अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिदेन यांच्या डेलावर येथील निवासस्थानी चालत्या गाडीमधून गोळीबार करण्यात आला. गुप्तचरांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. हा गोळीबार मोठय़ा प्रमाणात झाला होता. त्या वेळी म्हणजे सायंकाळी ८.२५ वाजता बिदेन व त्यांचे कुटुंबीय घरात नव्हते.
गुप्तचर सेवेचे प्रवक्ते रॉबर्ट हॉबॅक यांनी सांगितले, की ८.२५ वाजता बिदेन यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी एक मोटार वेगाने गोळीबार करीत जाताना पाहिली.
सुमारे ३० मिनिटांनंतर हे वाहन न्यू कासल परगण्यातून जात असताना या मोटारीने बिदेन यांच्या निवासस्थानी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यासही दाद दिली नाही. पाठलाग करून अखेर ही मोटार पकडण्यात आली व चालकास अटक करण्यात आली. अटकेला विरोध केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
डेलावर येथे बिदेन आठवडय़ाच्या अखेरीस येत असतात व नंतर परत वॉशिंग्टनला जातात. उपाध्यक्ष बिदेन व त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर सेवांनी सांगितले, की न्यू कासल परगण्याचे पोलीस याबाबत चौकशी करीत आहेत.