आज खूप दिवसांनी उमाकाकू नेहाला घेऊन यशच्या घरी आली होती. यशची आई- राधा आणि उमाकाकू मत्रिणी होत्या. यश व नेहा एकाच शाळेतल्या वेगवेगळ्या तुकडय़ांत शिकत होते. आत्ताही स्वयंपाकघरात दोन्ही आयांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. बाहेर यश आणि नेहाच्या
१५ ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या चच्रेला बहर आला होता. तुमच्या वर्गाची तयारी, मित्रमत्रिणींची तयारी, समूहगानाच्या प्रॅक्टिसच्या वेळी कशा गमतीजमती होतात वगरे वगरे जोरदार चर्चा चालली होती. एवढय़ात यशने हळूच नेहाला एक बातमी दिली की, त्यानेही स्वातंत्र्यदिनानिमित्ताने होणाऱ्या गायन स्पध्रेत भाग घेतला होता.
नेहा म्हणाली, ‘‘मला नाही बुवा गाता वगरे येत. मी गोष्ट सांगणार आहे- शिरीषकुमारची! कित्ती शूर होता माहितीए तो. खरंच, सांगतानाही डोळ्यांत पाणी येतं माझ्या.’’
‘‘ए, मलाही सांग नं ती गोष्ट.’’
‘‘सांगेन, पण एका अटीवर. तूही मला गाणं म्हणून दाखवलं पाहिजे. आणि माझी गोष्ट कोण्णाला सांगायची नाही, अगदी शेजारच्या राहीलाही. कबूल?’’
‘‘कबूल, एकदम कबूल.’’
 ‘‘मग, ऐक तर..’’ नेहाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकता ऐकता यशचे डोळे पाण्याने भरून आले.
 ‘‘बाप रे, देशासाठी जीव गमावला त्याने.’’
 ‘‘ए, जीव गमावला नाही म्हणत, बलिदान म्हणतात बलिदान.’’ नेहाने सुधारणा केली.
‘‘अगं हो, माझ्याही गाण्यात असंच आहे, ऐक हं.’’ यशने गाण्याच्या ओळी ऐकवायला सुरुवात केली.
ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतिसम जीवन जगले
ते अमर हुतात्मे झाले..
‘‘पण यश, आपल्याला असं काहीच करावं लागत नाही. आपल्याला तर स्वातंत्र्य मिळालेलंच आहे. मग आपण कसं दाखवायचं देशप्रेम. काय करायचं बरं त्यासाठी?’’ नेहाला प्रश्न पडला.
‘‘सोप्पंय नेहा, आपण ना मोठेपणी सन्यात जाऊ. भारताच्या शत्रूंशी लढू ढिश्शुम.. ढिश्शुम.. करून.’’ यशने तोडगा सुचवला.
‘‘पण सगळ्यांना कुठे सन्यात घेतात. आणि मला तर फार भीती वाटते त्या लढाई वगरेची..’’ इति नेहा.
‘‘खरं तर मलाही.’’ यशनेही कबुली  दिली.
‘‘पण.. पण मला सांग, याशिवाय आपण काय करायचं देशासाठी? की असं करायचं नेहा, आपण सगळ्या मित्रमत्रिणींना गोळा करू आणि गांधीजी काढत ना तशी प्रभातफेरी काढू.’’
‘‘हो, हो, ते चालेल.’’ नेहाने रुकार भरला.
‘‘पण यश, गांधीजी तर भारत स्वतंत्र होण्यासाठी प्रभातफेरी काढत होते. आपण सगळ्यांना कशासाठी बोलावणार आणि कोण कशाला येईल? आता तर भारत स्वतंत्रच आहे.’’
‘‘हो, हेही बरोबर तुझं. पण नेहा, आपण देशप्रेम दाखवायचं कसं?’’
‘‘थांब, आपण विचार करू.’’
दोघंही शांतपणे विचार करू लागले. काही वेळाने दोघांच्याही आयांना प्रश्न पडला की, यांचे आवाज का बरं बंद झालेत. त्या बघायला बाहेर आल्या.
