आनंददायी शिक्षणाचा ‘ग्राममंगल’चा प्रयोग आता केवळ एका जिल्ह्य़ापुरता मर्यादित राहिला नसून पुणे, सातारा, बीड अशा ठिकठिकाणच्या शाळांमधून ‘ग्राममंगल’च्या वतीने खऱ्याखुऱ्या रचनात्मक पद्धतीचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या या प्रयोगांची दखल शासनानेही घेतली असून नव्या शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात त्या उपक्रमांचा समावेशही केला आहे.
प्रत्येक मूल चांगले शिकू शकते. त्यांच्यात शिक्षणाची उपजतच आवड असते. शाळा आकर्षक आणि भरपूर कल्पक उपक्रम देणारी असेल तर त्यांना नक्कीच शाळेत जावेसे वाटते. त्यांना शाळेत ‘येती’ करण्याचा प्रश्नच राहत नाही. अशा शाळेतून ‘गळती’ संभवत नाही. शाळांमध्ये कृतिशील अनुभवांची रेलचेल असेल तर सर्वच मुले-मुली आनंदाने येऊन चांगल्या पद्धतीने शिकतात. स्वयंरोजगाराच्या अपार संधी, सौंदर्यपूर्ण आनंदमय वातावरण, व्यक्तिगत शिक्षणाची रचना, अभ्यासाचा भाग म्हणून छोटी बौद्धिक आव्हाने स्वीकारण्याची संधी, आवडी-निवडीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्त्वाचा आदर आणि भावनांची कदर असणाऱ्या शाळेतले शिक्षण श्वासोच्छ्वासाइतके सहज होते, या नवशिक्षणाविषयीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे. अनुताई वाघ, प्रा. रमेश पानसे आदींनी तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने आनंददायी शिक्षण पद्धतीचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.  
कोसबाड येथील आपले कार्य संपवून १९८२ मध्ये अनुताई वाघ डहाणू तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या दाभोण गावातील मुरबीपाडय़ावर आल्या. मूळच्या ठाणे जिल्ह्य़ातील हा आदिवासी भाग आता पालघर जिल्ह्य़ात मोडतो. पाडय़ावरील मंगल या मुलीच्या वडिलांनी शाळा तसेच वसतिगृहासाठी जागा दिली. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथील संस्थेचे अनुताईंनी ‘ग्राममंगल’ असे नाव ठेवले. मुरबीपाडय़ाप्रमाणेच दाभोण गाव परिसरात नाईकवाडी आणि इतर ठिकाणी संस्थेतर्फे सात बालवाडय़ा, दोन प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. ऐने येथील स्नेहघर हे येथील शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र आहे. येथून जवळच असलेल्या विक्रमगड या तालुक्याच्या ठिकाणी ‘ग्राममंगल’ संस्थेच्या अनुताई वाघ शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बालवाडय़ा तसेच प्राथमिक शाळा चालवली जाते.
‘ग्राममंगल’च्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींना कुणीही शिकवत नाहीत. त्यांची ती अनुभवाने प्रयत्नपूर्वक शिकतात. शिक्षक फक्त त्यांना त्या प्रक्रियेत मदत करतात. सकाळी साधारण दहा वाजता शाळा सुरू होते. आधी मुले-मुली परिसराची स्वच्छता करतात. मग शाळेत नियमित अभ्यास सुरू होतो. सर्वसाधारण शाळांप्रमाणेच प्रत्येकी ४० मिनिटांची तासिका असली तरी येथे विषयानुरूप केवळ शिक्षक बदलत नाहीत, तर मुलांनाही दुसऱ्या वर्गात जावे लागते. कारण येथे विषयानुरूप वर्गखोल्या असून (शास्त्रालय) तिथे गटागटाने मुले विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात. प्रत्येक गोष्ट आणि गृहीतक व्यवहाराच्या कसोटीवर पारखून पाहण्याची सवय त्यांना बालवाडीपासूनच लागते. तीन ते सहा वयोगटातील मुले-मुली बालवाडय़ांमध्ये येतात. त्यांच्यासाठी ‘ग्राममंगल’ संस्थेने ५००हून अधिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. या शैक्षणिक साधनांच्या आधारे मुले संख्याबोध, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे व्यावहारिक गणित शिकतात. ऐने येथील साधन अवलोकन केंद्रात ही शैक्षणिक साधने विभागवार जतन करून ठेवण्यात आली आहेत. संस्थेच्या वतीने बालवाडी तसेच प्राथमिक शिक्षकांसाठी या रचनावादी शिक्षण पद्धतीविषयी प्रशिक्षण दिले जाते. ऐने येथे एका वेळी २०० शिक्षकांना निवासी प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात त्यांना येथील शैक्षणिक साधनांचाही परिचय करून दिला जातो. हवी तेवढी पुस्तके उपलब्ध करून देणारे समृद्ध ग्रंथालय शाळेत आहे. ‘लावण्य’ हाही ग्राममंगलचा एक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहे. या नावीन्यपूर्ण कार्यशाळेत परिसरातील कारागीर, कलावंत येऊन आपल्या कलाकृती आणि कलावस्तू तयार करतात. संस्थेत येणारे पाहुणे, पर्यटक त्या वस्तू पाहतात, विकत घेतात. शिक्षण क्षेत्रातील नव्या प्रयोगांचा मागोवा घेणारे ‘शिक्षणवेध’ हे मासिकही प्रसिद्ध केले जाते.   
