रिओ ऑलिम्पिकसाठी आता जेमतेम एक वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. भारतीय तिरंदाज या स्पर्धेत पदकाचे दावेदार आहेत. मात्र भारतीय तिरंदाजी संघटनेचे प्रमुख प्रायोजक असलेल्या टाटा या नामांकित कंपनीने प्रायोजकत्वाचा करार मोडीत काढल्याने तिरंदाजांचा सराव, प्रवास आणि एकूणच खेळाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकमेव प्रायोजकांनी पाठिंबा काढून घेतल्याने राष्ट्रीय मानांकन स्पर्धेच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे.
भारतीय तिरंदाजीच्या प्रचार आणि प्रसारात टाटांचे योगदान मोलाचे आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी जमशेदपूर येथील टाटा अकादमीतच सराव करते. भारतीय तिरंदाजी संघटना आणि टाटा यांच्यात तीन वर्षांचा करार झाला. मात्र एकमेव आणि प्रमुख प्रायोजक असूनही महत्त्व मिळत नसल्याने टाटांनी करार रद्द केल्याचे समजते. संघटना आणि टाटा यांच्यात झालेल्या करारानुसार टाटांतर्फे दरवर्षी खेळासाठी २.५ कोटीची गुंतवणूक करण्यात येईल असे ठरले होते. टाटांच्या प्रायोजकत्वामुळे भारतीय तिरंदाज आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होत असत. मात्र आता या सगळ्यावर गदा येण्याची शक्यता आहे.
क्रीडा नियमावलीचे पालन करण्यास असमर्थ ठरल्याने क्रीडा मंत्रालयाने भारतीय तिरंदाजी संघटना बरखास्त केली होती. या निर्णयामुळे संघटनेला सरकारकडून मिळणारा निधीही बंद झाला. मात्र त्यानंतरही टाटांच्या सहकार्यामुळे तिरंदाजी संघटनेचे कामकाज सुरू होते.
दरम्यान टाटांच्या अचानक माघारीनंतर तिरंदाजी संघटनेने नव्या प्रायोजकाचा शोध सुरू केला आहे. टाटांच्या निर्णयाचा फटका तिरंदाजांना बसू नये यासाठी कॉर्पोरेट उद्योगसमूहांशी आमची चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिक तयारी, आंतरराष्ट्रीय स्पर्धातील सहभाग यावर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सहसचिव अनिल कामिनेनी यांनी सांगितले.