राजनाथ सिंह यांचे आश्वासन; महिनाभरात काश्मीरमध्ये दुसरा दौरा

गेल्या ४७ दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षांत फार मोठय़ा प्रमाणावर लोकांना जखमी करणाऱ्या छऱ्याच्या बंदुकांना (पेलेट गन्स) पर्याय शोधला जाईल, असे आश्वासन देऊन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काश्मिरी लोकांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.

काश्मिरी लोकांपर्यंत पोहचण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री महिनाभरात दुसऱ्यांदा अशांत काश्मीरमध्ये गेले आहेत. ‘इन्सानियत, जम्हूरियत व काश्मिरियत’ यांच्या परिघात जम्मू- काश्मीरला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कुणाशीही बोलण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीहून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच काश्मीर खोऱ्याला भेट देईल, तसेच देशाच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी लोकांच्या कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयात एक नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असे दौऱ्याच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारताचे भवितव्य काश्मीरच्या भवितव्याशी जोडलेले असून, काश्मीरचे भवितव्य सुरक्षित नसेल तर भारताचेही भवितव्य सुरक्षित राहू शकणार नाही, असे काश्मीरमधील असंतोषाने ४८ वा दिवस गाठला असताना सिंह म्हणाले.

अनियंत्रित गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पेलेट गन्सच्या वादग्रस्त उपयोगाबद्दल विचारले असता गृहमंत्र्यांनी सांगितले की, या मुद्दय़ावर विचार करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल तीन-चार दिवसांत येण्याची अपेक्षा आहे. बंदुकीच्या छऱ्यांमुळे हजारो लोक जखमी होण्यासह शेकडोंना अंधत्व आले आहे.

काश्मीरच्या युवकांना हातात दगड घेण्यास कोण भाग पाडते आहे? ते लोक यांच्या भवितव्याची हमी देतील काय? असे विचारून काश्मिरी युवकांनी हातात दगडांऐवजी पुस्तके व लेखण्या घेण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

देशाच्या इतर कुठल्याही भागाप्रमाणे काश्मीरच्या युवकांबाबतही सरकारला चिंता असल्याचे राजनाथ सिंह यांनी आवर्जून सांगितले. याच वेळी, स्थानिक युवक असोत की सुरक्षा दलाचे जवान, कुणाच्याही मृत्यूबद्दल भारतातील लोकांना दु:ख होते याचा त्यांनी उल्लेख केला.

देशाच्या इतर भागांमध्ये शिकणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या काश्मीरच्या लोकांचे संरक्षण करणे व त्यांचा आदर करणे हे देशाच्या नागरिकांचे कर्तव्य असून, काश्मिरी लोकांना आपल्या कुटुंबीयासारखे वागवायला हवे, अशी जाणीव गृहमंत्र्यांनी करून दिले.

पेलेट गन्सला पर्याय पावा शेल्स’?

नवी दिल्ली : काश्मीरमधील संघर्षांची परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा दले वापरत असलेल्या पेलेट गन्सविरुद्ध गदारोळ झाल्यामुळे त्यांना पर्याय शोधण्यासाठी गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने तुलनेने कमी प्राणघातक असलेल्या ‘पावा शेल्स’वर लक्ष केंद्रित केले आहे.

तिखट भरलेल्या ‘पावा शेल्स’मुळे लक्ष्याला (गर्दीला) काही वेळासाठी हालचाल करणे अशक्य करता येते. तज्ज्ञ समितीने या नव्याने विकसित करण्यात आलेल्या शेल्सची या आठवडय़ाच्या सुरुवातीला एका ‘टेस्ट फिल्ड’वर चाचणी घेतली. सुरक्षा दलांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच सध्या काश्मीरमध्ये होत असलेल्या निदर्शनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर लोकांना जखमी करणाऱ्या पेलेट गन्सऐवजी या शेल्सची उपाययोजना करण्यास समितीने पसंती दर्शवली. ‘पावा शेल्स’बाबत गेल्या वर्षभराहून अधिक काळ भारतीय विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) लखनौ येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सॉलॉजी रीसर्च’ या प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले. योगायोगाने, काश्मीर खदखदत असतानाच ते पूर्णपणे विकसित करण्यात आले आहे.