नटराज बेहरा व निरंजन बेहरा यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ओडिशाने पहिल्या डावात ३ बाद २३७ धावा करीत रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्रास दमदार उत्तर दिले. त्याआधी महाराष्ट्राचा पहिला डाव ३१५ धावांमध्ये आटोपला. हा सामना संबळपूर येथे सुरू आहे.
महाराष्ट्राने ७ बाद २६४ धावांवर रविवारी दुसऱ्या दिवशी पहिला डाव पुढे सुरू केला. श्रीकांत मुंढे व अक्षय दरेकर यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करीत संघास तीनशे धावांपलीकडे नेले. मात्र ही जोडी फुटल्यानंतर महाराष्ट्राचा डाव कोसळला. महाराष्ट्राने शेवटचे तीन गडी अवघ्या दोन धावांमध्ये गमावले. दरेकर याने २७ धावा केल्या तर मुंढे याने झुंजार खेळ करीत नाबाद ३९ धावा केल्या.
ओडिशाने बिकास पाटी (१७) याची विकेट लवकर गमावली मात्र त्यानंतर नटराज व निरंजन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. नटराज याने नऊ चौकारांसह ६० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर निरंजन याने गोविंद पोडेर याच्या साथीत ७२ धावांची भर घातली. गोविंद याने आठ चौकारांसह ४० धावा केल्या. निरंजन याने आत्मविश्वासाने खेळ करीत नाबाद ५९ धावा केल्या. त्यामध्ये त्याने पाच चौकार मारले. खेळ संपला त्यावेळी विपलाब समंतराय हा त्याच्या साथीत २६ धावांवर खेळत होता. संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव ३१५ (हर्षद खडीवाले ४३, अंकित बावणे ५१, केदार जाधव ३३, चिराग खुराणा ४८, श्रीकांत मुंढे नाबाद ३९, अक्षय दरेकर २७, बसंत मोहंती ३/४०, अलोकचंद्र साहू २/४३) ओडिशा-पहिला डाव ३ बाद २३७ (नटराज बेहरा ६०, निरंजन बेहरा खेळत आहे ५९, गोविंद पोडेर ४०, श्रीकांत मुंढे २/६६)