विवाह आणि कुटुंब या दोन्ही संस्थांचं अस्तित्व अमेरिकेत धोक्यात येतं आहे की काय, असं सर्वसाधारण लोकांना वाटतं. मात्र, सरकारदरबारी या दोन्ही संस्था अजून तरी व्यवस्थित उभ्या आहेत. अमेरिकेत प्रेसिडेंट निवडताना लोक कुटुंबवत्सल उमेदवाराला नेहमीच झुकतं माप देतात. कुठल्याही छोटय़ा-मोठय़ा निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी उमेदवार आपली छबी बायको (किंवा नवरा)- मुलांबरोबर एका घरात आनंदानं राहणाऱ्या गृहस्थाची वा गृहिणीचीच ठेवतात. निवडणुकीच्या प्रतिकूल निकालानंतर बऱ्याच वेळा त्यांच्या लग्नाचं पितळ उघडं पडतं. अमेरिकेत कायम राहायला येण्याच्या व्हिसाकरता ‘फॅमिली व्हिसा’ची स्पेशल कॅटेगरी असते. याचा फायदा आणि गैरफायदा घेणारेही असतात. सूझी आणि राजची गोष्ट वाचून तुम्हीच ठरवा, की त्यांनी केलं ते बरोबर की चूक?
सूझीच्या गोष्टीत खरा-खोटा पासपोर्ट, खरं-खोटं लग्न, खरा-खोटा घटस्फोट अशा माझ्या बुद्धीला अनाकलनीय असलेल्या खूप घटना होत्या. मी त्यांची शहानिशा करायच्या भानगडीत कधी पडले नाही. अमेरिकेतल्या माझ्या घरात मुलं शिक्षण व नोकरीनिमित्तानं दूर वास्तव्यास गेल्यावर आमच्या घरात आपापल्या व्यवसायात बुडालेले आम्ही दोघं पती-पत्नी आणि मुलांची वयोवृद्ध आजी असे तिघंच राहत होतो. एक दिवस आजी घरातच पाय घसरून पडल्या. त्यांचं कंबरेचं हाड मोडलं. वय ९० च्या आसपास होतं तरी प्रकृती निकोप असल्याने त्या वयात त्यांचं ऑपरेशन झालं. हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर आम्ही दोघं घरात नसताना आजींची देखभाल करायला आमच्याकडे सूझी येऊ लागली. सूझीचं पूर्ण नाव- सूझन. ती त्रिनिदादची होती. त्रिनिदाद-टोबॅगो बेट कॅरीबिअन समुद्रात आहे. नशीब काढायला इथून बरेच तरुण लोक अमेरिकेच्या हिरव्या कुरणात येऊन पोहोचतात आणि इथेच कायमचे स्थिरावतात. सूझीचे दोन मोठे भाऊ विवाहित होते आणि अमेरिकेत आपापल्या कुटुंबासह राहत होते. सूझी त्यांची धाकटी बहीण. तिने राज या हिंदू मुलाशी लग्न केलं होतं. त्रिनिदादमध्ये पिढय़ान् पिढय़ा राहणारे खूप भारतीय आहेत. त्यांना तिकडे ‘कूली’ म्हणतात. हे नाव अर्थातच ब्रिटिशांनी रूढ केलेलं आहे. सूझीच्या चेहऱ्याकडे बघून तीही मूळची भारतीय असावी असं वाटे. राज मोटार मेकॅनिक होता. एका गॅरेजमध्ये काम करत होता. अमेरिकेत आल्यावर त्यांना एक मुलगा झाला. अमेरिकेत जन्मल्यामुळे तो साहजिकच अमेरिकेचा नैसर्गिक नागरिक होता.
सूझी आजींचं सगळं प्रेमाने करी. आमच्या घरात ती चांगलीच रुळली. कधी मी लवकर घरी आले तर दोघी मिळून चहा घेता घेता गप्पा मारीत असू. एकदा सूझी म्हणाली, ‘‘मॅम, मला तुम्हाला काहीतरी सांगावंसं वाटतं आहे. सांगू का?’’
‘‘अगं, सांग ना, सूझी.. काही मदत हवी आहे का?’’ असं मी विचारल्यावर तिने सांगितलं की, तिला दोन दिवस सकाळी नेहमीच्या वेळी यायला जमणार नव्हतं. मी म्हटलं, ‘‘हरकत नाही. पण एवढं काय काम काढलंयस?’’ उत्तरादाखल सूझीने सांगितलेली माहिती कुठल्याही सुरस, चमत्कारिक कहाणीहून कमी नव्हती.
