भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजदरात .२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार  पीएफमधील ठेवींवर ८.७५ टक्के व्याज मिळणार आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी हा व्याजदर देय असेल. पाच कोटी पीएफधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. भविष्य निर्वाह निधीच्या संचित ठेवींवरील व्याज साडेआठ टक्क्यांवरून पावणेनऊ टक्के करण्यात यावे, असा निर्णय १३ जानेवारी रोजी केंद्रीय कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएफ अधिकाऱ्यांच्या  बैठकीत घेण्यात आला होता. अर्थ मंत्रालयाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यावर मंजुरीचे शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आता ३१ मार्चपर्यंतच्या पीएफ ठेवींवर सुधारित व्याज मिळू शकणार आहे.