माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकूल असताना ओदिशातील एका दुर्गम गावातील अनाथ मुलीने आपल्या ‘एचआयव्ही’ग्रस्त भावंडांना कलाम यांनी दहा वर्षांपू्र्वी केलेल्या मदतीच्या आठवणी ताज्या केल्या. माझ्यासाठी डॉ. अब्दुल कलाम हे तारणहार होते. माझ्या एचआयव्ही ग्रस्त लहान भाऊ आणि बहिणीची कलाम यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे माझे भावंड आज जिवंत आहेत. कलाम यांची मी जन्मभर ऋणी राहीन, असे तिने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
माझ्या भावंडांबद्दल कलाम यांना पत्र लिहून कळवले होते, मात्र त्यावर लगेच उत्तर येईल असे सुरूवातीला वाटले नव्हते. जून २००५ मध्ये जेव्हा पोस्टमन माझ्याकडे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी स्वाक्षरी केलेले पत्र आणि २० हजार रुपयांचा ड्राफ्ट घेऊन आला तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू दाटले, असे ती म्हणाली. त्यावेळी मी केवळ ११ वर्षांची, तर माझा लहान भाऊ आणि बहिण अनुक्रमे ६ आणि ४ वर्षांचे होतो. लहानपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने दोन्ही भावंडांची जबाबदारी माझ्या एकटीवर होती. त्यात दोन्ही भावंड एचआयव्ही बाधित होते. अब्दुल कलाम ‘लोकांचे राष्ट्रपती’ असल्याचे अनेकांकडून आणि माध्यमांमधून ऐकीवात होते. त्यांना लहान मुले आवडतात असेही समजले. त्यामुळे कलाम यांना पत्र लिहीले. कलाम यांनी त्वरीत लक्ष घातले आणि स्थानिक प्रशासन मदतीसाठी धावून आल्याचे ती म्हणाली. त्यानंतर विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला. मुख्यमंत्री कार्यालयानेही पुढाकार घेऊन आम्हा भावंडांना मदत केली. राष्ट्रपतींची दखल मिळाल्यामुळे माझ्या भावंडांवर सुरू असलेल्या उपचारात देखील बदल झाले होते. माझ्या बहिण आणि भावाकडे डॉक्टर सुरूवातीपेक्षा अधिक लक्ष देऊ लागले होते. दोन्ही भावंडांनी गेली दहा वर्षे एचआयव्हीशी यशस्वीरित्या सामना केला. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे आमचे सर्व आयुष्यच बदलले. त्यामुळेच माझ्या भावंडांचे आयुष्य वाढले, असेही ती सांगते. त्यांचे जाणे आमच्यासाठी खूप दु:खद घटना आहे. आमच्या आई-वडिलांप्रमाणेच कुटुंबातील आणखी एक व्यक्ती आम्हाला सोडून गेल्याची भावना तिने व्यक्त केली.