प्रतिमा मात्र डागाळल्याची कबुली

उत्तर प्रदेशात दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीस गोमांस बाळगल्याच्या अफवेनंतर ठेचून मारण्यात आल्याची घटना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा खालावणारी आहे. मात्र, या घटनेचा संबंध सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांशीही नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या कारभारासही त्यामुळे विनाकारण त्याचा फटका बसतो, पण सरकारचा तसा कुठलाही हेतू नाही. दादरी येथे अफवेमुळे एका मुस्लीम व्यक्तीची हत्या झाली यासारख्या घटनेमुळे बिहार निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इरादा स्पष्ट झाला आहे असे वाटत नाही काय, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. राष्ट्रीय लोकशाही सरकार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या घटनेशी संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बाम्बोलिम येथे त्यांनी सांगितले की, काहीवेळा स्थानिक विषयात पराचा कावळा केला जातो. उत्तर प्रदेशातील घटनेशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा संबंध नाही. आपण लहानपणापासून संघाचे कट्टर स्वयंसेवक आहोत, त्यामुळे या घटनेशी संघाचा काही संबंध नाही हे आपण सांगू शकतो. भारतीय समाज सहिष्णु आहे. चर्चा व समझोत्यातून तोडगा काढण्याची आपली परंपरा आहे. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नाही.

बाबा रामदेव यांनी देशपातळीवर गोहत्या बंदीची मागणी केली आहे, त्यावर विचारले असता पर्रिकर म्हणाले की, सरकारचे निर्णय सर्वासाठी योग्य असले पाहिजेत. सगळ्या शाकाहारींना जग शाकाहारी व्हावे असे वाटत असेल; पण जर शाकाहारींच्या भाज्यांची दरवाढ झाली तर त्यांना खाण्यासाठी भाज्याच उरणार नाहीत.

सनातन संस्थेसारख्या संघटनांवर बंदी घालण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अशी बंदी घालण्यापूर्वी चौकशी संस्थांना त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून सादर करावे लागतील. सिमी संघटनेबाबत सिद्ध केले होते तसे ही संघटना हिंसाचाराला उत्तेजन देते हे दाखवून द्यावे लागेल. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही.

पाकिस्तानी लष्कराने पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान व सिंध प्रांतामध्ये केलेल्या मानवी हक्क उल्लंघनाच्या घटना जागतिक पातळीवर ठळकपणे मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत पर्रिकर यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले की, पाकिस्तान हा दहशतावादाचा निर्माता आहे हे जगापुढे उघड केले पाहिजे. पाकिस्तानने मानवी हक्कांचे जे उल्लंघन केले आहे, ते मांडले गेले आहे. ते गंभीरपणे मांडले गेले पाहिजे. पेशावरमध्ये मुलांच्या कत्तली केल्या जातात. मशिदीत जाणाऱ्या लोकांना ठार केले जाते. पाकिस्तानात हिंसाचार सगळीकडेच आहे, पाकिस्तानने नेहमीच भारत द्वेषाचे राजकारण केले आहे. सीमेपलीकडून घुसखोरी अजून चालूच आहे.