माइक हसीच्या शानदार नाबाद शतकानंतर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव सुस्थितीत असताना घोषित केला आणि त्यानंतर पाहुण्या संघाच्या चार फलंदाजांना तंबूची वाट होबार्टच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगले प्रभुत्व मिळवले आहे. अनुभवी हसीने श्रीलंकेविरुद्धच्या सहाव्या कसोटी सामन्यात पाचवे शतक साकारले. त्यामुळेच कप्तान मायकेल क्लार्कला ५ बाद ४५० अशा समाधानकारक स्थितीत ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित करता आला.
अखेरच्या सत्रात दिम्युथ करुणारत्ने, कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि थिलान समरवीरा हे मोहरे तंबूत परतल्याने श्रीलंकेची ४ बाद ८७ अशी अवस्था झाली होती. तिलरत्ने दिलशान ५० धावांवर खेळत आहे, ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
त्याआधी, हसीने नाबाद ११५ धावांची खेळी साकारून आपल्या कसोटी कारकिर्दीमधील १९व्या शतकाची नोंद केली. त्याने मॅथ्यू व्ॉड (६८) याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचली. ३७ वर्षीय हसीच्या फलंदाजांची नजाकत डोळ्यांचे पारणे फेडणारी अशीच होती. १८४ चेंडूंत हसीने साकारलेल्या खेळीमध्ये आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.