मालन यांच्या एकाकी पालकत्वाची पहिली लढाई फक्त पालनपोषणासाठी होती. मुलं मोठी झाली, लग्न झाली पण मालन काही जबाबदारीतून मुक्त झाल्या नाहीत. पालकत्वाची दुसरी इनिंग सुरू झाली. मोठय़ाच्या मुलींना शिक वायचं आहे.. आणि धाकटय़ाच्या मुलासाठीची लढाई तर जीवनदानासाठी आहे.

आपल्याकडे लोकजीवनात देवीचं संकीर्तन करायचं तर ते गोंधळाच्या रूपात होतं. रेणुका, अंबा, भवानी अशा शक्तीरूपांची ती आराधना असते. पण आता कालप्रवाहात या विधीनाटय़ातल्या अनेक गोष्टी लुप्त होऊन एक कुळाचार उरलाय. आपल्या जीवननाटय़ात तर ‘गोंधळ’ या शब्दाला भलताच अर्थ चिकटलाय. आपल्या आजच्या लेखनायिका मालनबाई यांच्यामुळे ही सारी संगती मनात आली. कारण त्यांचं पाहिलंच वाक्य होतं, ‘‘कुठून आणि कशी सांगू माझी कहाणी तुम्हाला.. नुसता गोंधळ आहे सारा.’’

मालन शिवदास. मूळची उंब्रजजवळच्या कुरुळे गावची. आई-वडील दोघंही शेतमजूर. मजुरी किती तर १-१ रुपया. हातावरचं पोट, रोजचं पीठ-मीठ आणून शिजवायचं. मालनला लहानपणी दोनच गोष्टी माहीत होत्या, भूक आणि उपवास. तिच्या आठवणीत कडेवर एक आणि हाताशी एक भावंड नेहमी असायचंच. लहानपणचा आनंद म्हणजे कुणी शिळा पाव- बिस्कीट हातावर टेकवल्याचा! निवारा होता, अन्न-वस्त्र, जे जसं मिळेल तसे, दिवस ओढले. दहाव्या वर्षी आईच्या मागे गुरं राखायला गेल्याचंही सांगते ती.

आईला बिचारीला दरवर्षी बाळंतपण! ती कुठे कुठे पुरी पडणार. फार वैतागली की ती माहेरी पळून जायची. मग मोठी बहीण मालनच आला दिवस ढकलायची. आपलं भावंडांचं लेंढार घेऊन गावातल्या शाळेच्या आजूबाजूला घुटमळायची. शाळेतल्या मुलांच्या पुस्तकात डोकवायची. पण अक्षर ओळख नाहीच. अशा परिस्थितीत पलीकडल्या गावातल्या खात्या-पित्या घरातल्या भिकू रामुगडेनं मागणी घातल्यावर मालनच्या आई-वडिलांनी आनंदानं तिचं लग्न लावून दिलं, तेही अवघ्या चौदाव्या वर्षी. थोडय़ाच दिवसात मालनच्या लक्षात आलं की, आपला नवरा काहीच करत नाही. ना कामधंदा ना घरची शेती. लग्नानंतर सुखाचे दिवस येण्याची स्वप्नं रंगवणाऱ्या मालनची स्वप्नं धुळीला मिळाली होती. अखेर तिनं नवऱ्याला मुंबईला नेलं. तिथं नशीब काढू म्हणून गाववाल्याच्या खोलीत पथारी टाकून तिनं मिळतील तेवढी घरकामं धरली. नवराही दिवसभर बाहेरच, पण कामाची काही चिन्हं नव्हतीच. तशात मालनला काही तरी बाधलं.. अंगभर फोड आले. गाववालीनं मालनला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे हॉस्पिटलमध्ये मालनला एकटीला सोडून तिचा नवरा तिचे कपडे, पैसे सारं उचलून गावी निघून गेला. तशात मालनला दिवस असल्याचं कळलं. भावाच्या सासूनं तिला या काळात आधार दिला आणि गावी पोचवलं.
मुलगा झाल्याचं कळल्यावर नवरा न्यायला आला. ‘‘मला, एकटीला सोडून पळून येणाऱ्या बेजबाबदार नवऱ्याबरोबर मी जाणार नाही,’’ तिनं साफ सांगितलं. तिनं पुन्हा मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. मुंबईत तिला काम मिळण्याची खात्री होती. खरं तर मालनचं एकल पालकत्व तीन महिन्यांच्या गर्भावस्थेतच सुरू झालं होतं. तान्हं बाळ घेऊन मुंबईत राहाणार कुठे, बाळासह घरकाम देणार कोण? म्हणून मालननं आईला गळ घातली. तू बाळ सांभाळ मी मुंबईहून पैसे पाठवते. गर्भारपणात आणि बाळ लहान असताना मालनने किती आणि कसे ताण सहन केले तिचे तिलाच ठाऊक. संसार विस्कटलेला, बाळाच्या पालनपोषणाची जबाबादारी पार पाडायची होती. यात शिक्षण, संस्कार वगैरे शब्दही खूप दूर होते!

