साहित्य : काचेचा ग्लास, अर्धा ग्लास पाणी, पाव वाटी तेल, खाण्याचा (द्रव रूपातील) रंग, ड्रॉपर, चमचा, लिक्विड सोप.
कृती : काचेच्या ग्लासमध्ये प्रथम पाणी आणि तेल एकत्रित करून हे मिश्रण चमच्याने ढवळा. पाणी आणि तेलाचे मिश्रण कितीही वेळा ढवळले तरी पाणी आणि तेल एकमेकांपासून वेगळे झालेले तुम्हाला दिसेल. तेल नेहमीच पाण्यावर तरंगताना दिसते.
आता ड्रॉपरच्या साहाय्याने खाण्याच्या रंगाचे तीन-चार थेंब ग्लासमधील मिश्रणात टाका. रंगाचे थेंब ग्लासमधील तेलावर काही काळ तरंगताना दिसतील. नंतर हळूहळू हे थेंब तेलात न मिसळता सरळ रेषेत खाली जातील आणि ज्यावेळी हे थेंब पाण्यात मिसळतील त्यावेळी हे दृश्य आकाशात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे दिसेल.
आता याच मिश्रणात चमचाभर लिक्विड सोप घालून हे मिश्रण ढवळा आणि बघा काय होते ते! तेल आणि रंगीत पाणी आता एकजीव झालेले दिसेल.
असे का होते?
खाण्याच्या रंगांचे थेंब प्रथम पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या संपर्कात येतात. रंगांच्या रेणूंचे तेलाच्या रेणूंशी आकर्षण नसल्याने हे थेंब वेगळे राहून हळूहळू खाली जाऊ लागतात. ते तेलाखालील पाण्याच्या संपर्कात येताच पाण्याचे रेणू या थेंबांना आपल्यात ओढून घेतात
आणि एखादा फटाका फुटल्याप्रमाणे रंगाचा थेंब फुटून पाण्यात पसरतो. थोडक्यात रंगांच्या रेणूंचे तेलाशी सख्य नसते, परंतु पाण्याच्या रेणूंशी
मात्र असते.
पाणी आणि तेल यांच्या रेणूंचे एकमेकांशी आकर्षण नसल्याने हे थर वेगवेगळे राहतात हे आपण पाहिलेच आहे. पण प्रयोगाच्या दुसऱ्या भागात जेव्हा आपण त्यात लिक्विड सोप
टाकून ढवळतो त्यावेळी हे मिश्रण एकजीव होते. कारण साबणाचा रेणू एका बाजूने पाण्याच्या
रेणूला धरतो आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला तेलाच्या रेणूला चिकटतो. म्हणजेच तेल आणि पाण्याला एकत्र आणण्याचे काम लिक्विड सोपचे रेणू करतात.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com