‘भारतीय विज्ञान परिषदे’च्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात चार वर्षांत कशा कशा पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या यांची टिमकी कुलगुरू राजन वेळुकर वाजवत असतानाच विद्यापीठाच्याच पडझड झालेल्या ‘सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहा’त मात्र विद्यार्थिनी जीव मुठीत धरून राहत आहेत.
गेल्या शनिवारी या वसतिगृहातील न्हाणीघराचे छप्पर कोसळले होते. आता याच वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या खोलीत पलंगावरच बुधवारी दुपारच्या सुमारास छप्पर कोसळल्याने विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वारंवार जिवावर बेतणाऱ्या या दुर्घटनांमुळे आता या वसतिगृहात राहण्यास विद्यार्थिनी तयार नाहीत. परिणामी आम्हाला येथून अन्य वसतिगृहात हलविण्यात यावे, अशी मागणी येथील विद्यार्थिनींनी केली आहे.
विद्यापीठाच्या कलिना संकुलात विद्यार्थिनींकरिता तीन वसतिगृहे आहेत. मात्र, या वसतिगृहांमध्ये देखभाल व दुरुस्तीअभावी छप्पर कोसळण्याच्या, पाणी गळतीच्या घटना वाढल्या आहेत. यापैकी सावित्रीबाई फुले या तीनमजली वसतिगृहाच्या इमारतीची अवस्था तर फारच वाईट आहे. ‘भिंतींना ओल येणे, छप्पर गळणे, पडणे आदी तक्रारींनंतर वसतिगृहाची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. परंतु, जीर्ण इमारत आणि दुरुस्तीच्या निकृष्ट कामामुळे ती वरवरची रंगरंगोटी ठरत आहे. ही संपूर्ण इमारतच डबघाईला आल्याने ती पाडून टाकायला हवी, अशी सूचना आपण विद्यापीठाकडे केली होती. अशा इमारतीत विद्यार्थिनींच्या राहण्याची सोय करणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळणे आहे. मात्र, विद्यापीठाने या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या,’ असे विद्यार्थिनींच्या वतीने तक्रारीचा पाढा वाचताना युवा सेनेचे विद्यापीठातील अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. ‘या वसतिगृहातील परिसरही इतका अस्वच्छ आहे की बाहेर पडताना नाकाला रूमालच लावावा लागतो. येथील उघडी गटारे तर येथील अस्वच्छतेची साक्षच देत असतात,’ अशी तक्रार आणखी एक अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी केली. आता वारंवार छप्पर कोसळण्याच्या घडणाऱ्या  सामना करण्याबरोबरच विद्यार्थिनी जीव मुठीत धरूनच वावरत असतात.
तडे गेलेले छप्पर, गळके पाईप आणि फ्लश टँक, मोडके आणि सतत कुरकुरणारे दरवाजे, रंग उडालेल्या भींती यामुळे इमारतीची दुरवस्था बाहेरूनही दिसावी. या शिवाय बाथरूममध्ये पाणी तुंबणे या नेहमीचा त्रास होऊन बसला आहे. या संपूर्ण इमारतीची पूर्णपणे दुरुस्ती केल्याशिवाय हा त्रास संपणार नाही. त्यामुळे, आम्हाला येथून त्वरित हलवावे, अशी मागणी काकुळतीला आलेल्या विद्यार्थिनींनी वैराळ यांना पत्र लिहून केली आहे.