प्रशासकीय निर्णयांपासून ते मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये कायम सगळ्यांना चकवा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका या मुदतीपूर्वीच घेण्याचा विचार मोदी-शहा जोडीचा करत आहे. त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचा ‘फॉर्म्युला’ अवलंबत २०१८ हे वर्ष संपण्याच्याआधी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील १३ मुख्यमंत्री आणि ६ उपमुख्यमंत्र्यांची मोदी आणि शहांसोबत बैठक झाली. या बैठकीत मोदींनी २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. किंबहुना ही बैठक निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग होती, अशी चर्चा आहे, असे वृत्त ‘आनंदबझार पत्रिका’ने दिले आहे.

त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी निवडणूक आयोग आणि निती आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणे २०२४ मध्ये घेणे शक्य होईल, असे निती आयोगाने यापूर्वीच म्हटले होते. केंद्रातील मोदी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यास जून २०१९मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नोटाबंदी, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपविरोधी वातावरणनिर्मिती होण्यास सुरूवात झाली आहे. २०१९ पर्यंत जनतेचा रोष आणखी वाढू शकतो. त्यामुळे भाजप तोपर्यंत वाट पाहण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते. सत्तेतील शेवटच्या १०-१२ महिन्यांवर पाणी सोडून पुढची ५ वर्षे सत्ता मिळाल्यास ते कधीही चांगले, असेच भाजप नेतृत्वाला वाटत आहे.