मुख्यत: ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळावे, या हेतूने सुरू झालेल्या ‘ग्राममंगल’च्या शाळांची दिनचर्या महानगरांमधील तारांकित आणि मानांकित शाळांनाही हेवा वाटावा अशी आहे. सकाळी दहा वाजता मुले शाळेत येतात. शाळा परिसरातील सर्व कामे मुलेच करतात. त्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. परिसर स्वच्छता केल्यानंतरच वर्ग भरतात. परिसरातील पाना-फुलांची नक्षी शाळेत ठिकठिकाणी काढली जाते. मुले गटागटाने अभ्यास करतात. येथील शाळेच्या भिंतींवर ‘नेहमी खरे बोलावे’ छापाच्या सुविचारांऐवजी अभ्यासक्रमास पूरक माहितीचे तक्ते, आकृत्या, चित्रे, गणिताची सूत्रे, कविता, सामान्यज्ञानाची माहिती असते. विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृती, केलेल्या कविता, लिहिलेले लेखही भिंतीवर आकर्षकपणे मांडलेले असतात. भूगोलाचा तास निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली भरलेला दिसतो. तिथे पृथ्वीचा गोल हातात घेऊन मुले त्यावरील खंड, देश आणि महासागरांचे निरीक्षण करतात. गणिताच्या तासाला मुले व्यावहारिक हिशेब करून भागाकार अथवा बेरीज-वजाबाकीचे तंत्र समजून घेतात. दुपारी भोजनगृहात एकत्र जेवतात. त्यानंतर दुपारचे सत्र सुरू होऊन पाच वाजता शाळा सुटते. थोडक्यात, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनची आठवण यावी, असाच शाळेचा सारा माहोल असतो.           
कधीही शाळेत न गेलेल्या मुलांना शाळेची सवय व्हावी या हेतूने ‘ग्राममंगल’ने आदिवासी पाडय़ांवर बालवाडय़ा सुरू केल्या. गाणी, गोष्टी, खेळ, छोटी कोडी, चित्र आदींच्या माध्यमातून त्यांना शाळेविषयी कुतूहल वाटावे असे वातावरण बालवाडय़ांमध्ये असते. तीन ते सहा वयोगटातील मुले येथे अंक, अक्षरे, शब्द पाहतात. त्या त्या वस्तूशी त्याचे नाव जोडायला शिकतात. अशा प्रकारे प्रत्यक्षात लेखन-वाचन सुरू होण्याआधीच मुलांची अक्षरओळख होते. इथेच त्यांना त्यांच्या बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे वळविले जाते. शाळेविषयी वाटणारी भीती त्यांच्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न या टप्प्यावर केला जातो. पुढे पहिली-दुसरीच्या वर्गात त्याचा मुलांना खूप फायदा होतो. पहिली-दुसरीच्या मुलांना उपयुक्त असा ‘लिहू या – वाचू या’ हा नऊ पुस्तकांचा संच ‘ग्राममंगल’ने उपलब्ध करून दिला आहे. एका भाषेवर प्रभुत्व असेल तरच दुसरी भाषा नीट आत्मसात करता येते, असा संस्थेचा विश्वास असून त्याआधारेच संस्थेच्या शाळांमधून द्विभाषा समृद्धी प्रकल्प राबविला जातो. या बालवाडय़ांमुळे दुर्गम भागातील मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढते आणि गळतीही रोखली जाते.
तळागाळातील मुला-मुलींना केंद्रबिंदू मानून ‘ग्राममंगल’मध्ये शिक्षणासंदर्भात सातत्याने संशोधन सुरू असते. संस्थेच्या शाळांमध्ये त्यावर आधारित प्रकल्प राबविले जातातच, पण विकासघरांच्या माध्यमातून गावातील सरकारी अथवा खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न संस्था करते. शाळेच्या आवारातच एका कक्षात विकासघर असते. तिथे संस्थेमार्फत शिक्षिका नेमण्यात येते. पहिली ते चौथीच्या मुला-मुलींना स्वयंअध्ययनासाठी दररोज दोन तास विकासघर उपलब्ध असते. महाराष्ट्रात पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ात संस्थेमार्फत ४२ विकासघरे कार्यान्वित आहेत.
