ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कांगारुंची दाणादाण उडवली. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद २५६ अशी झाली आहे. खेळ संपला तेव्हा मिचेल स्टार्क अर्धशतकी खेळी करून नाबाद आहे. भारतीय संघाकडून उमेश यादवने यावेळी चार विकेट्स घेतल्या, तर अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. तर जयंत यादवने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने चांगली केली होती. पहिल्या सत्रात फक्त एक विकेट पडली होती. डेव्हिड वॉर्नर(३८) याची विकेट उमेश यादवने घेतली होती. पण दुसऱया सत्रात अश्विन-जडेजा जोडीने कमाल केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला(२७) अश्विनने कोहलीकरवी झेलबाद केले. तर शॉन मार्श याला जयंत यादवने तंबूत पाठवले. हेंड्सकोम आणि मिचेल मार्श यांना रवींद्र जडेजाने गुंडाळले. रेनशॉ रिटायर्ड हर्टम्हणून तंबूत दाखल झाला होता. पण दुसऱया सत्रात त्यालाही बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.

तिसऱया सत्रात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळ्याच्या प्रयत्नात खेळी केली. त्यात उमेश यादवला यश देखील आले. वेगवान गोलंदाजीच्या जोरावर उमेश याने दोन विकेट्स घेऊन कांगारुंना धक्का दिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज तंबूत दाखल झाले असून संघाची धावसंख्या २५६ इतकी आहे.