पाकिस्तानने त्यांच्या भूमीत सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करावी, असे खडे बोल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी सुनावले आहेत. दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून उभे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

रेक्स टिलरसन यांनी परराष्ट्रमंत्रीपदी विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच भारताविषयीचे धोरण सांगितले. आशिया- पॅसिफिक क्षेत्रातील शांतता व स्थिरतेसाठी भारत आणि अमेरिकेने एकत्र काम करण्याची गरज आहे असे टिलरसन यांनी नमूद केले. दहशतवादाविरोधात प्रत्येक देशाने लढा देणे बंधनकारक आहे. गेल्या दशकभरात दहशतवादाविरोधात अमेरिका- भारतामधील सहकार्य वाढले असून दोन्ही देश आता खांद्याला खांदा लावून एकत्र उभे आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका आता माहित असलेल्या आणि संशयित दहशतवाद्यांवर नजर ठेवून आहेत. या वर्षात दहशतवादाविरोधात द्विपक्षीय नव्याने चर्चेला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण चीन सागरात चीनने आक्रमक भूमिका घेऊन थेट आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांना आव्हान दिले. याविरोधात अमेरिका- भारत एकत्र आहेत, असेही टिलरसन यांनी सांगितले. भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधावरही त्यांनी भाष्य केले. भारतात ५०० हून अधिक अमेरिकी कंपन्या कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेच्या परकीय गुंतवणुकीचे प्रमाण ५०० टक्क्यांनी वाढले. दोन्ही देशांमधील व्यवहार आता ११५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे, असे ते म्हणालेत.

टिलरसन यांच्यापूर्वी अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनीदेखील संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला इशारा दिला होता. पाकवर नजर ठेवण्यासाठी भारत आमची मदत करू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली असून अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे पाकचे धाबे दणाणले आहेत.