पहिलंच काम वाळके धरप्पा वस्तीत मिळालं. माणसं चांगली होती आणि पगार जेवून-खाऊन ४० रुपये. त्यातले ३० रुपये बाळासाठी पाठवायचे. आता जरा घडी बसायला लागली. बाळ आईच्याच घरात वाढत होता. वाळकेश्वरच्या घरमालकाकडे रमेश हा ड्रायव्हर होता. त्यानं मालकांना सांगून मालनला मागणी घातली. पुन्हा सुखी संसाराचं स्वप्न मालनच्या डोळ्यापुढे तरळायला लागलं. अन् तिनं दुसरं लग्न केलं. मालन करत असलेल्या तीन-चार घरकामांच्या पैशातून तिनं धारावीत खोली विकत घेतली, अवघ्या पंधराशे रुपयांत. गावाकडून पोराला आणलं. रमेश वागायला बरा होता, पण त्याची कामं बेकार होती. अवघा ४-५ र्वष संसार झाला. मालनला दुसराही मुलगाच झाला. अन् वज्रेश्वरीजवळ कुठल्याशा प्रकरणात रमेश मारला गेला. ही बातमीही तिला उशिरा समजली. मोठय़ा मुलाजवळ धाकटय़ाला ठेवून तिची पायपीट पुन्हा सुरू झाली. धारावीच्या वातावरणात मोठा मुलगा संजय फारसा शिकत नाहीये हे लक्षात आल्यावर धाकटय़ा संतोषला तिनं मन घट्ट करून मानखुर्दला बालकल्याण आश्रमात ठेवला. शिक्षणासाठी तुला इथंच राहावं लागेल हे तिनं लहानग्या संतोषला समजावून सांगितलं. वडिलांचं छत्र हरपलेल्या संतोषनंही मनापासून अभ्यास केला आणि दहावी करूनच तो ‘मानखुर्द’हून बाहेर पडला.
बांद्रय़ाला डॉ. डायस यांच्या हॉस्पिटलमधलं ‘आया’चं काम हे मालनच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं ठरलं. डॉ. डायस यांनी तिला मसाज, प्रेशर पॉइंटस् आणि रिलॅक्सेशनचे काही व्यायाम घ्यायला शिकवलं. प्रेमळ बोलणं आणि नम्र वागणं यांच्या जोडीला मालनच्या हाताला यश आहे अशी तिची कीर्ती पसरली. अर्धागवायूचे रुग्ण, वृद्ध मंडळी करता करता मालन ‘स्टार’ मंडळींच्या घरांमध्ये वावरू लागली. खार- वांद्रे भागातले धनिक आणि दादर- माहीममधल्या किती तरी मराठी तारका आज मालनच्या ‘क्लायंट’ आहेत. या सगळ्यांनी तिला वेळोवेळी मोलाची मदत केली आहे.

जरा आर्थिक स्थैर्य आल्यावर मालननं पुन्हा मोठय़ा संजयनं शिकावं म्हणून आग्रह धरला. पण त्याचं बालपण निसटलं तसं शिक्षणही. ती म्हणते, मी कधी मुलांना घेऊन अभ्यासाला बसले नाही. गोष्टी सांगितल्या नाहीत. पण माझी मुलं कधी खोटं बोलली नाहीत. वावगं वागली नाहीत. मुंबईत राहून मालन शुद्ध भाषा बोलते. मुलांनीही तीच उचलली आहे. आईचे कष्ट बघणारा संजय लहानपणापासून हॉटेलमध्ये कपबशा विसळत विसळत, गल्ल्यावर बसू लागला तेव्हा मालननं त्याचं लग्न करून दिलं.
तिच्याच भाषेत सांगायचं, तर तिच्या आयुष्यातल्या साऱ्या गोंधळाचं एकच उत्तर होतं ‘प्रारब्ध’. संसारसुख नव्हतंच माझ्या नशिबात म्हणून संजयचं लग्न लौकर करून दिलं. सून उषा आणि संजयला धारावीची खोली देऊन मालननं नालासोपाऱ्याला एक खोली आणि एक गाळा विकत घेतला. सुनेला मुलीसारखं प्रेम दिलं. तिच्या अत्यंत लाडक्या नाती प्रिया-रेश्मा. त्यांनाही आजीचा सार्थ अभिमान आहे. कामावर राहून अक्षरओळख करून घेऊन आता आधुनिक मोबाइल वापरणारी आणि जगातल्या सगळ्या बातम्या माहीत असणारी मालन आजी नातवंडांसाठी आदर्श आहे.

