डिजिटल बँकिंगसाठी ‘८/११’ अॅपची प्रस्तुती

संपूर्ण डिजिटल आणि कागदरहित प्रक्रियेने खाते उघडण्याची सोय असलेल्या ‘८/११’ नावाचे मोबाइल अॅप खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रूा बँकेने बुधवारी दाखल केले. पुढील १८ महिन्यांत ग्राहक संख्या सध्याच्या ८० लाखांवरून दुप्पट १.६० कोटींवर नेण्याचे बँकेचे महत्त्वाकांक्षी नियोजन असून, त्याकामी या नवीन सुविधेतून मोलाचे योगदान अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी अॅक्सिस बँकेवर ताबा मिळविण्यासाठी कोटक महिंद्रा बँक प्रयत्नशील आहे अशा वदंता गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, त्यासंबंधी घोषणा बुधवारी केली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, कोटक बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक यांनी थेट कोणतेही भाष्य न करता, आगामी १८ महिन्यांत परिवर्तनकारी वृद्धी धोरण अनुसरून वेगवान वाढीचा बँकेचा मानस असल्याचे स्पष्ट केले.

वित्तीय क्षेत्रात विध्वंसकारी परिवर्तन घडविणाऱ्या निश्चलनीकरणाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जाहीर केला, त्या तारखेचेच प्रतिनिधित्व करणारे ‘८/११’ हे आपल्या डिजिटल पुढाकाराला नामाभिधान जाणीवपूर्वक स्वीकारले असल्याचे कोटक यांनी सांगितले. मोबाइल बँकिंग, वॉलेट आणि ई-कॉमर्स असे एकात्मिक लाभ हे एकटे अॅप डाऊनलोड करून मिळतील. शिवाय शून्य शिलकी खाते, सर्व व्यवहार नि:शुल्क, बचत खात्यातील रकमेवर सहा टक्के व्याज, खाते उघडण्यासाठी आधार क्रमांकावर आधारीत ओटीपी असे अॅपची वैशिष्टय़े त्यांनी सांगितली.