निसर्गरम्य वातावरण, हिरवेगार मैदान आणि त्यावर हिरवी जर्सी घालून फूटबॉल खेळणाऱ्या तरुणी… जम्मू काश्मीरच्या सिटी मैदानातील हे चित्र. मैदानात फुटबॉल खेळणाऱ्या याच तरुणींनी दोन दिवसांपूर्वी जवानांवर दगडफेक केली होती. ‘हो, मी काल दगडफेक केली, पण मला ते करायचं नाही, मला देशासाठी फुटबॉल खेळायचे आहे’ असे २१ वर्षांची अफशान आशिक सांगते.

जम्मू काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना आणि फुटबॉल खेळणाऱ्या तरुणी असे परस्परविरोधी चित्र सध्या दिसत आहे. फुटबॉल खेळणाऱ्या या तरुणींशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने संवाद साधला. सोमवारी सरकारी महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांवर दगडफेक केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली होती. त्या दिवशी नेमके काय झाले होते हे महाविद्यालयातील कला शाखेत द्वितीय वर्षात शिकणाऱ्या अफशान आशिकने स्पष्ट केले.

‘मी आणि माझ्यासह माझ्या संघातील २० जणी खेळण्यासाठी मैदानाच्या दिशेने जात होतो. यादरम्यान तिथे काही तरुण जवानांवर दगडफेक करत होते. आमच्यातील काही तरुणी सुरुवातीला घाबरल्या होत्या. पण मी त्यांना धीर देत शांतपणे मैदानाच्या दिशेने चला असे सांगितले. पण जवानांना आमच्याविषयी गैरसमज झाला, आम्ही दगडफेक केल्याचे त्यांना वाटत होते’ असे अफशानचे म्हणणे आहे. ‘एका पोलिसाने आमच्या संघातील एका मुलीला मारले. मग आमचा राग अनावर झाला आणि आम्हीदेखील पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली’ असे अफशानने स्पष्ट केले. अफशान तिच्या संघाची प्रशिक्षक आहे. अफशानला जम्मू काश्मीरमधील पहिली महिला फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ओळखले जाते.

अफशानच्या संघातील १६ वर्षाच्या मुलीनेही पोलिस आणि सैन्याच्या जवानांवर दगडफेक केल्याचे मान्य केले. ‘मी व्हिडीओ बघितला आहे, जवान महिलांना मारत होते. पण मी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना घाबरणार नाही’ असे या १६ वर्षाच्या मुलीचे म्हणणे होते. आत्तापर्यंत मुलांच्या रक्ताने (बलिदानाने) आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही, कदाचित आता मुलींच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळेल अशी प्रतिक्रियाही काही तरुणींनी दिल्या.

अफशान मात्र तिच्या भूमिकेवर ठाम आहे. जम्मू काश्मीरचे भविष्य हे भारतासोबतच आहे. दगडफेक करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याऐवजी मैदानात उतरुन फुटबॉल खेळावे असे आवाहन करायला मी तयार आहे असे अफशान सांगते. तणावपूर्ण स्थितीत मैदानी खेळांमुळे काही अंशी फायदा होईल अशी आशा तिने व्यक्त केली. मी दगड फेकले होते, पण मला हे काम नाही करायचे. मला देशासाठी राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळायचे आहे असे अफशान आशिकने म्हटले आहे.