विदेशी कंपनीबरोबर असलेला वाहन व्यवसायातील करार महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूहाने दुसऱ्यांदा मोडला आहे. ट्रक तसेच बस निर्मितीसाठी अमेरिकेच्या ‘नॅविस्टार’बरोबर असलेले सहकार्य महिंद्रने संपुष्टात आणला आहे.
यापूर्वी २०१० मध्ये फ्रेंच कंपनी रेनॉबरोबरचे  प्रवासी वाहन निर्मितीसाठी असलेली व्यवसाय भागीदारी महिंद्रने संपुष्टात आणली आहे. उभय कंपन्यांमार्फत ‘लोगान’ ही कार तयार करण्यात येत होती. विभक्ततेनंतर महिंद्रने तिचे नामकरण व्हेरिटो असे केले. अमेरिकेच्या नॅविस्टारबरोबर महिंद्रने २००५ मध्ये बस तसेच ट्रक निर्मितीसाठी व्यवसाय भागीदारी केली होती. यानंतर २००७ मध्ये इंजिन निर्मितीसाठी सहकार्य करार करण्यात आला होता.
महिंद्रने आता भागीदारीतील नॅविस्टारचा सर्व हिस्सा खरेदी केला आहे. या अंतर्गत महिंद्रू नॅविस्टार ऑटोमोबाईल्स आणि महिंद्र नॅविस्टार इंजिन्स या दोन्ही भागीदार कंपन्यांमधील नॅविस्टारचा ४९ टक्क्यांचा संपूर्ण हिस्सा महिंद्रकडे आला आहे.