सर्वसाधारणपणे मुले शाळेत जाऊनच शिकत असली तरी मुलांची आणि पालकांची तयारी असेल तर त्यांना घरी राहूनही शाळेचा अभ्यास करता येतो. पुण्यात गेली १२ वर्षे हा प्रयोग राबविला जात असून ‘ग्राममंगल’ त्यांना मार्गदर्शन करते. सध्या अशा प्रकारे ७० मुले-मुली शिकत आहेत. शाळेत न जाताही स्वयंअध्ययनाने दहावीची परीक्षा देता येते, हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे. आई-वडील दोघेही नोकरी करीत असलेल्या शहरी भागांत मुलांच्या संगोपनासाठी अपरिहार्य ठरलेली पाळणाघरे नेमकी कशी असावीत, याचा विचार करून ‘ग्राममंगल’ने पालनघर ही योजना मांडली आहे. सध्याची पाळणाघरे केवळ सांभाळघरे झाली आहेत. त्याऐवजी पाळणाघरे अधिक अर्थपूर्ण व्हावीत म्हणून संबंधितांसाठी संस्थेतर्फे ‘पालनघर’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.
ग्राममंगल संस्था, डहाणू
विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत संस्थेला मिळत नाही. उलट अशाप्रकारच्या शाळा अनधिकृत ठरवून त्या बंद करण्याचा घाट शासनाने मध्यंतरी घातला होता. त्याविरूद्ध झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व ‘ग्राममंगल’च्या प्रा.रमेश पानसे यांनी करून शासनाला या शाळांची निकड पटवून दिली. निरनिराळ्या व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या मदतीवरच ‘ग्राममंगल’चे कामकाज चालते.
संस्थेतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा तसेच मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. विद्यार्थी दत्तक योजना राबवली जाते. बालवाडीतील मुला-मुलींसाठी वार्षिक प्रत्येकी पाच हजार, तर शाळेतील मुला-मुलींसाठी प्रत्येकी १२ हजार रुपये या योजनेअंतर्गत स्वीकारले जातात. अशा प्रकारे निरनिराळ्या मार्गानी प्रयत्न करूनही संस्थेच्या जमाखर्चाची कशीबशी तोंडमिळवणी होते. परिणामी इच्छा असूनही संस्थेला विस्तार अथवा नवे प्रकल्प हाती घेता येत नाहीत. विक्रमगड येथील नव्या शाळेचे काम अर्धवट असून आणखी काही वर्ग बांधण्यासाठी निधी लागणार आहे. ऐने येथील शाळेत संगणक कक्षाची आवश्यकता आहे. वारंवार विजेचा लपंडाव सुरू असतो, त्यामुळे येथे सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याची एक योजना आहे. शाळेच्या आवारातच मुलांना व्यवसाय शिक्षण मिळावे अशी ‘ग्राममंगल’ची इच्छा आहे. ‘ट्रायबल युथ होम इंडस्ट्री ट्रस्ट’च्या माध्यमातून तो प्रकल्प राबविला जाणार आहे. मात्र या सर्वासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांची गरज आहे.
दाभोणच्या नाईकवाडीत राहणारा सिलिंद शिवराम लहांगे ‘ग्राममंगल’चा माजी विद्यार्थी. क्रमिक शिक्षण घेत असतानाच तो शास्त्रीय संगीतात विशारद झाला. त्यासाठी तो काही काळ ठाण्यात येऊन राहिला. आता तो संस्थेच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने परिसरातील तरुणांना एकत्र करून ‘आदिवासी परिवर्तन युवा विभाग’ नावाची संस्था सुरू केली आहे. संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजनांचे लाभ पदरात पाडून घेत असल्याचे सिलिंद अभिमानाने सांगतो.
संस्थेपर्यंत कसे जाल?
‘ग्राममंगल’चे ऐने येथील केंद्र मुंबईपासून १३० किमी अंतरावर आहे. डहाणूच्या आधी येणाऱ्या वाणगांव स्थानकात उतरावे. येथून ऐने गाव ११ किमीवर आहे. ठाण्याहून भिवंडी-वाडामार्गे बोईसरला आणि तिथून ऐनेला जाते येते.
धनादेश या नावाने काढावेत
ग्राममंगल
Grammangal
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी