आजच्या काळात महिलाही बिनधास्तपणे दुचाकी, चारचाकी चालवताना दिसतात. विशेषत: तरुणींमध्ये ड्रायिव्हगची क्रेझ वाढते आहे. दुचाकीमध्ये तरुणींचे प्राधान्य स्कूटरला असते. त्यात बरेच पर्यायही उपलब्ध असतात. कंपन्यांची स्पर्धाही या प्रवर्गात मोठी आहे. महिलांसाठीच्या गाडय़ा म्हटल्या की, अ‍ॅक्टिव्हा, स्कूटी, अ‍ॅक्सेस वगरे ही नावे सहजपणे येतात, मात्र या विनागीअरच्या गाडय़ांची सुरुवात केली ती कायनेटिकने. देशात सर्वात पहिली विनागीअरची गाडी कायनेटिकनेच बाजारात आणली. तिचे नाव होते ब्लेझ. तिच्यानंतर हा मान झूम झेडएक्सला जातो. नव्वदच्या दशकात आलेली ही गाडी आजही नव्या रंगरूपात रस्त्यावरून धावताना दिसते. १९८४ साली हिरो मोटर्सने जपानच्या होंडा मोटर्सशी करार करून हिरो होंडा ही नवी दुचाकी निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली. पुढे हिरो होंडाच्या गाडय़ांनी इतिहासच रचला. नव्वदच्या दशकात आलेली हिरो होंडा सीडी १००, १९९४ मध्ये आलेली हिरो होंडा स्प्लेंडर या गाडय़ांनी समस्त भारतीयांना वेड लावले. प्रत्येक दुचाकीस्वाराकडे या गाडय़ा दिसायच्या. स्प्लेंडरने तर देशातील सर्वाधिक खपाची दुचाकी होण्याचा विक्रम प्रस्थापित केला. पुढे हिरो होंडा विभक्त झाले, मात्र आजही सामान्यांमध्ये हिरो होंडा हे नाव अगदी सहज घेतले जाते. यातच त्यांच्या यशाचे गमक आहे. आज हिरो आणि होंडाच्या विविध दुचाक्या बाजारात उपलब्ध आहेत.