11दृष्टी नाही पण गाठीला इच्छाशक्ती आहे. याच जोरावर ‘त्या’ ४८ साहसवीरांनी सिंहगडाची वाट पकडली. मदतनीस, गिर्यारोहकांचे आधाराचे हात या साऱ्यांच्या जोरावर त्यांनी ४३२९ फूट उंचीच्या दुर्गशिखराचा माथ्याला स्पर्श केला आणि आगळय़ावेगळय़ा पद्धतीने प्रजासत्ताकदिन साजरा केला. हा ध्यास आहे मुंबईतील ‘नयन फाऊंडेशन’च्या दृष्टिहीन युवकांची आणि कथा आहे त्यांना मदतीचे हात देणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांची.
‘नयन फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी अशा दृष्टिहीन युवकांची गिर्यारोहण मोहीम काढली जाते. यापूर्वी लोहगड, शिवनेरी, रायगड किल्ल्यांवर अशा मोहिमांचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्षीचे दुर्ग साहित्यसंमेलन सिंहगड किल्ल्यावर होत असल्याने ‘नयन फाऊंडेशन’ने त्यांच्या यंदाच्या मोहिमेसाठीदेखील सिंहगडाची निवड केली. या उपक्रमासाठी भल्या पहाटेच हे सर्व साहसवीर आणि त्यांचे मदतनीस मुंबईहून दाखल झाले होते. पहाटे ६ वाजताच सर्व तयारीनिशी हे गिर्यारोहक सिंहगड चढाईसाठी सज्ज झाले. पाठीवर सॅक, पायात बूट, डोक्यावर टोपी आणि प्रत्येकाच्या जोडीला मदतीचा एक हात अशा पद्धतीने ही साखळी तयार करण्यात आली. पायथ्याशी एका छोटेखानी कार्यक्रमात आगामी दुर्ग साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष जयप्रकाश सुराणा आणि गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी एव्हरेस्ट मोहिमेचा नेता उमेश झिरपे, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक अभिजित बेल्हेकर, ‘गप्पांगण’चे ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनानिमित्त तिरंगा ध्वजाला मानवंदना देत या सर्वानी गड चढायला सुरुवात केली. हे ४८ साहसवीर आणि त्यांच्यासाठी तेवढेच मदतीचे हात बरोबर घेत मोहीम सुरू झाली.वाटा-आडवाटांवरील घसरणे-पडणे-सावरणे सुरू झाले. खड्डे, चढउतार यांचा अंदाज घेत पावले टाकली जात होती. बरोबरच्या मदतनिसांकडून प्रत्येक पावलाबाबत मार्गदर्शन केले जात होते. अशी ही दमछाक करणारी, आव्हान वाटणारी दृष्टिहीन गिर्यारोहकांची मोहीम हळूहळू गडाच्या माथ्याच्या दिशेने सरकू लागली. डोळय़ांसमोर केवळ अंधार आणि आधारासाठी केवळ एक हात यावर या ४८ पायांनी केवळ अडीच तासांमध्ये सिंहगडाचा तो पुणे दरवाजा गाठला. सिंहगडाचा दरवाजा आला हेदखील या मुलांना त्याच्या चिऱ्यांना हात लावल्यावरच समजले.
गडात प्रवेश करताच छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. मग तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करत, गडाचा इतिहास उलगडू लागला. सिंहगडाचे दरवाजे, इतर वास्तू, लोकमान्य टिळकांचा बंगला, छत्रपती राजाराममहाराज समाधी, कलावंतिणीचा बुरूज आणि कल्याण दरवाजा अशा एकेका वास्तूची ओळख करून घेत ही दुर्गफेरी नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाजवळ समाप्त झाली. या वेळी ‘गिरिप्रेमी’चे एव्हरेस्टवीर टेकराज अधिकारी, प्रसाद जोशी, आशिष माने यांनी या मुलांना गिर्यारोहण मोहिमेतील त्यांचे अनुभव सांगितले. दिवसभर इतिहास, भूगोल, गिर्यारोहणाच्या या आडवाटेवर भटकंती केल्यावर भारतमातेचा जयजयकार करत या मोहिमेचा शेवट झाला. राष्ट्रगीत झाले आणि एक आगळावेगळा दिवस अनुभवत हे सर्व खरेखुरे साहसवीर गड उतरू लागले. ज्यांच्यासाठी खरेतर दैनंदिन जीवनदेखील एखादे गिर्यारोहण असते अशा या दृष्टिहीन पावलांनी धडधाकट शरीरांना लाजवेल अशी कामगिरी केली होती. गड उतरताना त्यांच्या चेहऱ्यावर याच पराक्रमाचे स्मितहास्य उमटलेले होते. त्यांच्या जिद्दीला आत्मविश्वासाचे बळ प्राप्त झाले होते.