मला व्यापक विचार करायला फार आवडतं. समाजाला वैचारिक नेतृत्व द्यायची वेळ जर माझ्यावर आली, तर तेव्हा मला विचार करायला वेळ मिळणार नाही; म्हणून मी आता जसा वेळ मिळेल तसा सतत वेगवेगळ्या विषयांवर विचार करत असतो. काही दिवसांपूर्वी करायला दुसरे काहीच नव्हते म्हणून मी विचार करत बसलो होतो. आपापले व्यावसायिक कर्तव्य पार पाडत असताना विविध व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी हा माझ्या चिंतनाचा विषय होता. या चिंतन प्रक्रियेत माझ्या लक्षात आले की ‘स्थानिक भाई’ या व्यवसाय समूहाला समाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मी जेव्हा होतकरू होतो तेव्हा ‘भाई बनणे’ या करिअरचा का विचार केला नसावा, या प्रश्नाने मला अस्वस्थता आली.

भाई किंवा अंडरवर्ल्ड डॉन बनणे हेच आपले करिअर आहे, यातच आपल्या आयुष्याची सार्थकता आहे, हे कशामुळे एखाद्या होतकरू तरुणाला वाटत असेल? काय असतील या व्यवसायाच्या अडचणी? भाईंचे भावविश्व आपण जाणून घ्यायला हवे असे मला फार प्रकर्षांने वाटत होते, म्हणून मी भाईंना भेटायचे आणि बोलते करायचे ठरवले. पण एकूणच त्यांना भेटणे फारच कठीण आहे हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या कामाची वेळ आणि माझी झोपायची वेळ एकच असल्याने वेळा जमेनात. शेवटी त्यांनी त्यांचे म्हणणे पत्ररूपात लेखी द्यावे आणि ते मी प्रकाशात आणावे असे ठरले.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

मा. बम्बईके मंदार भाई,

आपल्याला आमच्या व्यवसायाबद्दल उत्सुकता वाटते आहे हे कळाले आणि आनंद झाला. आधी उत्सुकता वाटते आणि मग लोक व्यवसायात प्रवेश करतात, असा माझा अनुभव आहे. तुमचाही असा काही विचार असला तर स्पष्ट सांगावे. मी एरिया ठरवून लाईन बसवून देईन. स्मगलर, मटकेवाले, सुपारी घेणारे, जागा खाली करणारे, फक्त दम देणारे, हग्या दम देणारे, ड्रग्सची विक्री करणारे, शस्त्रांचे दलाल- हे आणि असे कितीतरी व्यवसाय हे भाईगिरी किंवा या अंडरवर्ल्ड नावाने केले जातात. अत्यंत जिगरबाज असणे आणि आपल्या ग्राहकांना सेवा देण्याची तीव्र ओढ, हा आमच्या व्यवसायाचा पाया आहे. घडय़ाळे, पेन, इलेक्ट्रॉनिकच्या विविध वस्तू यांच्या वापरावर सरकारची बंदी होती. स्थानिक उत्पादक भिकार उत्पादन करायचे आणि तेच वापरायची तुम्हा-आम्हा लोकांवर सक्ती होती. बाहेरच्या देशात मात्र या वस्तूंचे मुबलक उत्पादन व्हायचे. आमच्या व्यवसायातल्या चतुर लोकांनी सामान्य लोकांची ही गरज ओळखली आणि सरकारचा विरोध असतानाही आम्ही जिवावर उदार होऊन या वस्तूंची आयात करायला सुरुवात केली. अनेकांनी आमची स्मगलर म्हणून निर्भर्त्सना केली तरी आमचे  लोक डगमगले नाहीत. पोलिसांकरवी आमच्यावर हल्ले चढवले गेले तरी आम्ही घाबरलो नाही आणि आम्ही लोकांना वस्तू पुरवण्याचे आपले व्रत सुरूच ठेवले. कितीतरी लोक तुरुंगात सडले, मारले गेले, पण शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले आणि सरकारने आयात-निर्यातीवरची बंदी उठवली, जागतिकीकरण झाले आणि स्मगलिंग नावाच्या व्यवसायाची गरज संपुष्टात आली. आज उजळ माथ्याने घडय़ाळे, फोन, दिवे विकणाऱ्यांनी आमच्या त्यागाचे नित्य स्मरण ठेवायला हवे.

