ऑस्कर स्पर्धेत उतरणाऱ्या भारतीय चित्रपटासाठी १ कोटी तर कान व व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतील भारतीय चित्रपटांना ५० लाख रुपये देण्याची योजना सरकारने आखली असून भारतीय चित्रपट निर्मात्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करताना आर्थिक पाठबळ मिळावे असा उद्देश त्यात आहे.

भारतात चित्रपटांचे चित्रीकरण व्हावे यासाठी प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात येणार आहेत. त्यासाठी गृह व परराष्ट्र मंत्रालयाक डे प्रस्ताव देण्यात आला आहे. परदेशी चित्रपट निर्मात्यांना या प्रवर्गात विशेष व्हिसा मंजूर केला जाणार आहे. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सांगितले, की याबाबत प्रस्ताव तयार केला असून चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यासाठी आर्थिक पाठिंबा दिला जाणार आहे. यात केंद्र सरकार चित्रपट निर्मात्यांचा परदेश प्रवास खर्च, प्रदर्शन खर्च, हॉल भाडय़ाने घेण्याचा परदेशातील खर्च केला जाईल, ऑस्करसाठी १ कोटी व व्हेनिस-कान महोत्सवांसाठी ५० लाख रुपये मदत केली जाईल.