परदेशी पाहुणे येतात तेव्हा त्यांना जर कधी रस्त्याने घेऊन फिरायचे असेल तर मला फारच तयारी करावी लागते. जवळजवळ प्रत्येक प्रगत देशात लोक दर अध्र्या तासाने पाणी पितात. किमान पाव लिटर पाणी तर ते पितातच. पाणी प्यायले नाही तरी काहीतरी शीतपेय पितात. साहजिकच आपल्यापेक्षा त्यांना जास्त वेळा शौचालयात जायची गरज भासते. साधारण दर दीड तासाने किमान एकदा तरी.

परदेशी लोकांबरोबर जायचे असेल तेव्हा मी ज्या रस्त्याने जायचे आहे त्या रस्त्यावर कुठे कुठे आणि किती शौचालये आहेत हे नोंदवून ठेवतो. त्याची नीट उजळणी करून ठेवतो. गूगलने जेव्हा त्यांच्या मॅपवर शौचालये वेगळी, ठसठशीतपणे दाखवायला सुरुवात केली तेव्हा कुठे गूगल ‘भारताळलाय’ याची खात्री पटली. मी माझ्या परदेशी मित्रांना घेऊन फिरायला जातो तेव्हा त्या रस्त्यावरची सर्व तारांकित व चांगली हॉटेल्स शोधून ठेवतो आणि त्यातल्या कोणीही  शौचालयात जायची इच्छा व्यक्त केली, की त्यांना तिथे घेऊन जातो. मुंबईतील कितीतरी हॉटेलांच्या शौचालयांना मी अशी भेट दिली आहे आणि लाजेकाजेस्तव विनाकारण एक कॉफी ऑर्डर करून पाच-सहाजणांनी हॉटेलचे शौचालय वापरले आहे. हे खूप विचित्र आहे; पण त्याला काही इलाज नाही. आपण भारतीय लोक कुठल्याही शौचालयात जाऊ  शकतो. आपल्यापैकी बहुतेकांना फक्त आडोसा असला तरी तो पुरेसा असतो. स्वच्छता ही एकतर आपल्याला गरजेची वाटत नाही; किंवा ती नसेलच, हे आपण गृहीतच धरलेले आहे. त्यामुळे आपल्याकडे बहुतांश शौचालये ही फक्त आडोसे आहेत. आणि हे आडोसेही पुरेशा संख्येने नाहीत.

माझ्या एका परदेशी मित्राने मला एक गमतीशीर निरीक्षण ऐकवले होते. तो म्हणाला, ‘तुझ्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात फोनची रेंज येऊ  शकते, तर कुठल्याही कोपऱ्यात स्वच्छ शौचालय का असू शकत नाही?’ आता या प्रश्नाचे काय उत्तर देणार! युरोपमधील वा मध्य आखातातील अनेक देशांपेक्षा आपल्याकडे खरंच मोबाइलची रेंज चांगली मिळते. देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही मेल चेक करू शकता. पण तुम्हाला तिथे चांगले शौचालय मिळेल का, याची कोणतीही खात्री देता येत नाही.