सूझी आणि तिच्या भावांसारखे पुष्कळ तरुण लोक बऱ्याच वेळा बेकायदेशीरपणे अमेरिकेत येऊन दाखल होतात. कुठल्यातरी साध्या नोकऱ्या (जिथे त्यांना काही डॉक्युमेंट्स दाखवावी लागत नाहीत आणि पगारही कमी असतो.) करतात. अमेरिकेचा कायदेशीर व्हिसा मिळवण्याचा सर्वाचा प्रयत्न लगेचच सुरू होतो. आधी आलेले लोक नंतर येणाऱ्या आपल्या भाऊबंदांना मदत करतात. सूझीच्या मोठय़ा भावाने आपल्या धाकटय़ा भावाला आणि सूझीला मदत केली. या मदतीची सुरुवात खोटय़ाचं खरं आणि बेकायदेशीर कृत्य कायदेशीर करणारे वकील शोधण्यापासून होते. सूझीच्या मोठय़ा भावाने असा वकील शोधला. वकिलाची फी देण्यात सूझी आणि राजच्या पगारातला खूप पैसा खर्च होई. पण सूझीचा मोठा भाऊ त्यांना बरीच मदत करी. वकिलाकडे अमेरिकन सिटिझन असलेल्या तरुण-तरुणींची यादी असते. हे खरेखुरे अमेरिकन नागरिक असतात. पैसे घेऊन कागदोपत्री दाखवायला गरजूंशी खोटं लग्न करायचं, व्हिसा वगैरेचं काम झालं की घटस्फोट देऊन परत दुसऱ्या लग्नाची तयारी करायची, हाच या तरुण-तरुणींचा जास्तीचे पैसे मिळवायचा व्यवसाय असतो. आगळंवेगळं असं हे ‘मॅच-मेकिंग’ मग वकिलाच्या मदतीने होतं.
सुरुवात अर्थातच सूझी आणि राजच्या काडीमोडाने झाली. लग्नाचं, घटस्फोटाचं, शैक्षणिक पात्रतेचं अशी सगळी खोटी सर्टिफिकेट्स आणि एकापेक्षा जास्त पासपोर्ट त्रिनिदादमध्ये ‘मॅनेज’ करता येतात, या मौलिक माहितीची भर सूझीने माझ्या ज्ञानात घातली. अमेरिकेतही काही सर्टिफिकेट्स खोटय़ाची खरी होतात, अशा बातम्या वाचनात आणि ऐकण्यात आलेल्या होत्याच.
सूझी आणि तिचा नवरा राज- दोघांची तयारी एकाच वेळी सुरू झाली होती. लुटूपुटूच्या लग्नाचे फोटो आल्बम्स तयार झाले. राजकरता मिशेल नावाची एक नाजूक तरुणी निवडली गेली. ती राज आणि सूझीच्या मुलाची आई असणार होती. त्यामुळे सूझी आणि राज आठवडय़ातून दोन दिवस तिच्या संगतीत घालवीत असत. सूझी आणि राजचा मुलगा विकी हा मिशेलला ‘मॉम’ म्हणायला शिकला. सूझीला तो ‘ममा’ म्हणत असे. मिशेलचं घर राज आणि विकीने चांगलंच परिचयाचं करून घेतलं होतं. कारण त्या तिघांचं कुटुंब याच घरात राहत असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं होतं. सूझी मात्र आपल्या खोटय़ा खोटय़ा नवऱ्याबद्दल खूश नव्हती. तिला तो मॅचिंग वाटत नव्हता. तो शरीरबांध्याने ‘प्रचंड’ होता. सूझी अगदीच नाजूक होती. वयानेही तो सूझीपेक्षा बराच मोठा दिसत असे. मनातल्या शंका-कुशंका दाबून टाकून सूझीनेही केव्हिनबरोबर लग्नाच्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू ठेवली. केव्हिनच्या घराचा परिचय करून घेतला. वकिलाच्या मदतीने सूझी आणि राज- दोघांचेही पेपर्स योग्य त्या ऑफिसमध्ये सादर केले गेले.
यथावकाश राजला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. पहिल्या दिवशी एकटय़ा राजची मुलाखत होती. नंतरच्या आठवडय़ात मिशेल, राज आणि विकीची मुलाखत. सगळं व्यवस्थित पार पडलं. मला याबाबतीतल्या कायद्याची विशेष कल्पना नाही; परंतु राज आणि मिशेलचं लग्न, त्यांचं एका घरात राहणं, विकी त्यांचा मुलगा असणं- सारं काही सत्य मानलं गेलं असं सूझीने सांगितलं. एकदा कागदपत्रं आणि इतर फॉर्मॅलिटीज पुऱ्या झाल्या की राजला लीगल स्टेटस मिळणार, दोघं एकमेकांना घटस्फोट देणार आणि मग दोघेही परत लग्न करायला मोकळे!