‘‘भांडलात की काय?’’
‘‘छे, आम्ही विचार करतोय.’’
दोघंही गप्पच होती ते पाहून आयांना हसू आवरत नव्हतं. ते दाबतच त्या म्हणाल्या, ‘‘एवढा विचार तरी कसला करताय? काही मदत हवीय?’’
‘‘तुम्ही चेष्टा नाही ना करणार?’’
‘‘नाही करणार, खरंच.’’
‘‘आम्ही देशप्रेम कसं दाखवायचं?’’ नेहाने सुरुवात केली.
‘‘म्हणजे बघा, आम्हाला हुतात्मा होता येणार नाही. तुरुंगातही जाता येणार नाही. प्रभातफेरी, सत्याग्रह वगरे तर शक्यच नाही. आणि देशप्रेम दाखवण्यासाठी हे सगळं करावं लागतं. ’’
मुलांचा हा विचार ऐकून दोघीही आया अवाक् झाल्या.
‘‘अरे वेडय़ांनो, तुम्ही म्हणता ते देशप्रेम आहे बरोबर. कारण त्या सगळ्या गोष्टी भारत पारतंत्र्यात होता नं तेव्हाच्या होत्या. पण आता आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपण आपला देश चालवतो. आपलं राज्य हे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता ती गरजच नाही.’’ – उमाकाकू
‘‘हो, पण आम्हाला बुवा सनिक वगरे व्हायला जमणार नाही.’’ दोघंही म्हणाली.
‘‘नका होऊ ना सनिक. अरे, प्रत्येक जण चांगला नागरिक होणं म्हणजेच देशप्रेम..’’ – राधा.
‘‘चांगला नागरिक म्हणजे नागरिकशास्त्रात असतो तो.’’ नेहा उत्स्फुर्तपणे म्हणाली.
‘‘नागरिकशास्त्रात नसतो, आपणच असतो. तो कसा असावा हे नागरिकशास्त्र शिकवतं.’’
‘‘म्हणजे पहा हं! देशाबाबतची सगळे हक्क आणि कर्तव्यं पार पाडणं म्हणजे देशप्रेम.’’
‘‘नाही समजलं हक्क आणि कर्तव्य? नको समजू दे. साधं लक्षात घ्या. वीज जपून वापरणं, दिलेली वेळ पाळणं, पाणी जपून वापरणं, विज्ञानाचा नीट अभ्यास करून ते उपयोगात आणणं, स्त्रियांना सन्मान देणं, आपलं काम  व्यवस्थित करणं, आपल्यासोबत इतरांचाही विचार करणं..’’
‘‘यापासून अगदी सिग्नल न तोडणं, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणं, एवढंच कशाला, तुमच्यासारख्या छोटय़ा मुलांनी चौरस आहार आणि योग्य व्यायाम करून तंदुरुस्त राहणं म्हणजे देशप्रेम आहे.’’
‘‘ते कसं? ते कसं? हे तर सगळं आपल्यासाठी आहे. देशासाठी काय असतं यात?’’
‘‘अरे, भारत देश म्हणजे भारताची फक्त जमीन नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिक म्हणजे भारत देश. त्या नागरिकाची जगात जी ओळख असते ती भारताची ओळख. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण तन, मन आणि धनाने परिपूर्ण नागरिक बनणं म्हणजे देशावरचं प्रेमच दाखवणं नाही का? भारताचा प्रत्येक नागरिक एक उत्तम नागरिक असेल, तर भारत देशही एक उत्तम देश समजला जाईल; आणि आपोआपच जगात त्याची मान उंचावेल. आणि भारत देशाचं नाव उंचावण्यासाठी केलेलं कार्य म्हणजे देशप्रेमी कार्य की नाही? काय पटतंय का?’’
दोघांनीही पटून जोरजोरात माना हलवल्या आणि यशने गाणं सुरू केलं –
हा राष्ट्रध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊ या अपुले
ते देशासाठी लढले..