दुष्काळ आणि शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे राज्यातील शेतकरी हैराण झाला आहे. मात्र, सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. यापार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबादमधील क्रांती चौकात शेतकरीपुत्रांकडून महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचं सामुहिक वाचन करण्यात आले.

तुरीचा प्रश्न गंभीर झाला असताना, तूर खरेदीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी अपशब्दाचा वापर करुन शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला. त्यानंतर भाजपने त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘शिवार संवाद यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रमाद्वारे सरकार शेतकऱ्यांचं घूमजाव करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसमोरील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची जबाबदारी झटकवून शेतकऱ्यांवरुन फक्त राजकारण सुरु आहे, असा आरोपही आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केला.

‘शिवार सवांद’ यात्रेत भाजपचे नेते त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढत आहेत. शेतकऱ्यांनी सरकार फसवणूक केल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. दानवेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो. मात्र, पोलीस बळाचा वापर करून ते दडपण्यात आलं. पेरणी तोंडावर आलेली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कसल्याही प्रकारच गांभीर्य सरकारला दिसत नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचं सामुहिक वाचन केल्याचं शेतकरीपुत्रांनी सांगितलं. मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातून आलेले विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.