सूझीच्या मुलाखतीचा दिवस जवळ आला. नखं, केस, नवीन कपडे, नवीन शूज सगळी तयारी झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाखत देऊन सूझी आली ती हवेत तरंगतच. दिसतही होती छान. तिची मुलाखत उत्तम झाली होती. मधले चार-पाच दिवस सूझी अमेरिकेत ‘लीगल रेसिडेंट’ झाल्याची स्वप्नं बघत राहिली. दुसऱ्या मुलाखतीचा दिवस उगवला. या सगळ्या विचित्र आणि बेकायदेशीर घटनांमध्ये मी बरीच गुंतले होते. (भावनिक पातळीवर!) सूझी चांगली मुलगी होती. तिचं सगळं चांगलं व्हावं असं मला मनापासून वाटत होतं. तिची आणि तिच्या नवऱ्याची वकिलाच्या मदतीने चाललेली सगळी कृत्यं बेकायदेशीर होती, हे मला कळत होतं; पण सगळ्याचा शेवट सूझीकरता गोड आणि सुरक्षित होणार असला तर कायद्याच्या बाजूकडे मी दुर्लक्ष करू शकणार होते. सूझीला ‘बेस्ट लक’ देऊन मी तिची वाट बघत बसले.
दुपारी सूझी आली. तिला दार उघडलं आणि तिचा अवतार बघून एका क्षणात माझ्या लक्षात सारं काही आलं. सगळं बिनसलं होतं. सूझी थोडं पाणी प्यायली आणि रडत रडत तिने मला सगळं सांगितलं. तिला आणि केव्हिनला वेगवेगळ्या रूम्समध्ये बसवलं होतं. दोन वेगवेगळ्या ऑफिसरनी एकाच वेळी दोघांची मुलाखत घेतली होती. दोघा ऑफिसरनी संगनमतानेच प्रश्न ठरवलेले होते. नंतर उत्तरं तपासली आणि सूझी व केव्हिन त्यांच्या जाळ्यात अडकले. दोघांना विचारले गेले- ‘‘तुम्ही दोघे बाहेर जाणार असलात आणि एकाच्या पेरेंटसाठी किल्ली ठेवायची असली, तर कुठली गुप्त जागा आहे का?’’ सूझीने सांगितलं, ‘‘दाराबाहेरच्या पायपुसण्याखाली.’’ केव्हिनने सांगितलं, ‘‘जिन्याच्या तिसऱ्या पायरीच्या कार्पेटखाली.’’ दुसरा प्रश्न घरातल्या लॉन्ड्री बास्केटच्या रंगाचा होता. दोघांनी वेगवेगळे रंग सांगितले होते. वकिलांनी तयार करायला सांगितलेल्या प्रश्नोत्तरांच्या पलीकडचे हे प्रश्न होते.
सूझीचं आणि केव्हिनचं लग्न खरं असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. सूझीला निराशेनं घेरलं होतं. वकिलाला ती जाब विचारणार होती. नाही म्हणायला एकच चांगली गोष्ट झाली होती. राजचं व्हिसाचं काम झालं होतं. यथावकाश त्याचं आणि मिशेलचं लग्न मोडणार होतं. मग त्याचं सूझीबरोबर परत लग्न, मग सूझीला व्हिसा.. अशा सगळ्या घडामोडी आपला आपला वेळ घेत घडणार होत्या. सूझीसाठी हा रस्ता लांबचा होता; पण शंभर टक्के सुरक्षित होता.
..आजींची तब्येत पूर्वीसारखी झालीच नाही. सात-आठ महिन्यांतच त्या गेल्या. सूझीनेही आमचा निरोप घेतला. मधे एकदा तिचा फोन आला आणि तिने सांगितलं की, तिला आणि राजला मुलगी झाली होती. मुलीचं नाव त्यांनी ‘मिशेल’ ठेवलं होतं. मिशेलने राजला अमेरिकेतला व्हिसा मिळायला मदत केली होती ना!
थोडक्यात, पण महत्त्वाचे : सूझी आणि राज ही बदललेली नावं आहेत. सगळी गोष्ट सूझीकडून ऐकलेल्या घटनांवर आधारित आहे. मी त्याची कायदेशीर बाजू पडताळून बघितलेली नाही. सूझीने मला किती कल्पित सांगितलं, किती सत्य सांगितलं, आणि किती सत्य माझ्यापासून लपवलं, याचीही मला कल्पना नाही.
शशिकला लेले – फ्लोरिडा – naupada@yahoo.com