स्विंग गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी ही त्याची ओळख. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा हा भारताचा दुसराच गोलंदाज. पण काळ बदलला आणि संघाचा महत्वाचा भाग असलेल्या या खेळाडुला पुनरागमन करण्यासाठी व आपला जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इरफान पठाणचे करिअर संपुष्टात आणले अशी माध्यमांमध्ये काही काळापूर्वी मोठी चर्चा होती. पण इरफानने हे सर्व फेटाळले असून माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द उद्धवस्त होण्यास चॅपेल जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या करिअरबाबत अनेक लोक चॅपेल यांना दोष देतात. पण असं काहीही नाही. यात काहीच सत्य नसून कोणीच कुणांचं करिअर संपवू शकत नाही. यासाठी तुम्ही स्वत: जबाबदार असता, असे त्याने म्हटले आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्रात त्याची कोणत्याच संघात निवड झाली नव्हती. दरम्यान, डॅव्हेन ब्रावोऐवजी गुजरात लायन्स संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

कोणाला दोष नाही
माझ्या सततच्या दुखापतींमुळे मला संघातील स्थान गमवावे लागले. पुनरागमन करताना मला खूप अडथळे आले. त्याचा परिणाम माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर पडला. जेव्हा मला संघातून वगळण्यात आले. दुर्दैवाने त्याचवेळी जखमी झालो. अशा परिस्थितीत पुनरागमन करणे खूप कठीण असते. त्यामुळे मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही, असे त्याने सांगितले. गुजरात लायन्स संघाचा डॅव्हेन ब्राव्हो हा जायबंदी झाल्यामुळे पठाणला संधी मिळाली आहे.
आयपीएलमध्ये पुन्हा संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. पण जेव्हा तुम्हाला संघात घेतले जात नाही. तो क्षण निराशाजनक असतो. पण आता मालिका उत्कंठावर्धक स्थितीत आली आहे. माझ्यासाठी ही चांगली संधी आहे, असे म्हणत भूतकाळात मला डोकावून पाहायचं नाही, असेही तो म्हणाला.
भुतकाळ विसरावा
खेळाडुने कधीही भूतकाळात काय घडलंय याचा विचार करू नये. त्याने पुढचं पाहावं. मला माहीत आहे की, माझा आंतरराष्ट्रीय अणि देशांतर्गत अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो. सध्या गुजरात लायन्स संघाकडून खेळताना मला मोठा आनंद होतोय, असेही या ३२ वर्षीय खेळाडूने म्हटले आहे.

तुलनेमुळे आत्मविश्वासही वाढतो
एकेकाळी इरफानची तुलना कपिलदेव यांच्याशी व्हायची. कपिलदेव यांच्याशी तुलना करणे बरोबर नाही. ते उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते. लोकांनी माझी त्यांच्याबरोबर तुलना केली. पण त्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडला नाही. पण, एक युवा खेळाडूला अशी तुलना आवडते. त्यामुळे आत्मविश्वासातही वाढ होती, असेही तो म्हणाला.
पाठीच्या दुखण्यामुळे मी माझी गोलंदाजी शैली बदलली होती. पण आता मी माझ्या जुन्या शैलीत गोलंदाजी करू शकतो. आता स्विंग गोलंदाजीवर मी समाधानी आहे. आधिकाधीक सामने खेळून मी माझ्यात सुधारणा करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.