एका रिक्रूटमेंट कंपनीमध्ये मोठय़ा अधिकारपदावर काम करणाऱ्या एका महिलेने मला सांगितले, की मार्केटिंग किंवा सेल्सची कामे स्त्रिया स्वीकारत नाहीत, याचे  कारण त्यात खूप वेळ ऑफिसबाहेर फिरावे लागते आणि शहरात पुरेशी शौचालये नाहीत, त्यामुळे स्त्रियांची खूपच अडचण होते. स्त्रिया कामासाठी बाहेर पडल्या की त्यांच्या मनात कुठेतरी सतत रस्त्यात ट्रॅफिक ज्याम झाले तर काय करायचे? किती काळ रोखून धरावे लागेल? चाललो आहोत तिथे जवळपास शौचालयाची सोय असेल का? असलीच तर ते किमान स्वच्छ तरी असेल का? याच विचारांत शहरातल्या बायकांचा बराच वेळ जातो. अनेकदा अगदी शहरातल्या शहरातसुद्धा शौचालय आहे की नाही हे माहीत नसल्याने प्रवास करायचं टाळलं जातं. कामावर निघताना कितीतरी जणी लिमलेटच्या गोळ्या पर्समध्ये ठेवतात व पाण्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करतात. आणि दिवसचे दिवस पाणी पिण्याचे टाळतात. किडनी स्टोनच्या आजाराला कितीतरी स्त्रिया आणि पुरुषांना सामोरे जावे लागते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे टाळतात आणि ऐन वेळेला फजिती होऊ  नये म्हणून पाणीच पीत नाहीत, हेही एक आहे. मागे एकदा एक एअरपोर्ट सिक्युरिटीत काम करणारी मुलगी मला म्हणाली होती- खरं तर तिला पोलीसच व्हायचे होते, परंतु बंदोबस्ताच्या ठिकाणी आणि पोलीस स्टेशनमध्ये चांगले तर सोडाच, पण अनेकदा शौचालयच नसते. म्हणून मग जिथे स्वच्छ शौचालय असते अशा एअरपोर्ट सिक्युरिटीच्या नोकरीत ती आली. मुंबई-नागपूर किंवा मुंबई-कोल्हापूर अशा लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासात गलिच्छ शौचालयांच्या दहशतीमुळे एकदाही शौचालयात न जाणारे लोक मला माहीत आहेत.

शौचाला जावे लागणे हा काही नुकताच लागलेला शोध किंवा आजार आहे का? की हा प्रश्न कसा हाताळायचा हे अजून आपल्याला समजलेलेच नाही. लोक कामाकरता घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना किती संख्येने शौचालये लागतील, हा आकडा काढणे इतके अवघड आहे? शहरांत कारंजी आहेत, होर्डिग्ज लावायला जागा आहेत, पुतळ्यांकरिता जागा आहेत, मंदिरांकरिता जागा आहेत. आणि फक्त शौचालयांकरताच जागा नाही, यावर कसा विश्वास ठेवायचा? आपण कसले डोंबलाचे नगरनियोजन करतो? शिक्षणविषयक काम करणारे एकजण मला म्हणाल की, पाचवी-सहावीनंतर अनेक मुली शाळा सोडून देतात, याचं कारण शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालयेच नाहीत. एखादीच्या न शिकण्याचे कारण शाळेत शौचालय नाही, हे असावे?

आपण माहिती व तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत. एक विकसित राष्ट्र आणि प्रगत अर्थव्यवस्था बनण्याकडे आपण वेगाने वाटचाल करतो आहोत. आपण सर्वात वेगाने आणि र्सवकष स्मार्टफोनचा अंगीकार सहजगत्या केला. मोबाइलमधील विविध अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर वापरायला शिकण्यातला आपला वेग हा जगाला लाजवणारा आहे. आपण मंगळयान बनवू शकतो. तर मग आपले लोक शौचालये पुरेशा संख्येने का बांधू शकत नाहीत? आणि बांधलीच, तर ती स्वच्छ  का ठेवू शकत नाहीत, हे अनाकलनीय आहे. सरकार घरोघर शौचालय बांधण्याची मोहीम राबवीत आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सबसिडी दिली जात आहे. तरीही अजून जेवढय़ा प्रमाणात शौचालयांचा वापर व्हायला हवा, तेवढा होताना दिसत नाहीए.