पालक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायला मालन प्रसिद्ध पोलीस अधिकारी
श्रीधर वगळ यांच्या घरात शिकली. वगळ मॅडमनी तिला खूप आधार दिला. मुलांच्या शिक्षण-स्वच्छतेकडे लक्ष द्यायला शिकवलं. वगळसाहेबांच्या मुलीनं मालनला इंग्रजीची अक्षरओळख करून दिली.
सगळं सुरळीत होतंय असं वाटत असतानाच संतोषची बारावीची परीक्षा सुरू असताना मोठा मुलगा संजय अचानक वारला. संतोषची बारावी राहूनच गेली. संतोष म्हणतो, ‘‘आईनं दहावीपर्यंत शिकवण्यासाठी इतके कष्ट उपसले. दर महिन्याला येऊन साऱ्या गरजा पूर्ण केल्या. आता जबाबादरी माझी आहे.’’

आपली जबाबदारी ओळखून संतोषनं आता लॉटरी तिकिटांचं दुकान टाकलं. मालननं त्याचंही लग्न करून दिलं. धाकटी सून अनिताला तिनं मसाजचं प्रशिक्षण दिलं. तीही भरपूर कामं करू लागली. मोठय़ा सुनेनं स्वयंपाकाची कामं धरली. तिच्या मुलींना चांगल्या शाळेत घालून मालननं सुनेला आणि नातींना पूर्ण आधार दिला. या नातींमुळे मालनची दुसऱ्या पालकत्वाची जबाबदारी पुन्हा सुरू झाली. सुनेच्या पाठी ती खंबीरपणे उभी राहिली.

पण प्रारब्धाचा फेरा एवढय़ावरच संपणार नव्हता. आता सारं चांगलं चाललंय म्हणून सुस्कारा सोडेपर्यंत संतोषच्या अतिशय हुशार आठ वर्षांच्या मुलाला व्हायरल एनकेफेलायटिस (मेंदूज्वराचा संसर्ग) झाला. सध्या त्याला स्पीच, फिझिओ आणि ऑक्युप्रेशन थेरपी चालू आहेत. त्याला वाचवण्यासाठी या कुटुंबानं आपलं घरदार विकलं आहे. नातींचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. एकुलत्या एक नातवावरचा खर्च संपत नाही. मालन नालासोपाऱ्याहून लोकलनं दादपर्यंत जाते. या प्रवासात सकाळ-संध्याकाळ ती चकल्या-चिवडय़ाची पाकिटं विकते. रोजची २००-३०० रुपयांची कमाई वाढली. एक क्षणही वाया घालवायचा नाही, गोड बोलून आणि प्रामाणिकपणे मिळेल तेवढं काम वाढवायचं, याचना नाही आणि स्पर्धा नाही. हेच गुण तिनं मुलं आणि नातवंडांपर्यंत पोहोचवले आहेत.

मालनच्या एकाकी पालकत्वाची पहिली लढाई फक्त पालनपोषणासाठी होती. भूक भागली पाहिजे, शिक्षण मिळालं तर फारच उत्तम झालं. मुलं मोठी झालं, लग्न झाली पण मालन काही जबाबदारीतून मुक्त नाही झाली. पालकत्वाची दुसरी इनिंग सुरू झाली. मोठय़ाच्या मुलींना शिकवायचं आहे. आणि नातवासाठीची लढाई तर जीवनदानासाठी आहे.
जीवननाटय़ातल्या या गोंधळात मालनबाईंनी आपलं शक्तीरूप पणाला लावलं आहे. अंबामातेकडे मागणं मागितलंच आहे, पण वाचकांनाही मदतीसाठी साकडं घातलं आहे. मालनबाईंच्या पालकत्वाच्या गोंधळातला हा उत्तररंग आहे.

vasantivartak@gmail.com