सोनीतपूरच्या पोलीस महाअधीक्षक, संजुक्ता पराशर, आय.पी.एस. ऑफिसर. प्रशिक्षण संपवल्यावर त्यांना घरच्याच, आसाममधल्या माकूम भागात पहिलं पोस्टिंग मिळालं आणि काही तासांतच हिंसाचाराशी सामना करावा लागला.. तो नित्याचा झाला. डय़ुटीवर रुजू झाल्यापासून पहिल्या
१५ महिन्यांमध्येच त्यांनी बोडो बंडखोरांची अनेक महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करून
१६ बंडखोरांना कंठस्नान घातले, तेव्हापासून दरवर्षी १५०-२०० बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यात त्यांना यश आलं आहे. त्या आसामच्या मर्दानीची
ही संघर्षकथा.
पहाटेचे साडेतीन वाजले आहेत. घनदाट झाडी सर्वदूर पसरलेली आहे. मुसळधार पाऊस पडतो आहे. अशा काळोख्या रात्री आसाममधल्या सोनीतपूर जिल्ह्य़ातील काही पोलीस अधिकारी कामाला लागले आहेत. काम आहे बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत करण्याचं. आसाममधले पोलीस कमांडोज आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातले काही अधिकारी मिळून हे गस्तीचं काम करत आहेत..
दोनच दिवसांपूर्वी सोनीतपूर जिल्ह्य़ातील मालडंग या भागामध्ये काही बोडो बंडखोरांनी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सैन्याचे १८ जवान मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे तेजपूरपासून केवळ ८० किलोमीटरवर असलेल्या या भागात गस्त घालणं अत्यावश्यक होतं. या कामाचं नेतृत्व करत होत्या सोनीतपूरच्या पोलीस महाअधीक्षक, संजुक्ता पराशर!
आसाममध्ये बोडो बंडखोरांनी सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी आखलेल्या अनेक योजना पराशर यांच्या नेतृत्वाखाली उधळून लावल्या गेल्या आहेत. गेल्याच महिन्यात या मालडंग भागात त्यांच्या नेतृत्वाखाली ४ बोडो बंडखोरांना अटक करण्यात आसामच्या पोलीस दलाला यश आलं आहे. भारताला खरं तर महिला आय.पी.एस. अधिकारी नवीन नाहीत. पण संजुक्ता पराशर काही सर्वसाधारण आय.पी.एस. अधिकारी नक्कीच नाही! त्यांच्या बरोबर काम करणाऱ्यांमध्ये असं म्हटलं जातं की, आसामला दहशतेखाली ठेवणारे बोडो, एका नावाला घाबरतात, ते नाव म्हणजे संजुक्ता पराशर!
संजुक्ता पराशर या २००६ सालच्या आय.पी.एस. अधिकारी. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षेत त्यांनी ८५ वा क्रमांक मिळवला. रोज केवळ ५ तास अभ्यास करून (हो, ही परीक्षा देणाऱ्या लोकांसाठी ५ तास अभ्यास म्हणजे काहीच नाही! पास झालेले लोक आम्ही १२-१२ तास अभ्यास करायचो, असं गर्वाने सांगतात!) त्यांना मिळालेलं हे यश त्यांच्यासाठीसुद्धा आश्चर्याचा एक सुखद धक्काच होता! संजुक्ता पराशर यांची आई, मीना देवी या आसाम आरोग्य मंडळात कार्यरत होत्या आणि त्यांचे वडील दुलालचंद्र बरुआ हे जलसंपदा खात्यामध्ये प्रमुख अभियंता म्हणून काम करायचे. लहानपणी लखीमपूर येथे राहत असलेलं त्यांचं कुटुंब काही वर्षांतच गुवाहाटी येथे नोकरीच्या निमित्तानं राहायला आलं. त्यामुळे संजुक्ता यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण गुवाहाटीच्या होली चाइल्ड स्कूलमधून पूर्ण झालं. शाळेत असल्यापासूनच त्यांना सर्व प्रकारच्या खेळांमध्ये रस होता. खेळाबरोबरच त्या अनेक नाटय़ व विविध गुणदर्शन स्पर्धामध्येही भाग घेत असत. लहानपणी मित्र-मैत्रिणींबरोबर काही प्रकल्प केल्यामुळे त्यांना सर्वाना