सुरुवातीला मंदीच्या छायेत राहणाऱ्या देशातील वाहन उत्पादकांकरिता एकूण २०१५ हे वर्ष तुलनेत चांगले गेले आहे. कंपनीच्या इतिहासात वर्षांतील विक्रमी वाहन विक्रीची वाढ मारुती, ह्य़ुंदाईसारख्या कंपन्यांनी गेल्या वर्षांत केली आहे. तर दोन्ही कंपन्यांची डिसेंबरमधील वाढही दुहेरी आकडय़ातील आहे.
वर्षभरात १४ लाख (११ टक्के वाढ) विक्रमी वाहन विक्रीसह मारुती सुझुकीने डिसेंबरमध्येही वाढ नोंदविली आहे. तर ह्य़ुंदाईनेही दोन्ही कालावधीत दुहेरी आकडय़ातील वाढीची टक्केवारी राखली आहे.
मारुतीची कामगिरी एकूणच चमकदार राहिली आहे. डिसेंबरमधील १३.५ टक्के वाढीच्या जोरावर (१,११,३३३) कंपनीने एकूण २०१५ मध्ये वर्षांतील सर्वाधिक अशा १४ लाख वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या निर्यातीत त्या तुलनेत काहीशी घसरण झाली आहे. सिआज, एर्टिगा, बलोनो, एस क्रॉस या नव्या दमाच्या वाहनांवर कंपनीला यंदा यश मिळाले आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील क्रेटा तसेच हॅचबॅक श्रेणीतील ग्रॅण्ड आय१० मुळे ह्य़ुंदाईला डिसेंबरमध्ये ४१,८६१ वाहने विकता आली. वार्षिक तुलनेत ही वाढ २८.७८ टक्के आहे. कंपनीनेही तिच्या इतिहासातील सर्वोत्तम अशी ४.७६ लाख वाहन विक्रीची नोंद २०१५ मध्ये केली आहे. २०१४ पेक्षा ही वाढ १५.७ टक्के आहे.
सातत्याने नकारात्मक प्रवास नोंदविणाऱ्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रलाही यंदा काही प्रमाणात का होईना घसरत्या विक्रीतून डोके बाहेर काढता आले आहे. गेल्या महिन्यात कंपनीची विक्री अवघ्या एक टक्क्याने वाढून ३४,८३९ झाली आहे.
फोर्डची देशांतर्गत विक्री तब्बल ५७.८ टक्क्यांनी झेपावत डिसेंबरमध्ये ५,९२४ वाहने झाली आहे. निर्यातीत नोंदविलेल्या ५३.५९ टक्के घसरणीमुळे कंपनीची एकूण विक्री मात्र गेल्या महिन्यात घसरून १०,८६५ वर आली आहे