ग्लोबलायझेशन वगैरे शब्दसुद्धा जेव्हा कोणाला माहीत नव्हते तेव्हाही भाई बनणे, हा जागतिक व्यवसाय होता. कोणी थायलंडमध्ये बसून तर कोणी दुबईत बसून हा व्यवसाय चालवायचे. आमच्यातल्या अनेकांना तर या देशात यायलादेखील बंदी घातली होती, तरीही

आम्ही डगमगलो नाही आणि देशत्याग करून आपापला व्यवसाय करत राहिलो.

आमच्या लोकांचे बरेच प्रश्न आहेत. आमच्यातल्या एखाद्याचा आवाज जर चिरका किंवा बायकी असेल तर त्याला खूपच समस्यांना तोंड द्यावे लागते. दम देता येणे हा आमच्या व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे आणि चिरक्या किंवा बायकी आवाजात दम दिला तर लोक घाबरत नाहीत ही तर सार्वत्रिक समस्या आहे. लोकांनी समजून घ्यायला हवे की असतो एखाद्याचा आवाज चिरका. तरी लोकांनी आवाजाचा पोत कसा आहे याकडे न पाहता घाबरायला हवे.

लोक या व्यवसायाला नावे ठेवतात ते एकवेळ ठीक आहे, पण आमच्या व्यवसायातल्या लोकांची नावेपण जरा ठीक ठेवायला हवीत. लंगडा, चिकना, कल्लू, टायर ही काय नावं आहेत का? भाषा विषयात काम करणाऱ्या मंडळींनी हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. आमची अशी कोणती नावे ठेवली जाऊ  शकतील जी छापायला आणि उच्चारायला चांगली वाटतील यावर थोडे संशोधन करायला हवे. तुमच्या मुलांची नावे आर्यन, पार्थ अशी फॅन्सी ठेवता आणि आमच्या मुलांची नावे लंगडा, लुळा हे कसे चालेल?

मधल्या काळात पिक्चर बनवणाऱ्यांच्या मागे आम्ही लागलो होतो; त्याचे काय कारण होते हे एकदा मला जाहीरपणे सांगितलेच पाहिजे. मध्ये खूप काळ एका डोळ्याने चकणा, बीभत्स हसणारा किंवा विनाकारण क्रूरतेने वागणारा व्हिलन चित्रपटात दाखवायची फ्याशन आली होती. यामुळे अंडरवर्ल्ड  व्यावसायिकांच्या प्रतिमेची अतोनात हानी होत होती, प्रतिमेची हानी झाली की तुम्ही जनरली साहित्य संमेलनात वगैरे विरोधाचा ठराव वगैरे करून निषेध नोंदवू शकता. आम्हाला तर तीपण सोय उपलब्ध नव्हती, मग आम्हीपण आमच्या संमेलनात प्रतिमा सुधारण्याचा ठराव पास केला आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करायचे ठरवले. त्यानुसार काही जणांना धमकावून, उचलून, खंडणी मागून आम्ही थोडा निषेध नोंदवला तेव्हा कुठे पिक्चरवाले सुधारले. आता गेल्या काही वर्षांतले डॉन बघा! मस्त यॉटमधून फिरतात, बीचच्या कडेला बसतात, अनेकदा तर हिरोपेक्षा व्हिलनच भारी दिसतो. हा बदल हे आमच्या आंदोलनाला आलेले फळ आहे.

