‘‘उगा सीरियस, डोक्याला ताप देणारे नको, चैन घालवणारं नको. आता सगळं कसं हलकंफुलकं पाहिजे. लोक म्हणतात, आम्ही हजार उद्योगांमधून घटकाभर टॅमपासला येणार ते ओझं घेऊन कुठे जाणार? जास्त तयारीबियारी करण्याची जोखीम बोलणाऱ्यावर नाही.. जास्त दिल लावून ऐकण्याचा दाब ऐकणाऱ्यावर नाही.. हे असं असतं बघा सगळं..’’
सकाळी ताजं वर्तमानपत्र चाळताना हव्या त्या नाटकाची जाहिरात दिसली तेव्हा ती सुखावली. ‘इच्छामरण’ या विषयावरचं अलीकडचं खूप अर्थगर्भ नाटक होतं म्हणे ते. परीक्षणं छान आलेली होती, प्रयोग कमी व्हायचे, नेमके तिच्या गैरसोयीच्या जागी, वेळी व्हायचे. म्हणून अजून नाटक बघण्याचा योग आला नव्हता. त्या दिवशी जाहिरात बघता तिनं घरात बघण्याचा विषय काढला. मुलगा-सून दोघांचाही कोमट प्रतिसाद आला. ‘जाऊ एकदा’, ‘बघू सवडीनं’ इथपत प्रतिक्रिया ऐकल्यावर ती न राहवून म्हणाली, ‘‘वेळीच बघायला हवं हं हे नाटक. किती दिवस प्रयोग करतील काय माहिती.. मागून हुकलं म्हणून हळहळ करायला नको.’’
‘‘नाटक बघायला आम्हालाही आवडतं आई. पण जरा लाइट, हलकंफुलकं काहीतरी शोध ना. दिवसभर धकाधक केल्यावर रात्री पदरचे पैसे टाकून डोक्याला ताप देणारी नाटकं बघायची कोणाला हौस आहे?’’
‘‘मला आहे असं समज.’’
‘‘तुझं ठीक आहे ग. तुझ्या वयात तुझ्या आयुष्याच्या स्टेजमध्ये तुला काही टेन्शन्स नाहीयेत. आमचं लाइफ फार टफ आहे. टू मेनी इश्यूज टू टॅकल..’’ मुलगा आपला मुद्दा लावून धरणार तेवढय़ात सून संवादामध्ये घुसली.
‘‘खरंच आई. साधं ट्रॅफिकमधून वाहनासकट स्वत:ला सुखरूप घरी आणणं हेही संकट होत चाललंय दिवसेंदिवस. घरातले नोकर.. आमच्या नोकऱ्या.. मुलांची शिक्षणं.. आहार.. आरोग्य.. प्रत्येक बाबतीत संघर्ष आहेच. दिवसभर एवढी तलवारबाजी केल्यावर ‘अ‍ॅट द एण्ड ऑफ द डे’ आम्ही आणखी कल्हई नाही करून घेऊ शकत आमच्या डोक्यांना. कॉमेडी.. फार्स.. रेव्ह्य़ू.. असं काही असलं तर सांगा.’’
‘‘सांगते’’ ती म्हणाली. सांगू शकली नाही. मनामध्ये त्या अर्थपूर्ण नाटकाची आस असताना ‘तीन तासांत तीनशे हशे’ वगैरे घेण्याची तिची मानसिक तयारी नव्हती. तो विषय तिथेच राहिला.
दुपारी नेहमीप्रमाणे आपल्या नेहमीच्या लायब्ररीत गेली. त्या वेळी तिनं असंच एक पुस्तक मनात धरलेलं होतं. ‘उजाखा’ (उदारीकरण, जागतिकीकरण, खासगीकरण) यांचा तिसऱ्या जगातल्या एकूण लोकांच्या कुटुंबजीवनावर काय परिणाम होतोय, होणार आहे याचा मागोवा घेणारं ते पुस्तक होतं आणि गेले काही दिवस त्याची जाहिरात येत होती. काउंटरसमोर उभं राहून तिनं ते पुस्तक मागताच त्याची कोरी करकरीत प्रत पुढय़ात येऊन पडली. खुशालून ती म्हणाली, ‘‘अरे व्वा! एवढं नवं पुस्तक आणि एवढय़ा सहज मिळतंय?’’
‘‘अशा पुस्तकांना मागणी कुठे असते मॅडम? ते काय एखाद्या टी.व्ही. स्टारचं आत्मचरित्र आहे की पहिल्या आठवडय़ामध्येच त्याच्यावर तीस-चाळीस ‘क्लेम्स’ लागावेत.?’’