एकत्र घेऊन काम करायची सवय लागली. त्यामध्ये एखाद्या माणसाचा स्वभाव त्याला दिलेल्या जबाबदारीला पूरक आहे का? नसेल तर त्यासाठी काय करायचं, गटातल्या सर्वाचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य निर्णयापर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्यासाठी लागणारे गुण त्यांना शालेय जीवनातच मिळाले. ते शिक्षण त्यांना आजही खूप महत्त्वाचं वाटतं, असं त्या म्हणतात. पराशर यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीच्या सुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयामध्ये आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इथूनच त्यांनी अमेरिका आणि आशिया यांच्यातील संबंध याविषयावर एम.फिल. ही पदवीदेखील प्राप्त केली. २००४ साली सुप्रसिद्ध ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि २००६ साली देशभरातून ८५ वा क्रमांक मिळवून आपल्या कामाची सुरुवात केली. त्यांचा क्रमांक बघता आय.ए.एस. मध्ये सहज जाता आलं असतं. तिथे त्या सध्याच्या तुलनेत आरामात आयुष्य घालवू शकल्या असत्या. पण त्यांनी खडतर प्रवासाची ही भारतीय पोलीस सेवाच पसंत केली.
२००८ साली आपलं ट्रेनिंग संपवल्यावर त्यांना त्यांच्या होम स्टेट म्हणजे आसाममधल्या माकूम भागात पहिलं पोस्टिंग मिळालं. पोस्टिंगच्या काही तासांतच त्यांना पोलीस सेवेमध्ये काय काम करावं लागू शकतं याची झलक दाखवणारी घटना घडली. पोस्टिंग झाल्याच्या दोन तासांच्या आत त्यांना उदालगुरीला तातडीने पोहोचण्याचा आदेश आला. त्या वेळी तिथे बांगलादेशी घुसखोर आणि बोडो बंडखोर यांच्यात हिंसक संघर्ष सुरू झाला. पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांना हिंसाचाराच्या वास्तवाशी सामना करावा लागला. या अनुभवाबद्दल त्या म्हणतात की ‘मी याच भागातली असले तरी अशा प्रकारचा हिंसाचार माझ्यासाठी नवा होता. केवळ एखादा माणूस एका जमातीत जन्माला आला आहे म्हणून त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं हे लक्षात आलं. हा अन्याय असला तरी हेच वास्तव आहे आणि याच वास्तवाचा सामना आम्हाला करायचा आहे!’. या हिंसक जमावाला त्यांनी आणि त्यांच्या टीमने धिटाईने आवर घातला.
याच वर्षी त्या एका मोठय़ा अपघातातूनही बचावल्या. धरापूर येथे त्यांच्या जिप्सीची आणि एका वाहनाची टक्कर झाली. संजुक्ता म्हणतात की, या भागात काम करणं फक्त अतिरेकी हल्ल्यांमुळेच धोकादायक नाही, तर इथलं घनदाट जंगल, वन्यप्राणी, तसेच इथले रस्ते, यामुळेही इथे काम करणं जोखमीचं आहे. गस्तीच्या वेळी अनेकदा, त्यांना आणि त्यांच्या टीमला हत्तींच्या कळपाशी सामना करावा लागला आहे. अशा वेळी स्थिती जैसे थे असते. तो कळप तिथून हलेपर्यंत रात्रीच्या काळोखात त्या जंगलात कित्येक तास काढावे लागतात. उन्हाळ्यात घामाने हैराण होतो, तर पावसाळ्यात ४-५ फूट पाण्यातून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत राहूनही संजुक्ता पराशर यांनी डय़ुटीवर रुजू झाल्यापासून पहिल्या
१५ महिन्यांमध्येच बोडो बंडखोरांची अनेक महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करून १६ बंडखोरांना कंठस्नान घातले आहे, तर ६४च्या वर बोडो बंडखोरांना अटक केली. तेव्हापासून दरवर्षी १५०-२०० बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यात त्यांना यश आलं आहे.