निश्चलनीकरणाच्या काळात अचानकच आमचा उद्योग खूपच संकटात सापडला होता. आमच्या कष्टाच्या, मेहनतीने मिळवलेल्या पैशाला काही किंमत राहिली नव्हती. असला काहीतरी अघोरी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने आमच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होते ही आमच्या तमाम भाई लोकांची मागणी आहे. सरकारचे या धंद्याबाबतचे आकलनच कमी पडते. आता खंडणी पेटीएमने कशी घेणार? किंवा हप्त्याचे आरटीजीएस करा, असे कसे सांगणार? सरकारने या समस्या समजावून घ्यायला नको का? अनेक भाई लोकांनी तर या काळात हप्ता म्हणून सोने घेतले किंवा फ्लॅट लिहून घेतले, करणार काय? राज्यसभा किंवा विधान परिषदेत आमचा एखादा प्रतिनिधी असला पाहिजे ही आमची मागणी गेली कितीतरी वर्षे प्रलंबित आहे.

आजही गुरुकुलपद्धतीने भाई लोकांचे शिक्षण चालते. मोठय़ा भाईकडे पडेल ती कामे करत त्याच्याकडून उदयोन्मुख भाईला शिक्षण मिळवावे लागते. कोणत्याही प्रकारची प्रचलित शिक्षण व्यवस्था उपलब्ध नाही. हल्ली पदवी कोणाकडेही असते; एक रिसर्च असे सांगतो, की पदवीधरांची संख्या दरवर्षी ज्या प्रमाणात वाढते, त्याच प्रमाणात भाईगिरी हे करिअर निवडणाऱ्यांची संख्याही दरवर्षी वाढते. तेव्हा किमान पदवी हा या व्यवसायात येण्याचा पाया असला पाहिजे. एका सामान्य पंटरला भाई बनवण्याचा पदव्युत्तर कोर्स विद्यापीठांनी पुढाकार घेऊन बनवला पाहिजे.

या कोर्समध्ये फोनवर कसे बोलावे, भरधाव वाहने कशी चालवावीत, कमरेत बंदूक लावलेली असताना खुर्चीवर कसे बसावे, पेटी-खोका या एककात पैसे कसे मोजावे, मृतदेहाची विल्हेवाट, भाईगिरीशी निगडित कायदे आणि पळवाटा, शस्त्रांची  व्युत्पत्ती आणि विकास, एन्काउंटर : शोध व बोध, सेटिंग : एक शास्त्र की कला, कारागृह : व्यक्ती विकासातील एक अटळ टप्पा, सार्वजनिक समारंभातील भाईगिरीला साजेशी नृत्यकला, भाईगिरीतील बदलते जागतिक प्रवाह या आणि अशा नित्योपयोगी शिक्षणाचा समावेश असावा.