एकदा एका शेतातल्या घरात एकाशी बोलत बसलो असताना घरातले म्हातारे बाबा डबा घेऊन जाताना दिसले. त्या घरात चांगले शौचालय होते. विचारल्यावर कळले की, म्हातारबाबांना खुल्या वावरातच जायला आवडते. सकाळी सकाळी तंबाखू मळून बार लावला की त्यांना प्रेशर येते. घरच्यांनी शौचालय बांधल्यावर दोन-चार वेळा त्यांना त्यात पाठवायचा प्रयत्न झाला; पण या बाबांनी त्यास तीव्र विरोध केला. खुल्या ‘होल वावर इज अवर’मध्येच त्यांना बरे वाटते. छोटय़ाशा शौचालयात त्यांचा जीव घुसमटतो. आता चार-पाच एकरांचे शौचालय या बाबाला कसे बांधून द्यायचे? त्यापेक्षा जातोय तर जाऊ द्या मोकळ्यात- म्हणून कुणी त्यांना काही बोलत नाही. आता तंबाखू मळून ‘होल वावर’मध्येच शौचाला जायच्या या नबाबी शौकाबद्दल काय बोलणार?

मध्यंतरी कोणत्याशा सरकारी खात्याने गावात शौचालय असूनही उघडय़ावर शौचाला जाणाऱ्यांचे फोटो काढायची योजना काढली होती. सकाळी सकाळी डबे घेऊन जातानाचे फोटो काढले तर लोक लाजतील आणि मग ते उघडय़ावर जाणार नाहीत अशी त्यामागची कल्पना होती. लोक लाजायचे राहिले दूरच; त्यांनी फोटोग्राफरलाच तुडवला म्हणतात!

कमोड हा आतापर्यंतचा शौचाला जायचा सर्वात सोयीचा शोध. गुडघेदुखी, वाकण्याचा त्रास, कंबरेचा त्रास किंवा ज्यांना जास्त वेळा शौचाला जावे लागते अशांसाठी ही मोठीच सोय आहे. आपण ९९% भारतीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल कसे करायचे ते समजावू  शकलो. त्यातल्या अनेकांना ऑनलाइन पैसेही पाठवता येतात. पण त्यांना कमोड मात्र वापरता येत नाही. तेव्हा कमोड वापरणे हे भारतीय प्रज्ञेच्या कक्षेबाहेरचे काही आहे की काय असे मला वाटते. सार्वजनिक ‘सुलभ’ वा रेल्वेतले तर सोडाच; पण लोकांनी विमानातले कमोडही वापरण्याच्या लायकीचे ठेवलेले नसतात. विमानतळावर वा इतर सार्वजनिक ठिकाणी शौचालयातून एखादा भारतीय माणूस बाहेर आला की इतर लोक शक्यतो त्या शौचालयात जात नाहीत. हे थोडा अधिक काळ आपण त्या ठिकाणी थांबलो तर सहज आढळून येईल. हे वास्तव केवळ सार्वजनिक ठिकाणचेच नाही, तर घरातही आढळते. दीड-दोन करोडचे फ्लॅट विकत घेणाऱ्यांचे शौचालय दीडदमडीचे असल्याचा अनुभवही सर्रास येतो. आपल्याकडे मोठय़ा हॉटेलांमध्ये किंवा विमानतळावर तुलनेने बरी शौचालये असतात याचे श्रेय ते वापरणाऱ्यांचे नाही; किंबहुना, लोक ते नीट वापरणार नाहीतच हे लक्षात घेऊन दर पंधरा मिनिटांनी माणूस येऊन ते साफ करत राहतो म्हणूनच ही शौचालयं साफ राहतात.

चार सॅटेलाइट्स कमी सोडा, दोन क्षेपणास्त्रे कमी बनवा, रस्त्याचे दोन पदर कमी झाले तरी चालतील, किंवा दोन-चार शहरे कमी ‘स्मार्ट’ झाली तरी चालतील, जीडीपी एखाद् वर्ष अडखळला किंवा सेन्सेक्सचा जरा पदर ढळला तरी फरक पडत नाही; परंतु किमान वर्षभर तरी सारे लक्ष लोकांना शौचालयात जायला, ते स्वच्छ ठेवायला आणि नीट वापरायला शिकवण्यात गेले तर काहीही बिघडणार नाही.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com