डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५ फंड

मागील आठवडय़ात २०१६च्या नोबेल पारितोषक विजेत्यांच्या नावाची घोषणा झाली. पोर्टफोलीओतील समभागांची संख्या व परतावा यांचे व्यस्त प्रमाण आहे. गुंतवणुकीत अतिवैविध्य आणल्यामुळे परताव्याचा दर कमी होतो. हे सप्रमाण सिद्ध करणारा सिद्धांत हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांनी मांडला. या सिद्धांताला १९९० सालच्या अर्थशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषक मिळाले. पोर्टफोलिओत समभागांची संख्या कमी असेल तर जोखीम वाढते व जास्त असेल तर परतावा कमी होतो.

arth08साहजिकच समभागांची संख्या कमीत कमी ठेवून आदर्श जोखीम पातळीवर राखून डायव्हर्सिफाईड फंडांपेक्षा अधिक परतवा मिळविणारे फोकस्ड फंड हे ‘हाय अल्फा’ फंडात मोडतात. सगळेच फोकस्ड फंड समभाग केंद्रित जोखीम व परतावा यांच्यात समतोल साधण्यात यशस्वी होतातच असे नाही. फोकस्ड फंडात समभागांची संख्या तुलनेने कमी असल्याने समभाग केंद्रित जोखीम (मार्कोविट्झ यांनी ज्याचा उल्लेख ‘सिस्टेमॅटिक रिस्क’ असा केला) अधिक असल्याने समभाग निवडीचा एखादा निर्णय चुकला तर परताव्याचे गणित चुकण्याची शक्यता अधिक असते. अशाच फोकस्ड फंडापैकी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल  फोकस्ड ब्लूचिप व कोटक सिलेक्ट फोकस या दोन फंडांचा समावेश ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या यादीत आहे. थोडक्या गुणांनी या यादीत समावेशाची संधी हुकलेला ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५’ या फंडाची आजच्या ‘हाय अल्फा’ फंडांच्या निमित्ताने ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे.

हा फंड लार्ज कॅप प्रकारचा फंड असून एकूण गुंतवणुकीपैकी ९५ टक्के गुंतवणूक आघाडीच्या २५ समभागात असते व उर्वरित पाच टक्के गुंतवणूक अन्य समभागांत असते. या फंडाचे दुसरे वैशिष्टय़ असे, एकूण गुंतवणूक असलेल्या समभागांपैकी ७५ टक्के समभाग हे लार्ज कॅप प्रकारात मोडणारे असतात. ‘बीएसई २००’ हा निर्देशांक या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. एचडीएफसी बँक, इंडसिंध बँक, स्टेट बँक, मारुती व टाटा मोटर्स अशा या फंडाच्या आघाडीच्या पाच गुंतवणुका आहेत. एका अर्थाने सध्या या फंडाने बँकिंग व वाहन उद्योग यांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले आहे. गेल्या एका महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेले अ‍ॅडव्हान्स इंझाइम व एल अँड टी टेक्नोलॉजी यांचा समावेश झाला आहे. ऑगस्ट २०१६च्या गुंतवणूक पत्रकाप्रमाणे फंडाची ८९.६७ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप गटात मोडणारी असून ९.८३ टक्के गुंतवणूक मिड कॅप प्रकारची असून उर्वरित गुंतवणूक रोकड सुलभ प्रकारात मोडणारी आहे. आघाडीच्या १० गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण ५६ टक्के आहे. मॅक्स फायनान्शियलचा समावेश फंडात मिड कॅप म्हणून झाला आज हा समभाग लार्ज कॅप गटात मोडतो. जून २०१० ते डिसेंबर २०१४ या कालावधीत अपूर्व शहा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. जानेवारी २०१५ पासून हरीश जव्हेरी यांनी फंडाची सूत्रे स्वीकारली. फंडाच्या निधी व्यवस्थापकांत जरी बदल झाला तरी फंडाच्या गुंतवणूक ढाच्यात दोन अपवाद वगळता  मोठे बदल झाले नाहीत. जानेवारी २०१२ पासून हा फंड संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळवत आहे.

arth10२०१४ मध्ये फंड व्यवस्थापनाची सूत्रे अपूर्व शहा यांच्याकडून हरीश झव्हेरी यांच्याकडे आल्यानंतर आघाडीच्या दहा समभागांतून दोन समभाग वगळून एचडीएफसी बँकेत व मारुती गुंतवणूक वाढवली. मागील पाच वर्षांत एखादा अपवाद वगळता फंडाच्या आघाडीच्या गुंतवणुकांत बदल झालेला नाही. सध्या जव्हेरी यांच्याकडे ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५’ व ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस १००’ या दोन फंडांच्या निधी व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापकांच्या मते चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहणार असून हा वेग आर्थिक वर्ष २०१८ व २०१९ मध्ये वाढेल. फंड व्यवस्थापकांना पुढील तीन ते चार वर्षांत वस्तूंचा वापर वाढण्याची आशा वाटते. विद्यमान निधी व्यवस्थापक हरीश जव्हेरी हे डीएसपी ब्लॅकरॉकमध्ये दाखल होण्याआधी डॉईशे सिक्युरिटीजमध्ये आणि त्या आधी एचएसबीसी सिक्युरिटीज व अन्य कंपन्यांतून समभाग संशोधनविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांना २२ वर्षांचा समभाग गुंतवणुकीचा अनुभव आहे.

arth09

निर्देशांकाच्या चढउताराच्या तुलनेत फंडाच्या ‘एनएव्ही’त होणारी वाढ किंवा घट फंडाची जोखीम निश्चित करते.  ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५’ या फंडाची रचना समभागकेंद्रित जोखीम स्वीकारण्याची असल्याने या फंडाची जोखीम निश्चितच अधिक आहे. जे कोणी अधिक धोका पत्करून अधिक परतावा मिळवू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठीया फंडाची शिफारस केली आहे. बहुतांश ‘हाय अल्फा’ फंड हे मिडकॅप गटातील आहेत. हा फंड प्रामुख्याने लार्ज कॅप समभागात गुंतवणूक करून वेगवेगळ्या कालावधीत अन्य स्पर्धक फंडांपेक्षा तीन ते पाच टक्के अधिक परतावा देत आला आहे. १० जून २०१० रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडाने पहिल्या दिवशी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास १४ ऑक्टोबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार १२.४२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या कालावधीत या फंडाचा संदर्भ निर्देशांक असलेल्या ‘एस अँड पी बीएसई २००’ने ९.३१ टक्के तर ‘निफ्टी’ने ८.९ टक्के परतावा दिला असून लार्ज कॅप फंड गटाचा या कालावधीतील सरासरी परतावा ९.९६ टक्के आहे. सरासरीपेक्षा कमी प्रमाणित विचलन व सरासरीपेक्षा अधिक वार्षिक परतावा असल्याने या फंडाचा गुंतवणूकदार आवश्यकतेप्रमाणे दीर्घ मुदतीची ‘सिप’ करण्यासाठी ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५’ या फंडाचा विचार करू शकतात.

(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com