मौल्यवान धातूवर वाढविण्यात आलेल्या आयात शुल्काचा योग्य तो परिणाम देशातील सोन्याची मागणी कमी करण्यावर दिसून आला आहे. २०१२ मध्ये भारताची सोने धातूची मागणी १२ टक्क्यांनी घसरली असून या कालावधीत एकूण ८६४.२ टन सोने आयात झाले आहे. सोने आयातीत भारत हा चीननंतरचा सर्वात मोठा देश आहे.
वित्तीय तुटीत भर घालणारी सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची वाढती आयात रोखण्यासाठी सरकारने २०१२ मध्ये त्यावर वाढीव आयात शुल्क लागू केले होते. यामुळे तमाम सुवर्णकारांनी पुकारलेल्या २१ दिवसांचा बंदही याच कालावधीत गाजला होता. याचा एकत्रित परिणाम सोने आयातीवर झाला आहे.
२०११ मधील ९८६.३ टन आयातीच्या तुलनेत २०१२ मध्ये ती कमी झाली आहे. ‘जागतिक सुर्वण परिषदे’ने २०१२ मधील सोने-चांदीच्या उलाढालीचे आकडे जाहीर केले असून २०१३ मध्येही मौल्यवान धातूची आयात ८६५ ते ९६५ टन दरम्यान राहणार असल्याची शक्यता परिषदेचे गुंतवणूक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क्‍स ग्रब यांनी व्यक्त केली आहे. भारतासारख्या अर्थव्यवस्थेत सुवर्ण क्षेत्र मोलाचे कार्य करते, असेही त्यांनी म्हटले आहे.