‘हो बाई. त्या ‘उगवली शुक्राची चांदणी..’ मालिकेच्या नायिकेचं पुस्तक अजून बघायला मिळालेलं नाहीये मला. वर्ष होत आलं ते पुस्तक येऊन तरी लोकांच्या उडय़ा काही संपत नाहीत.’’
आता सगळी डिमाण्ड तशाच पुस्तकांना मॅडम! असली पुस्तकं आपली आम्ही विकत घ्यायची म्हणून घेतो. सरकारी ग्रॅण्टचे नियम असतात ना म्हणून अशी अडगळ बाळगायची. एरवी नुसतीच शेल्फांची धन असतात असली पुस्तकं.
अशी पुस्तकं-असली पुस्तकं असे तुच्छतापूर्ण उल्लेख करताना तिथली सेविका दरवेळेला तिच्या हातातल्या नव्या पुस्तकाकडे कटाक्ष टाकून तोंड वेडंवाकडं करत होती. शेवटी तिला राहावलं नाही. टोकदार प्रश्न विचारल्याशिवाय. हातातल्या पुस्तकावर मायेचा हात फिरत म्हणाली, ‘‘असली पुस्तकं म्हणजे?’’
‘‘म्हणजे सीरियस हो. करणारे ढीगभर अभ्यास करून लिहितात. पण,
वाचणारे आहेत कुठे? आम्हा लायब्ररीवाल्यांना बरोब्बर कळतं कशाला मागणी असते ती. आजकाल बहुतेकांना लाइटरीडिंग पाहिजे. इथे आले की लगेच सांगतात, ‘‘काहीतरी हलकंफुलकं द्या वाचायला! जास्त विचारबिचार, टेन्शन अस्वस्थता हे नका मागे लावू. आधीच आहेत ते व्याप काय कमी आहेत?’’
‘‘हो का? असेल. तसं असेल. ‘‘तिनं तिथून पाय काढताना म्हटलं. घरी जाऊन ते ‘त्यस्यं’, ‘त्यस्यलं’ वगैरे पुस्तक वाचण्याची तिला ओढ होती. लायब्ररीच्या बाहेर पडणार तर इमारतीच्या मुख्य फाटकाजवळ संस्थेचा जुना सेवक फळ्यावर खडूने काहीतरी नोटीस लिहीत होता. लायब्ररी ज्या संस्थेची होती, त्याच संस्थेचे इतर अनेक उपक्रम चालत. करता करता ते एक सांस्कृतिक केंद्रच ठरावं इतपत उलाढाल होई तिथे. पुस्तक प्रकाशन समारंभ, सत्कार, व्याख्यानमाला, भाषणं, नाटय़वाचन असं बरंच काही! आता फळ्यावर अशाच एका कार्यक्रमाची जाहिरात आकाराला येत होती. गावातल्या एका सुप्रसिद्ध डॉक्टरांना नुकतीच ‘पद्मश्री’ जाहीर झाली होती. त्यानिमित्त त्यांच्याबरोबर वार्तालापाचा कार्यक्रम ठेवलेला होता. कोणीतरी हुकमी निवेदिका त्यांना ‘बोलतं करणार आहे’ वगैरे लिहिणं चाललेलं होतं. ते वाचताना जराशी थबकून ती म्हणाली, ‘‘अहो मामा, डॉक्टरसाहेबांना बोलतं कशाला करायला हवंय? ते किती भरभरून आणि इंटरेस्टिंग बोलतात, हे काय आपल्याला जुन्या गावकऱ्यांना माहिती नाही?’’
‘‘असेल. पण मला लिहायला दिलेलं निवेदन असंच आहे.’’
‘‘फार मोठी व्यक्ती आहे ती. दम्यावरचं त्यांचं संशोधन आता अगदी जगभर पोचलंय. एवढा व्यासंग, एवढा अनुभव गाठीशी असणारा म्हणून स्वत:च तास-दीड तास अस्खलित बोलणार नाही का?’’
‘‘बोलेल की! लोक ऐकतील याची खात्री नाही.’’
‘‘का?’’
‘‘आजकाल असली एकतर्फी भाषणं नको असतात लोकांना. एकाच माणसाला दीड दीड तास कोण ऐकणार? पुन्हा तो फार सीरियस झाला की संपलंच. त्यापेक्षा प्रश्नोत्तरं बरी. मध्ये मध्ये जोक टाकता येतात.. किस्से घालता येतात..’’
‘‘मला नाही पटत.’’