हे जंगल राखीव असल्यानं इथे सरकार कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा देऊ शकत नाही. तरीही इथे राहणाऱ्या लोकांनी या जंगलांवर अतिक्रमण करून आपली वस्ती वाढवली आहे. बोडो बंडखोर अशा वस्त्या लपायची, राहायची जागा म्हणून वापरतात. बंडखोर नागरी वस्तीत राहिल्यामुळे पोलिसांना खूप विचारांती कृती करावी लागते. अनेक वेळा स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बंडखोर पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यावर हल्ला कधी होणार आहे हे त्यांना पक्कं माहीत असतं. त्यामुळे ते हल्ल्याच्या आधीच तिथून निसटतात. त्यासाठी बंडखोरांपेक्षा एक पाऊल पुढे असणं ही या संघर्षांतील सर्वात अवघड बाजू आहे. या सगळ्या अडचणींवर मात करून संजुक्ता पराशर यांना बोडो बंडखोरांना पकडण्यात आलेलं यश वाखाणण्याजोगं आहे.
२००८ साली त्यांचा विवाह पुरू गुप्त यांच्याशी झाला. पुरू हे चिरांग जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांची आई सध्या त्यांच्याबरोबर सोनीतपूरला राहते. कामाच्या आवाक्यामुळे आपण कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. त्यांची आणि त्यांच्या पतीची भेटही अनेकदा दोन-दोन महिन्यांनी होते. एक स्त्री म्हणून हे काम अवघड वाटतं का, असं विचारल्यावर त्या म्हणतात ‘‘एकदा का तुम्ही सव्‍‌र्हिसेसमध्ये रुजू झालात की तुमच्याकडे एक महिला किंवा पुरुष असं बघितलं जात नाही, आसाममध्ये तर नक्कीच नाही. तुमची काम करण्याची पद्धत, पात्रता, योग्यता आणि तुमच्यातले गुण, केवळ याकडे लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालात की ते तुम्हाला कायमची साथ देतात. तुमचे सहकारीच तुमचे कुटुंब असते.’’
संजुक्ता पराशर यांच्या आजच्या तरुणाईकडून खूप अपेक्षा आहेत. शक्य असेल तेव्हा त्या तरुण-तरुणींना भेटून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्या मते, पोलीस सेवा ही कायमच गैरसमजांमुळे झाकोळली गेलेली सेवा आहे. यामध्ये काही दोष नक्कीच आहे, पण तुम्ही हे दोष दूर करण्याचा प्रयत्न करणार की त्या दोषांवर टीका करत आपला वेळ घालवणार, हे तुम्ही ठरवायला हवं. व्यवस्थेच्या आतमध्ये राहूनच व्यवस्था बदलता येते, बाहेर राहून फक्त टीका करता येते, असंही त्या म्हणतात. भारताच्या प्रशासकीय सेवांमध्ये चांगल्या, विचार करणाऱ्या, कर्तबगार अधिकाऱ्यांची गरज आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानी तुमची हुशारी, तुमच्यातलं सामथ्र्य पणाला लावायचं असेल तर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवांमध्ये रुजू होण्याचं आवाहन त्या कायम करतात.
..पहाटे साडेतीन वाजता सुरू झालेली गस्त आता दुपारच्या आसपास संपली आहे. किमान आजचा दिवस तरी सोनीतपूर जिल्ह्य़ामध्ये हिंसाचार होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. आजचा दिवस शांततेत जाईल. उद्याचा, माहीत नाही. पण उद्याचा दिवस सुरक्षित करण्यासाठी संजुक्ता पराशर आणि त्यांचे सहकारी सज्ज आहेत..
प्रज्ञा शिदोरे -pradnya.shidore@gmail.com