सध्या भारतीय वाहन बाजारात नव्याने आणि यशस्वीपणे घर करू पाहणारे सेगमेंट म्हणजे क्रॉसओव्हर गाडय़ा. सध्या हॅचबॅक क्रॉसओव्हर जोडय़ा खूप लोकप्रिय होताना दिसत आहेत. स्पोर्टी लुक आणि प्रशस्तपणा हे क्रॉसओव्हर गाडय़ांचे प्रमुख वैशिष्टय़. या प्रकारच्या गाडय़ांमुळे एसयूव्ही चालवायचा फील येतो, त्यामुळे सध्या या गाडय़ांची जादू आहे मार्केटवर..

क्रॉसओव्हर म्हणजे नक्की काय?
साधारणत: क्रॉसओवर म्हणजे शहरी रस्त्यांबरोबरच थोडय़ा कठीण परिस्थितीत काहीशा खडकाळ किंवा कच्च्या रस्त्यांवरही सहज चालू शकणारी, हॅचबॅकपेक्षा काहीशी दणकट अशी दिसणारी, परंतु एसयूव्हीपेक्षा लहान असणारी गाडी किंवा अजून सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, व्यायाम करून आणि थोडे स्टेरॉइड्स घेऊन धष्टपुष्ट झालेल्या1 हॅचबॅकचा अवतार!

लोकप्रिय क्रॉसओव्हर गाडय़ा
फियाट पुन्टो इव्हो आणि अ‍ॅव्हेंच्युरा
स्पोर्टी लुक्स सेगमेंटमधील सर्वात जास्त ग्राऊंड क्लिअरन्स (२०५ मिमी) हे तर अ‍ॅव्हेंच्युराचे ठळक वैशिष्टय़ तर आहेच शिवाय डॅशबोर्डवर देण्यात आलेले डिजिटल टिल्ट मीटर, जे गाडी कोणत्या बाजूस किती झुकली आहे हे दर्शवते आणि डिजिटल दिशादर्शक ज्यामुळे ‘ऑफ रोडिंग’च्या वेळी वाहन कोणत्या दिशेस चालले आहे हे समजण्यास मदत होते, ही वैशिष्टय़ेही तितकीच उल्लेखनीय आहेत. त्याचबरोबर गाडीला अधिक स्पोर्टी लुक देण्यासाठी राखीव चाक हे एसयूव्हीप्रमाणे ‘बूट लीड’ला जोडण्यात आले आहे. यामुळे अ‍ॅव्हेंच्युरा ही खऱ्या अर्थाने ‘ऑफ रोडिंग’साठी परिपूर्ण अशी कार ठरते. इव्हो त्यामानाने कमी टॉर्कची आहे. तसेच तिचे इंजिन डिसप्लेसमेंटही कमी आहे. ग्राऊंड क्लिअरन्सही अ‍ॅव्हेंच्युरापेक्षा कमी आहे. या सर्व कमतरता भरून काढतच अ‍ॅव्हेंच्युराची निर्मिती झाली आहे.

फियाट पालिओ आणि पालिओ अ‍ॅडव्हेंचर
वस्तुत: भारतीय बाजारात क्रॉसओव्हर सेगमेंटचा श्री गणेशा २००२ साली झाला. या वर्षी फियाट इंडियाने पालिओ अ‍ॅडव्हेंचर बाजारात आणली, हीच पहिली क्रॉसओव्हर गाडी. पालिओ अ‍ॅॅडव्हेंचर ही फियाटने २००१ साली बाजारात आणलेल्या फियाट पालिओवर आधारित होती; परंतु त्या काळात भारतीय ग्राहकांची पसंती ही लहानशा दिसणाऱ्या हॅचबॅक वाहनांकडे होती. त्यामुळे फियाट पालिओप्रमाणे पालिओ अ‍ॅडव्हेंचर ही ग्राहकांना भुरळ पाडण्यात अयशस्वी ठरली.

स्कोडा फाबिआ आणि फाबिआ स्काऊट
स्कोडा कंपनीने त्यांच्या फाबिआ या हॅचबॅकचे क्रॉसओव्हर व्हर्जन फाबिआ स्काऊट हे मॉडेल बाजारात आणले होते; परंतु जास्त किंमत आणि सव्‍‌र्हिस सेंटर्सची कमतरता या कारणांमुळे त्याला ग्राहकांनी फारशी पसंती दिली नाही.

मारुती सुझुकी एस क्रॉस
मारुती सुझुकीने एस-क्रॉस ही नवी क्रॉसओव्हर अद्याप बाजारात यायची आहे, त्याआधीच तिला चांगली मागणी येऊ लागली आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू झाले आहे. तिच्यात फियाटचे १.६ लिटर क्षमतेचे ११८ बीएचपीसह ३२ किग्रॅ एवढा टॉर्क निर्माण करणारे पॉवरफुल डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. हायवे क्रूझिंग सुलभ होण्यासाठी सहा स्पीड गीअर बॉक्स देण्यात आला आहे. एक्स्टेरिअर स्टायिलगसाठी दोन्ही बम्पर्स, व्हील आर्चेस आणि दरवाजांना फायबरचे क्लॅिडग, त्याचबरोबर  स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत.

क्रॉसओव्हर गाडी का घ्यावी..
प्रथमत: या गाडय़ांचा लुक चांगला असतो, शिवाय यातील फीचर्स एसयूव्हीच्या तोडीचे असतात. ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठीही या गाडय़ा चांगल्या असतात. दणकटही असतात. त्यामुळे क्रॉसओव्हर गाडय़ांना पसंती दिली जाते.

हॅचबॅक आणि तिचा क्रॉसओव्हर यांच्यातील फरक..
* प्रथमदर्शनी जाणवणारा फरक म्हणजे क्रॉसओव्हरला दणकट लुक्स देण्यासाठी दोन्ही बम्पर्स, व्हील आर्चेस आणि दरवाज्यांना फायबरचे क्लॅिडग जोडण्यात येते. त्यामुळे गाडीच्या लांबी आणि रुंदीत थोडी वाढ होते.
* जास्त रुंद टायर आणि जास्त डायमीटरची चाकं.
* स्किड प्लेट्स
* खडकाळ आणि कच्च्या रस्त्यांवर चालण्यास सोपे जावे यासाठी ग्राऊंड क्लिअरन्समध्ये वाढ केली जाते.
* इंजिनाची डिसप्लेसमेंट आणि क्षमता वाढवण्यात येते.
* रुफ रेल्स जोडण्यात येतात.
* काही वेळा गाडीच्या केबिनला जास्त स्पोर्टी लुक देण्यासाठी डॅशबोर्डच्या रंगसंगतीत बदल केला जातो.
* या सर्व गोष्टींमुळे गाडीच्या वजनात थोडी वाढ होते.

यांचीही क्रेझ कायम..
* टोयोटा इटिऑस क्रॉस
* फोक्सवॅगन क्रॉस पोलो
* ह्य़ुंदाई एलिट आय२० आणि आय२० अ‍ॅक्टिव्ह
* फोर्ड इको स्पोर्ट
* रेनॉ डस्टर     ’निस्सान टेरानो
* स्कोडा येती     ’महिंद्रा क्वांटो
* ह्य़ुंदाईची आगामी क्रेटा
या क्रॉसओव्हर गाडय़ांनीही चांगली स्पर्धा निर्माण केली आहे.
सर्वेश वैद्य –  ls.driveit@gmail.com