‘‘नसेना! आपला अनुभव तोच आहे. उगा नोकरी केली का इथे २५ र्वष? व्याख्यान.. भाषण.. प्रवचन यांचा जमाना गेला आता. आता कसं, खेळीमेळीची चर्चा पाहिजे, परिसंवाद पाहिजे, मुलाखत पाहिजे. काय म्हणतात, त्या अनौपचारिक बाता पाहिजेत.’’
‘‘बाता नाही मामा, गप्पा. अनौपचारिक गप्पा तिला हसू आवरेना पण ‘मामा’ निर्विकार होते.
‘‘म्हणजे तेच ना सगळं.. उगा सीरियस, डोक्याला ताप देणारे नको, चैन घालवणारं नको. आता सगळं कसं हलकंफुलकं पाहिजे. लोक म्हणतात, आम्ही हजार उद्योगामधून घटकाभर टॅमपासला येणार ते ओझं घेऊन कुठे जाणार? जरा गमती गमतीत चार गोष्टी सांगायच्या जमल्या तर बघा. जास्त तयारीबियारी करण्याची जोखीम बोलणाऱ्यावर नाही.. जास्त दिल लावून ऐकण्याचा दाब ऐकणाऱ्यावर नाही.. हे असं असतं बघा सगळं.. सगळीकडे.
मामा सहज बोलले पण तिला उगाचच बारीकशी हुरहूर  लागली. सगळीकडे सगळं असंच असतं आताशा? कधीपासून? कशामुळे?
हा परिसर, ही संस्था, हा हॉल हे सगळं तिच्या नजरेसमोर घडलं, काही प्रमाणात तिच्या जगण्याशी समांतरपणे वाढलं. इथे जंगी भाषणांच्या फैरी झडल्या तो काळ काही दशकांपूर्वीपर्यंतचाच. अनेक भाषणांचं मर्म त्या त्या वेळी कदाचित पुरतं कळलंही नसेल पण ऐकत राहावंसं वाटलं. त्यातून पुढे प्रयत्नपूर्वक अधिक काही ऐकण्याची, वाचण्याची ओढ लागली. ह्य़ा हलकंफुलकंच्या हव्यासाने या सगळ्यावर अलगद कुरघोडी कधी आणि कशी केली? आजच्या पिढीत बघावं तो ‘तणावग्रस्त आहे’ म्हणतो. ‘तुमच्या पिढीला आमचे तणाव कळणार नाहीत’ असं म्हणतो. पण खरोखरीच तणावरहित जगणं कोणत्या पिढीला मिळतं? जमतं? एके काळची गरिबी, टंचाई, लहान घर, त्यात मोठी कुटुंबं, पोरवडा, एकटय़ा कमावणाऱ्यांवर पडणारा भार म्हणून चालणारी त्याची हुकूमशाही, स्वातंत्र्याचा- संधींचा अभाव, नात्यांच्या जाचक श्रेणी, रूढीपरंपरांचा लबेदा यातून काहीच तणाव निर्माण होत नसेल? का आज सगळ्याच गोष्टींचा बभ्रा अंमल जास्त होतो तसा ह्य़ा ताणतणावांचाही होतोय? एक वेळ मानलं, खरोखरच असह्य़ ताण आहेत, तर मग त्यांना थेट हित समजून घेण्याचं कोणीच का मनात घेत नाही? ‘हलकंफुलकं’ हे सगळ्यावर अंतिम उत्तर कसं असू शकतं? सगळ्यांनी सर्व वेळ त्याचीच कास धरली तर तणाव कमी होतील का वाढतील? आणखी जादा तणांवाना आणखी जादा हलकंफुलकं असं कुठवर मिळेल? कोण पुरवू शकेल? घरी येईपर्यंत तिला दमल्यासारखं झालं. शांतपणे खोलीत बसून राहावं म्हणून गेली तर जराशाने मुलगा तिथे आला.
‘‘आज खूप वेळ बाहेर होती का आई? दमलेली दिसतेस.’’
‘‘वाटतंय खरं थोडं तसं.’’
‘‘बघ. आऊटसाइड लाइफ इज व्हेरी स्ट्रेसफूल.. मी म्हणत नसतो नेहमी?’’
‘‘टी.व्ही. लावू? नवी हलकीफुलकी मालिका सुरू होत्येय आजपासून.’’
मुलगा उत्साहाने म्हणाला. बोलता बोलता त्याने टी.व्ही. सुरूही केला. कर्कश संगीत, रेकॉर्डिग लाफ्टर खोलीत घुमू लागला. वास्तविक याच्यापुढे या हलक्याफुलक्यांची मालिका कोणीतरी आवरायला पाहिजे. या अर्थाचं तिचं बोलणं त्या आवाजाने गिळून टाकलं. नेहमीप्रमाणं.