्षा अधिक असावी, अशी गाडी हवी आहे. इको व्हर्जन सेव्हन सीटरला एसी नाही. आपल्याला वैयक्तिकरीत्या बसवता येतो का, मला कुटुंबीयांबरोबर प्रवासाची आवड आहे. मार्गदर्शन करावे.
– शरद साठे.
 * मारुती इकोमध्ये बाहेरून एसी लावून घेता येईल, परंतु सात जण बसल्यावर त्याचा भार इंजिनावर पडेल आणि तो इंजिनाला पेलवणार नाही. तसेच बाहेरून लावलेल्या एसीची कार्यक्षमता कमी असल्याने कूिलगही होणार नाही. शिवाय वॉरंटी रद्द होईल. त्यापेक्षा पाच आसनी गाडी घेऊन अडचणीच्या वेळेस मागे दोन जण बसता येईल एवढी जागा नक्कीच असते. दुसरे असे की, डॅट्सन गो प्लस ही व्हॅन नाही. ती कार असून पाच आसनी आहे. दोन लहान मुले मागे बसू शकतील परंतु बूट स्पेस मिळणार नाही. टाटा व्हेंचर ही डिझेल गाडी आहे. तिची किंमत या दोन्ही गाडय़ांपेक्षा किमान दीडपटीने जास्त आहे. तुम्ही साडेसहा लाखांची शेवरोले एन्जॉय ही पेट्रोलवर चालणारी गाडी घ्यावी असा सल्ला मी देईन. ही गाडी आठ आसनी असून डय़ुएल एसी आहे शिवाय मजबूतही आहे.
*मला सेकंड हँड मारुती ८०० किंवा अल्टो घ्यायची आहे. माझे बजेट एक लाख रुपयांचेच असून या किमतीत ही गाडी येईल काय, की आणखी दुसरा कोणता पर्याय आहे हे सांगावे.     
    – माऊली मुंडे
*मारुतीच्या गाडय़ा उत्तम असल्या तरी त्यांचे आयुष्य विशेषत: मारुती ८०० किंवा अल्टोचे (२००९ पर्यंतच्या) इंजिन, सस्पेन्शन, बॉडी इत्यादींवर अवलंबून असते. अर्थात कमी किमतीतील गाडी दहा-बारा वर्षांत एक लाख किमी चालली तरी खूप असते. परंतु अल्टो घेणार असाल तर इंजिन नक्की तपासा. अल्टोचे ८०० सीसीचे इंजिन आहे त्यामुळे ती जास्त लोड घेऊ शकत नाही. गाडी व्हायब्रेट होत नाही ना याचीही खात्री करून घ्या. कारण वॅगनआर ११०० सीसीचे इंजिन वेल रिफाइंड असल्याने त्याचे आयुष्य जास्त आहे. जर तुम्हाला आठ-दहा र्वष चालवलेली वॅगनआर तुमच्या बजेटमध्ये मिळत असेल तर उत्तम.
समीर ओक