सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यानंतर आता लष्कराच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या शोषणाची व्यथा आपण व्यथा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे व्यक्त केली होती. त्यामुळे आपले कोर्ट मार्शल केले जाऊ शकते, असे या व्हिडिओमध्ये या जवानाने म्हटले आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या शोषणाची माहिती १५ जूनला राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना एका पत्राद्वारे दिल्याची माहिती देहरादूनमध्ये तैनात असलेल्या जवान यज्ञ प्रताप सिंह यांनी दिली आहे. जेव्हा ही बाब लष्कराच्या अधिकाऱ्यांना समजली तेव्हा त्यांना याबद्दल सुनावण्यात आले होते. आता यावरुन आपले कोर्ट मार्शल केले जाऊ शकते, असे यज्ञ प्रताप सिंह यांना वाटते आहे.

लष्करात अनेक ठिकाणी सैनिकांना कपडे धुण्यास, बूट पॉलिश करण्यास, कुत्र्यांना फिरवण्यास सांगितले जाते. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालण्याची विनंती यज्ञ प्रताप सिंह यांनी केली आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असेदेखील यज्ञ प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.

यज्ञ प्रताप सिंह यांच्या आरोपांना लष्कराने गांभिर्याने घेतले आहे. ‘लष्कर आणि त्यातील जवानांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एखाद्या जवानाला वैयक्तिक त्रास होऊ शकतो. अशा तक्रारींसाठी लष्करात एक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी संबंधित जवान आपली तक्रार नोंदवू शकतो. जवानाने तक्रार नोंदवल्यास योग्य कारवाई केली जाऊ शकते,’ असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

चारच दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. तेजबहादूर यादव यांनी कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे वाईट वागणूक दिली जाते, याचा पाढा व्हिडिओत वाचला होता. या व्हिडिओत जवानाने त्यांना दररोज पुरेसे आणि चांगले अन्न मिळत नसल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्यावर उपाशीपोटी झोपायची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा चीड आणणारा भ्रष्टाचाराचा प्रकारही समोर आला. याशिवाय, सीमेवर कार्यरत असताना जवानांना अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतो, हे पाहून अनेकांना धक्का बसला.