भारताला नेमबाजीत कुठला तरी पुरस्कार मिळाल्याचे माझ्या वाचनात आले, या खेळातील प्रावीण्य मिळवणाऱ्यांना रोजगाराच्या कितीतरी संधी आमच्याकडे उपलब्ध आहेत. शार्प शूटरना आमच्याकडे खूपच जास्त मागणी आहे. आम्ही त्यांना भरपूर पगार देतो. अप्रशिक्षित लोक सध्या गरज पडेल तशी बंदूक चालवतात, त्यामुळे खूपच अडचणींना आम्हाला तोंड द्यावे लागते. मागे एकदा चकमकीच्या धकाधकीत एका पंटरचा नेम चुकला आणि त्याने आमच्याच टोळीतल्या दोन पंटरला ठार मारले. बऱ्याचशा पंटरचे हात व्यवसायबा कारणांनी थरथरण्याचे प्रमाण फारच वाढले आहे, त्यामुळे अनेकदा तर फुटबॉल एवढी मोठी जरी बंदुकीची गोळी बनवली तरी लागेल की नाही, अशी भीती वाटते. त्यामुळे लक्ष्यावर गोळी न लागण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. नंतर अमुक एक व्यावसायिक गोळीबारातून थोडक्यात बचावला वगैरे बातम्या टोळीच्या नावानिशी छापून येतात आणि आमची प्रचंड बदनामी होते. आमचे नेम चुकले तर कोणालाही आमच्या टोळीचे नाव छापता येणार नाही अशी कायद्यात तरतूद करायला हवी. मीडियावाल्यांचा आम्हाला फार त्रास होतो, हे लोक धड माहितीपण घेत नाहीत. मागे मी एका चॅनेलवाल्याला बँकॉकहून बोलतोय म्हणून भायखळ्याहून फोन केला होता, तर त्याने दिवसभर ब्रेकिंग न्यूजचे दळण लावले होते. आपले सगळे पंटर खूश झाले, तेवढीच मजा! मी तेव्हाच ठरवले, खबऱ्या म्हणून चॅनेलवाल्यांचा काही उपयोग नाही. त्यांची माहिती टीप म्हणून मनावर घेतली तर आपलाच गेम व्हायचा. मी आता सगळ्या चॅनेलवाल्यांचे नंबर सेव्ह करून ठेवलेत. एखाद्याचा गेम झाला आणि तो कोणीही केला तरी मीच चॅनेलला फोन करतो आणि कधी बँकॉक तर कधी दुबईवरून फोन केलाय सांगतो. आणि गेमची जबाबदारी आमची आहे असे सांगतो. मला हे कळून चुकले आहे, की गेम करण्यापेक्षा तो आम्ही केलाय हे चॅनेलवाल्यांना कळवणे फार महत्त्वाचे आहे, तरच आपले नाव होते. आता कोणत्याही गँगने गेम केला तरी मीच चॅनेलवाल्यांना प्राइम टाइमला फोन करतो, त्यामुळे माझे फारच नाव झाले आहे. माझा नंबर सेव्ह केल्याने दोन-चार चॅनेलवाल्यांना धाडसी रिपोर्टिगचं अवॉर्डपण मिळालं, आता बोला! आता दोन-चार चॅनेलवाले मला चावट जोक पाठवण्याइतके जवळचे झाले आहेत. मीपण त्यांना सकाळी सकाळी देवाचे फोटो पाठवतो. मी भायखळ्याहून बोलत असतो हे कोणाला बोलू नका.

एखादा पंटर पकडला गेला तर त्याच्या तोंडावर फडके टाकून लोकांसमोर नेतात हे फार अन्याय्य आहे. आमचे पंटर पकडण्यापूर्वी फेशिअल करून तयार असतात. मस्त हेअरकट करून केस रंगवून घेतात, तोंडावर फडके टाकले की ही सगळी तयारी वाया जाते, पोलिसांत कोणी मोठा अधिकारी ओळखीचा असेल तर त्यांच्यापर्यंत ही कैफियत पोचवणे.

राजकारण्यांनी साहित्यिक, सांस्कृतिक व्यासपीठापासून दूर राहिले पाहिजे अशी मागणी असल्याचे मी वाचले, ही अगदी बरोबर मागणी आहे. अशा पवित्र ठिकाणी राजकारण्यांनी जाताच कामा नये. मी साहित्यिकांचे दु:ख समजू शकतो, आपल्या फील्डमध्ये कोणी दुसरा आला की त्रासच होतो. हल्ली आमच्यापण फील्डमध्ये राजकारणी यायला लागले आहेत. अशा पवित्र ठिकाणी त्यांनी येऊ  नये हे आम्हालापण वाटतेच.

आपण आमच्यासाठी खूप प्रयत्न करता हे बघून खूप आनंद झाला. तुमचा काही म्याटर असला तर कळवावे. सुपारी म्हणून नाही, तर लहान भावाचे काम म्हणून करून देईन. नवीन घोडा आला आहे, पाठवून देऊ  काय? पैशाचा विषय नाही, तुमच्याकडे साधा कट्टापण नाही हे कळले, चिंता वाटते म्हणून बोलतो. भाषेला हसू नये, एका मास्तरला उचलले आणि लिहून घेतले.

तुमचाच,

(नाव लिहीत नाही.)

मंदार भारदे mandarbharde@gmail.com