सायन्स काँग्रेसचे शंभरावे अधिवेशन गुरुवारी येथे सुरू होत असून या वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवे विज्ञान व तंत्रज्ञान धोरण जाहीर करणार आहेत. या अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे करणार असून अनेक परदेशी प्रतिनिधी, नोबेल विजेते व भारतीय वैज्ञानिक या वेळी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे वेबकास्टिंग केले जाणार आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल व इंडियन सायन्स काँग्रेसच्या समितीचे अध्यक्ष एम.के.नारायणन यांनी सांगितले, की मुलांच्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम हे करणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान सचिव टी.रामसामी यांनी सांगितले, की पंतप्रधान मनमोहन सिंग हे देशाचे चौथे विज्ञान व तंत्रज्ञान धोरण जाहीर करणार आहेत. वैज्ञानिक व विविध संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करून हे धोरण ठरवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी २६ डिसेंबरला हे धोरण मंजूर केले आहे.
सायन्स काँग्रेसचे शंभरावे अधिवेशन ऐतिहासिक मानले जात असून ‘सायन्स फॉर शेपिंग द फ्युचर ऑफ इंडिया’ हा त्याचा मध्यवर्ती विषय आहे. देशाच्या प्रगतीत विज्ञानाचा वाटा वाढवण्याच्या विषयावर या वेळी चर्चा होणार आहे. तीन जानेवारीला या सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने एक टपाल तिकीट प्रकाशित केले जाणार आहे.
ठळक वैशिष्टय़े
*  प्रथमच अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार
*  भारताचे चौथे राष्ट्रीय विज्ञान धोरण पंतप्रधान जाहीर करणार
*  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मुलांच्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटक