सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या सर्वात मोठय़ा विमा कंपनीने सरलेल्या २०१६-१७ सालात नवीन विमा हप्ते उत्पन्नांत २७.२२ टक्क्यांची दमदार वाढ साधून ते १,२४,३९६.२७ कोटी रुपयांवर नेले आहे. आधीच्या वर्षांत म्हणजे ३१ मार्च २०१६ अखेर कंपनीचे नवीन हप्ते उत्पन्न ९७,७७७.४७ कोटी रुपये होते.

नवीन हप्ते उत्पन्न संकलनाच्या बाबतीत एलआयसीचा एकूण आयुर्विमा क्षेत्रात बाजारहिस्सा ७०.६१ टक्क्यांवरून ७१.०७ टक्के असा वाढला आहे. मात्र २०१६-१७ सालात विकल्या गेलेल्या २ कोटींहून अधिक नवीन विमा पॉलिसींचे प्रमाण एलआयसीचा बाजारहिस्सा ७४.७२ टक्के पातळीवरून ७६.०९ टक्के पातळीवर गेला आहे.

एलआयसीने सरलेल्या वर्षांत सर्वाधिक वाढ व्यक्तिगत सिंगल प्रीमियम पॉलिसी वर्गवारीत साधली आहे. या वर्गवारीतून महामंडळाला प्राप्त झालेल्या प्रथम हप्ते उत्पन्न हे २३,४१२.५५ कोटी रुपये आहे. मार्च २०१६ अखेर त्याचे १२,०७८ कोटी रुपये असे प्रमाण पाहता यंदा त्यात ८४ टक्के अशी भरीव वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गट आणि पेन्शन योजना वर्गवारीतूनही महामंडळाने नवीन व्यवसायातून ७८,८०५.५६ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

महामंडळाच्या देशभरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांनी प्रथम विमा उत्पन्नाचे लक्ष्य साध्य केले असून, मुंबईचा समावेश असलेल्या पश्चिम क्षेत्राने ३५ लाख पॉलिसींची विक्री आणि ८,५७५.८८ कोटी रुपयांचे प्रथम विमा हप्ते उत्पन्न कमावून अग्रस्थान मिळविले आहे.