विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच गुजरातमधील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले दिसत आहे. दिग्गज नेते रोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढण्यास प्रत्येक पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच पाटीदार समाजाचे एक नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपने आपल्याला पक्षात येण्यासाठी एक कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. पटेल यांच्या या आरोपानंतर हार्दिक पटेलनेही भाजपवर टीकास़्त्र सोडले आहे. गुजरातची जनता इतकीही स्वस्त नाही की भाजप त्यांना खरेदी करू शकेल. गुजरातच्या जनतेचा अपमान केला जात असून जनता आपल्या अपमानाचा जरूर बदला घेईन, असा घणाघाती हल्लाबोल हार्दिक पटेल यांनी केला आहे.

ट्विट करत हार्दिकने भाजपवर टीका केली. आंदोलनकर्त्यांना खरेदी करण्यासाठी भाजपने ५०० कोटींचे बजेट निश्चित केले आहे. मला हे समजत नाहीये की, विकास केला असेल तर लोकांना विकत कशाला घेताय, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. भाजपच्या विरोधात मी नव्हे तर गुजरातची ६ कोटी जनता लढत आहे. व्यापारी, शेतकरी, सर्व समाज आणि मजूर भाजपच्या हुकूमशाहीला त्रासले आहेत, असेही त्याने म्हटले.

भाजपला पराभूत करणे हेच लक्ष्य असल्याचे हार्दिक पटेलने आपल्या आतापर्यंतच्या वक्तव्यावरून दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरच तो काँग्रेसचा हात आपल्या हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी, भाजपनेही हार्दिक पटेलला धक्का देत शनिवारी वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांना भाजपत सामावून घेतले होते. तर सोमवारी काही दिवसांपूर्वीच ‘कमळ’ हाती घेणारे पाटीदार समाजाचे नेते निखील सवानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजप फक्त लॉलिपॉप दाखवत असून प्रत्यक्षात ते काहीच करत नाही, अशी त्यांनी केली होती.

दरम्यान, हार्दिक पटेलच्या ‘पाटीदार अनामत आंदोलन समिती’तील नेत्यांना पक्षात आणून पाटीदार समाजाची मते मिळवण्याची रणनिती भाजपने आखली होती. मात्र भाजपला लागोपाठ दोन धक्के बसले. भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर निखिल सवानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.